धावण्याच्या व्यायामानंतर...

    दिनांक :20-Dec-2019
|
थंडीच्या दिवसात व्यायामासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढते. धावणं हा सर्वांगाला हालचाल घडवणारा व्यायाम असल्यामुळे अनेकजण हा मार्ग अवलंबतात. पण रनिंग अथवा जॉगिंगनंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. काही चुकांमुळे या व्यायामाचा परिणाम कमी होऊ शकतो. कोणत्या चुका करतो आपण? जाणून घेऊ या. 
 
running_1  H x
 
  • धावल्यानंतर खूप दमायला होतं. यावेळी शरीराला आरामाची गरज असते. विश्रांतीच्या या वेळेत शरीराची झीज भरून निघते. पण हा आराम योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं. धावल्यानंतर नुसतं बसून राहू नका. थोडी थोडी हालचाल करत रहा. हालचाल केल्याने शरीराची झीज झटपट भरून निघेल आणि उत्साह टिकून राहील.
  • धावल्यानंतर खूप घाम येतो. घामामुळे कपडे खराब होतात. अशा घामेजलेल्या कपड्यांमुळे त्वचेचा जंतूसंसर्ग तसंच अन्य समस्या निर्माण होऊ शकतात. घामावर वारं बसलं तर सर्दी होते. म्हणूनच धावल्यानंतर लगेच कपडे बदला. व्यायामानंतर कपडे न बदलणं ही आरोग्याच्या दृष्टीने मोठी चूक ठरू शकते.
  • धावल्यानंतर खूप भूक लागते. अशा वेळी आहारात आरोग्यदायी पदार्थांची निवड करायला हवी. वेफर्स, पिझ्झा किंवा तेलकट पदार्थांच्या सेवनाचा काहीही लाभ होत नाही. उलट अशा पदार्थांमुळे आपण आळशी बनतो. व्यायामाचा उत्साह कमी होतो. भरपूर कॅलरी खर्च केल्या आहेत असं समजून काही लोक तेलकट, गोड पदार्थांचं सेवन करतात. पण हे चुुकीचं आहे.
  • धावल्यानंतर जास्त मेहनतीचं काम करू नका. थोडं अंतर चालणं किंवा घरातली हलकी कामं करणं ठीक आहे पण वजन उचलण्यासारखी कामं करू नका. धावल्यानंतर स्नायूंना मूळ स्थितीत येण्यास थोडा वेळ लागतो. अशा वेळी मेहनतीचं काम केल्याचं स्नायूंना दुखापत होऊ शकते.