तरुणांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन

    दिनांक :20-Dec-2019
|
प्रा. मधुकर चुटे
आपल्या समाजामध्ये, लग्न करू पाहणार्‍या कोणत्याही मुलीला तुम्ही व्यवसाय करणारा एखादा मुलगा दाखविला, तर तुम्हाला तिच्याकडून बहुतांश वेळा नकारच ऐकू येईल. याचे कारण आपल्याकडच्या मुलींना व्यवसायापेक्षा नोकरी आजही सुरक्षित वाटते. विवाहाला उभ्या राहणार्‍या मुलींना अपेक्षित वर कसा असावा, हे विचारल्यावर त्या सरकारी नोकर हवा, हीच अट नेहमी घेऊन बसतात. म्हणून खेदाने आजच्या मुलींची मानसिकता ‘व्यवसाय मालक नको गं बाई, मला नोकर हवा गं बाई’ अशी झाली आहे. 

sang_1  H x W:
 
 
पूर्वीच्या काळात ‘उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि तिय्यम नोकरी’ असे म्हटले जात होते. पण, पुढील काळात शेतीमधल्या समस्या वाढत गेल्या. चांगल्या नोकर्‍या उपलब्ध व्हायला लागल्या आणि लोक चांगल्या नोकर्‍या हे चांगले करीअर म्हणून गृहीत धरू लागले. तेव्हा लोक चुकीचे होते असे म्हणता येणार नाही. कारण नोकरी ही शाश्वती देत होती. माणसाच्या उत्पन्नात एक सातत्य होते. तसा त्याचा विश्वास होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी उत्तम नोकरी असे मानले गेले ते चुकीचे नव्हते. विवाह करू इच्छिणार्‍या आपल्या मुलीस वडीलसुद्धा चांगली नोकरी करणारा, सरकारी नोकरीत असणारा मुलगा पाहून देत असत. मात्र, आज परिस्थिती बदलली असली, तरी वधू आणि वधूपिता यांची मानसिकता बदललेली दिसून येत नाही.
 
 
आज आपण सगळे एकविसाव्या शतकात आलो आहोत. तंत्रज्ञानाची मोठी प्रगती झालेली आहे. सगळे जग एक बाजारपेठ झाले आहे. बाजाराच्या नियमानेच ते चालते आहे. त्यामुळे नोकर्‍यांची शाश्वती राहिलेली नाही. सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. आजचे बहुतेक तरुण हे खाजगी क्षेत्रात नोकरी करणारे आहेत. खाजगी क्षेत्रातल्या नोकर्‍यांचीसुद्धा आज शाश्वती राहिलेली नाही. कायम असणार्‍या नोकर्‍या उरलेल्या नाहीत. वर्षभराचा किंवा दोन ते तीन वर्षांचा बॉण्ड करून नोकर्‍या दिल्या जातात. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही अचानकपणे बंद पडतात आणि हजारो जणांना नोकरीला मुकावे लागते. अशा चित्रविचित्र स्थितीत नोकर्‍यांचा अट्टहास धरणे हे शहाणपणाचे नाही. ही बाब मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
 
 
लहान-मोठे व्यवसाय-उद्योग उभारून ते योग्य रीत्या चालवून चांगली कमाई करणार्‍या तरुणांमधील उद्यमशीलता, चिकाटी, कष्ट घेण्याची वृत्ती पाहून मुलींनी आनंदाने आपला साथीदार निवडून लग्न करायला पाहिजे. कारण हीच मुले उज्ज्वल व यशस्वी भविष्य देऊ शकतात. मात्र, दुर्दैवाने असे लहान-मोठे व्यवसाय-उद्योग करणारे चांगली कमाई करत असले, तरी लग्नाच्या बाजारात दुय्यम ठरत आहेत. याला केवळ आपली मानसिकता, आपला उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. आधीच मराठी माणूस उद्योग-धंद्यात कमी प्रमाणात आढळतो. त्यातून विवाहाच्या या समस्येमुळे उद्योगांपेक्षा कुठेतरी नोकरीला चिकटण्याची वृत्ती आपल्या तरुणांमध्ये साहजिकपणे वाढीस लागते. पुढील काही वर्षांमध्ये नोकर्‍यांचे प्रमाण कमी होत जाईल. कदाचित रोजंदारीवर अनेक कामे मिळू लागतील. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे असे होणे स्वाभाविक आहे. रोजंदारी कामगाराप्रमाणे नोकरांना त्या दिवशी पैसे दिले जातील. काम देणार्‍या संस्था काम देण्याची हमी घेणार नाहीत. अशा वेळी उद्यमशील तरुणच समाजात मानसन्मान मिळवू शकणार आहेत. हे विशेषकरून मुलींनी लक्षात घ्यायला पाहिजे.
 
 
म्हणून अशा व्यावसायिक-उद्योगशील तरुणांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. लग्नाच्या बाजारात उद्यमशील तरुणांचा भाव वधारला, तर कदाचित उद्योगाकडे वळणार्‍या आपल्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल आणि मराठी माणूस उद्योगाकडे वळत नाही, हा आपल्यावर लागलेला ठपकाही पुसला जाऊ शकेल. नव्या युगाला सामोरे जायचे असेल, तर हा नवा दृष्टिकोन अंमलात आणल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.