कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने दीपिकाला सोडले मागे!

    दिनांक :20-Dec-2019
|
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. दोघांचीही ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीला तोड नाही. यातच त्यांच्या लोकप्रियतेचे कारण दडलेले आहे. तूर्तास या कपलने फोर्ब्स इंडिया मॅगझिनच्या टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये स्थान मिळवले आहे. फोर्ब्स इंडियाने यावर्षात सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत रणवीर 7 व्या क्रमांकावर असून दीपिका 10 व्या स्थानी आहे. याचा अर्थ कमाईच्या बाबतीत रणवीरने पत्नी दीपिकाला मागे सोडले आहे.
 
 
ranveer-deepika_1 &n 
 
मागच्या वर्षी मात्र दीपिका या यादीत 4 व्या क्रमांकावर होती, तर रणवीर सिंग 8 व्या क्रमांकावर होता. पण, एकाच वर्षांत चित्र बदलले. रणवीरने यंदा 8 व्या क्रमांकावरून 7 व्या क्रमांकावर उडी घेतली. याचा अर्थ तो केवळ एक पायरी वर चढला. पण दीपिका मात्र गतवर्षी 4 व्या स्थानी असताना यंदा ती थेट 10 स्थानावर घसरली. याचे कारण म्हणजे 2019 मध्ये अद्याप दीपिकाचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. याऊलट, रणवीर मात्र 2018 ते 2019 बॅक टू बॅक हिट देत सुटला. पद्मावत, सिम्बा, गली बॉय हे त्याचे तीनही चित्रपट हिट राहिले.
 
रणवीर व दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाले, तर दोघेही लवकरच ‘83’ या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. ‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. याशिवाय दीपिका ‘छपाक’ या सिनेमात दिसणार आहे.