कमी रक्तदाबाचे दुष्परिणाम

    दिनांक :20-Dec-2019
|
हायपोटेन्शन किंवा कमी रक्तदाब हा एक घातक विकार आहे. या स्थितीत धमन्यांमधला रक्तदाब खूप कमी होतो. उच्चरक्तदाबाप्रमाणे कमी रक्तदाबाचेही अनेक धोके आहेत. या विकाराची लक्षणं ओळखून वेळीच औषधोपचार करणं गरजेचं असतं. कमी रक्तदाब म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणं कोणती? याबाबत माहिती घेऊ या. 

bp _1  H x W: 0 
 
120/80 पेक्षा जास्त आणि 140/90 पेक्षा कमी रक्तदाब आदर्श मानला जातो. रक्तदाबाचं वरचं मानक म्हणजे हृदयाचे ठोके पडतानाचा धमन्यांमधला दाब तर खालचं मानक म्हणजे दोन ठोक्यांदरम्यानचा धमन्यांमधला दाब. वरच्या मानकाला सिस्टॉलिक प्रेशर म्हणतात तर खालच्या मानकाला डियास्टॉलिक प्रेशर असं म्हणतात. या दोन्हींपैकी एक दाब आदर्श मानकापेक्षा कमी असेल तर कमी रक्तदाबाची समस्या असू शकते.
 
 
दिवसभर रक्तदाबात चढउतार होत असतो. यामागे बरीच कारणं असतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर अशक्तपणा, थकवा, गरगरणं अशा समस्या निर्माण होतात. यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयाशी संबंधित विकार यास कारणीभूत ठरू शकतात. गरोदर महिलांना कमी रक्तदाबाची समस्या सतावू शकते. अतिरक्तस्त्राव, थायरॉइड, रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी होणं, मधुमेह, ‘बी 12’ जीवनसत्त्व आणि फोलेट या घटकांची कमतरता, शरीरातलं सोडियमचं प्रमाण कमी होणं ही देखील कमी रक्तदाबाची काही कारणं आहेत. चक्कर येणं, मळमळ, एकाग्रता कमी होणं, थकवा, अंधुक दिसणं, डोकं जड होणं, गरगरणं ही या विकाराची सर्वसाधारण लक्षणं आहेत. तीव्र स्वरूपाचा कमी रक्तदाब असल्यास नाडीच्या ठोक्यांची गती वाढणं, अशक्तपणा, गोंधळलेली मनस्थिती (विशेषत: ज्येष्ठांमध्ये) त्वचेचा रंग बदलणं, श्वासाची गती वाढणं आदी लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं दिसत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
 
 
मद्यपान टाळणं, उष्ण हवामानात तसंच आजारी असताना पाण्याचं प्रमाण वाढवणं, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं, नियमित व्यायाम करणं, आहारात मीठाचं प्रमाण वाढवणं, गरम पाण्याशी फार संपर्क येऊ न देणं, कर्बोदकांचं प्रमाण कमी करणं, जेवणानंतर आराम करणं, एका वेळी कमी प्रमाणात खाणं आदी उपायांनी कमी रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येईल. पप