शाळेतले जुने दिवस

    दिनांक :20-Dec-2019
|
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार 
 
"अरे उठ लवकर शाळेला उशीर होतोय्‌’’ इथपासून ते ‘‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना!’’ अशा ओळींनी सुरुवात व्हायची ती आपल्या शालेय दिवसांची! त्यानंतर वेगवेगळे तास आणि वेगवेगळे शिक्षक त्यात काही आवडीचे, तर काही नावडीचे. लहानपणी ते शाळेचे सहा तास कधी संपतात, असं वाटायचं आणि त्यात असणारी ती मधली सुट्टी तिची वाट पाहण्याची मजाच काही और होती. शाळेत जितके विषय तितकेच शिक्षक, त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धती आणि स्वभाव यामुळे नकळतच काही विषय आवडीचे झाले, तर काही नावडीचे.. पण, प्रत्येक विषयाच्या तासाची मजा ही वेगवेगळी होती. आवडत्या शिक्षकाचा टॉपिक कितीही रटाळ असला तरी, मन लावून लक्ष द्यायचो, तर एखाद्या न आवडणार्‍या शिक्षकाच्या तासाला मन लावूनही लक्ष देताच येत नव्हता.
 

schoool _1  H x 
 
 
बहुदा विषयांनुसार का काय, पण प्रत्येक विषयासारखाच त्या त्या विषयाच्या शिक्षकाचा स्वभाव असेल, असे मला अनेकदा वाटायचे, म्हणजे आता मराठीचेच घ्या, त्याचे शिक्षक मुळातच साहित्यिक असतील की काय, असे वाटायचे. त्यांच्या साध्या-साध्या बोलण्यातून ही कविता किंवा एखादी गोष्ट सांगतात असेच वाटायचे. त्यानंतर इंग्रजींचे सर त्यांचा नेहमीच हेवा वाटायचा, कारण चित्रपटात हिरो जसा फाडफाड इंग्रजी बोलतो, तसं आपल्याला ही यावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटायचं आणि तेव्हा आपल्या परिचयात सर्वात छान इंग्रजी बोलणारे आपले इंग्रजीचे शिक्षकच होते, त्यामुळे त्यांची एक वेगळीच छाप? आपल्या सर्वावर होती. यानंतर विज्ञान म्हटले की, त्याचे शिक्षक नेहमीच अभ्यासू दिसायचे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी गूढ आहे, असेच त्यांच्या वागण्यातून वाटायचे. अशाप्रकारे वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळे जीवनाचे धडे आपल्या सर्वानाच शिकविले. या सर्वाचीच कधी ना कधी आपल्याला आठवण येतच असते किंवा एखादा खास प्रसंग लक्षात असतोच.
घरातल्या लहानग्यांना शाळेची तयारी करताना पाहून पुन्हा जुने दिवस आठवतात.
 
 
कारण शाळेची तयारी म्हटला, की- प्रत्येक दिवशी वेळापत्रकानुसार भरली जाणारी ती आपली बॅग, आपल्या आवडत्या विषयाच्या वही आणि पुस्तकावर लावण्यात येणारे ते आपल्या आवडत्या कार्टूनचे स्टीकर, नवीन पुस्तकांचा ? सुगंधआणि त्यांना दुमड पडू नये यासाठी बॅगेत भरताना घेतलेली काळजी सारंच आठवतं. यानंतर नवीन कंपॉस किंवा बॅग अशा कोणत्यातरी कारणासाठी घरच्यांकडे केलेल हट्ट आणि तो सफल झाल्यानंतर मिळालेला आनंद याची तुलना आज मिळत असलेल्या हजारोंच्या फोनलाही नाही. आज आपण वेगवेगळे स्मार्ट फोन घेतोय्‌. नवनवीन गॅझेट्स घेतोय, मात्र हे सर्व मित्रांना दाखविताना ती मजा येत नाही, जी नवीन कंपॉस मित्राला दाखविताना यायची.
 
 
त्यानंतर सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक वेगळाच काहीतरी असायचा, बर्‍याच काळानंतर शाळेत जायची मरगळ असली तरी सर्व संवगडी पुन्हा भेटणार, कोणते नवीन मित्र-मैत्रिणी असणार, तर कोण वर्गशिक्षक असणार, अशा एक न अनेक सस्पेन्सेस फोडण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी जाण्याची उत्सुकता फार जास्त असायची. त्यात आपल्या जिगरी मित्रासोबत आवडीचा बेंच पकडण्याची लढाई लढायला ही फार मजा यायची. तसेच गृहपाठ ही गोष्ट ही कधीच विसरता न येणारी.. आज दररोज जीवनात आपण रात्री गेल्यावर जे काही झाले त्याचा विचार करतो, चुकींचा खेद व्यक्त करतो, तर एखादी जवळची व्यक्ती आपल्याशी का वाईट वागली, याचा विचार करतो. असा जीवनाचा गृहपाठ आपल्याला रोजच करावा लागतो. मात्र, शाळेत असताना शिक्षक कितीही बोलले तरी कधीना कधी गृहपाठाची बोंब व्हायचीच. मग आपली ती कारणं सर अभ्यास केलाय्‌, पण माझी वही घरी विसरली.. सर मी काल शाळेलाच आलो नव्हतो.. अशी वेगवेगळी सरांना दिलेली कारणे आजही आठवली तरी ती नकळत आपल्या चेहर्‍यावर स्मित हास्य देऊन जातात.
 
 
यानंतर शाळेतली ती भांडणं म्हणजे- जीवनातला पहिला खडतर अनुभव म्हणावा लागेल. बेंचवर बसण्याच्या जागेपासून ते पीटीच्या तासाला लागलेला धक्का, अशा क्षुल्लक कारणांवरून होणारी ती भांडणं.. त्यात दिलेली ती पहिली-वहिली शिवी आणि नंतर शिक्षकांसमोर गुन्हेगारासारखं उभं राहून झालेली कारवाई सारं काही आजही मनाच्या एका कोपर्‍यात एक वेगळी जागा करून आहे. यानंतर काही गुलाबी आठवणीही तितक्याच आपल्याला प्रिय आहेत. म्हणजे खूप असं काही नाही, पण तास चालू असताना आपल्या आवडत्या व्यक्तीकडे कोणालाही न समजता ते बघणं आणि इतरांकडून तिच्या नावाने आपल्याला चिडवलं जाणं. सारंच गोड आणि तितकंच प्युअर.. या सगळ्यासोबतच प्रोजेक्टच्या नावाखाली जमलेली ती आपली मित्रमंडळी आणि रंगलेल्या त्या गप्पा.. मित्राच्या डब्यातील आपली आवडती भाजी बघून अदला-बदली केलेला तो डबा.. ऐनवेळी तसाच्या तसा मित्राच्या वहीतील आपल्या वहीत उतरवलेला तो गृहपाठ.. सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तशाच्या तशा आहेत. आजही त्या आठवणी आठवून त्या आठवणी, ते क्षण, ते प्रसंग आपण पुन्हा एकदा अनुभवावेत असं आपल्या सर्वानाच वाटते..
 
 
पण, या सार्‍या आठवणी पुन्हा ताज्या होतात, त्या आपल्या आजूबाजूच्या लहानग्यांना पाहून. तसेच काही चित्रपटही यासाठी खास तयार करण्यात आले आहेत. ते म्हणजे शाळा, बालक-पालक, टाईमपास, कट्टी-बट्टी हे चित्रपट पाहिले तरी पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटतं. पण, आता हे चित्रपट शांतपणे पाहायला तरी कुठे वेळ आहे, आता आपण आपल्या कामात सो कॉल्ड इतके बिझी झालो आहोत, की- आपल्याला आपल्याकडेच लक्ष द्यायला वेळ नाहीये. सहा तासांच्या शाळेची जागा आता आपल्या जीवनात आठ तासांच्या नोकरीने घेतली आहे. आता ते जीव लावणारे मित्रही नाहीत आणि ती मजाही नाही.. प्रत्येक दिवशी फक्त एकच विचार मनात येतो, की- पुन्हा कधी ते दिवस जगायला मिळतील का? पुन्हा कधी ते शाळेचे सहा तास एक दिवस तरी अनुभवायला मिळतील का? पण, या प्रश्नांची उत्तरं एकाच ओळीत मिळून जातात, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी..
संस्कृत शिक्षिका, सेंटर पॉईंट स्कूल, नागपूर