मी नवा आहे! मी नवा आहे!

    दिनांक :21-Dec-2019
|
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांचे पिताश्री म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आणखी एक ‘शब्द’ दिल्याचे गुरुवारी विधानसभेत उघड झाले. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन’ हा पहिला शब्द दिला होता, हे आधीच कळले होते. आता ‘भाजपाची पालखी कायम वाहणार नाही,’ असा दुसराही शब्द दिल्याचे समजले. तसेही, पालखीचे भोई बनण्यात खूप काही कमीपणा आहे, असे नाही. पन्हाळगडाहून रात्री भरपावसात ‘लाखाचा पोिंशदा’ छत्रपती शिवरायांना विशाळगडावर सुखरूप नेणारे पालखीचे भोईच होते. इतिहासात त्यांचे नाव नसेल; परंतु अखिल हिंदुस्थान या भोयांप्रती कृतज्ञ आहे. सांगण्याचा मुद्दा हा की, जे नियतकर्म वाट्याला आले ते निष्ठेने पार पाडणे, यात कुठलाही कमीपणा नाही. आता कुणाची पालखीत बसण्याची नियती असते, तर कुणाची भोई बनण्याची. लोकशाहीत ही नियती, जनता ठरवीत असते. तसेही, पिताश्रींना शब्द दिला होता म्हणून मग लगेच केवळ 56 आमदारांच्या बळावर पालखीत बसण्याचे स्वप्नही बघायचे नसते, महाराज! असो.

uddhav thackrey 21 dec_1&
 
हे सर्व पालखीपुराण, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना निघाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे हे धन्यवाद प्रस्तावावरील भाषण, तसे पाहिले तर राज्य सरकारची दिशा दर्शविणारे पहिलेच भाषण होते. त्यामुळे जनतेत उत्सुकता होती. परंतु, या भाषणाने निराशाच पदरी पडली. इतके ते भरकटलेले होते. विरोधी पक्ष तर तुम्हाला विचलित करणारच, भरकटवणारच. पण म्हणून आपण भरकटायचे का? उद्धव ठाकरे हे आता, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण करणारे एखाद्या पक्षाचे प्रमुख नाहीत. ते महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक कृती ही महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारी असते. परंतु, याचे भान नसलेले हे भाषण होते. विरोधकांनी मोठ्या चातुर्याने ओढलेली रेष पुसण्यातच त्यांचे भाषण संपले. राज्यकर्त्याने मोठी रेष काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याबाबतीत सध्या ते ज्यांच्या आश्रयाला गेले आहेत, त्या शरद पवारांचा आदर्श ठेवू शकतात.
धन्यवाद प्रस्तावावरील भाषणात, मुख्यमंत्र्यांनी आपले सरकार वर्षभर कुठल्या दिशेने कार्य करणार आहे, त्याचा ओझरता उल्लेख न करता, एक निश्चित आराखडा जनतेसमोर ठेवायचा असतो. भाषणातून टीकाटिप्पणी, कोपरखळ्या, टोले हे चालणारच. परंतु, त्याचे स्थान जेवणातील चटणी-कोिंशबिरीइतकेच असायला हवे. सत्तेचा थेट अनुभव नाही, हे रडगाणे किती गायचे ते गावे, परंतु परिपक्वता सत्ताधीश झाल्यावरच येते, असे थोडेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सत्तेचा थेट अनुभव नसला, तरी त्यांच्या भाषणात जी एक परिपक्वता दिसायला हवी, ती काही दिसली नाही, हे नमूद करायलाच हवे.
 
दुसरे म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या मागे संपूर्ण सत्तारूढ पक्ष ठामपणे उभा आहे, असेही या भाषणात जाणवले नाही. प्रारंभी, काही वाक्यांवर सत्तारूढ पक्षाने बाके वाजविलीत. परंतु, नंतर मात्र एकटे आदित्य ठाकरेच मेज थपथपविताना दिसले. ‘‘आम्ही मनाने एकत्र आलो आहोत,’’ असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असतानाच्या पृष्ठभूमीवर हे दृश्य केविलवाणे तर होतेच, शिवाय महाविकास आघाडीत सहभागी पक्ष मनाने किती एकत्र आले आहेत, याची विदारक वस्तुस्थितीही दर्शविणारे होते. भाषणाच्या शेवटी शेवटी मुख्यमंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आले. सावरकरांच्या विचारांचे दाखले देत मुख्यमंत्र्यांनी भाजपाला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. सावरकरांचे गायींबद्दलचे मत भाजपाला मान्य आहे का? असा प्रश्न केला. मुळात मुद्दा सावरकरांची मते, विचार मान्य असण्याचा नव्हताच कधी. देशासाठी त्यांच्या असीम त्यागाचा, जाज्वल्य देशभक्तीचा मुद्दा होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या नावाने स्वत:च्या बँक खात्यातून अकरा हजार रुपये देणगी दिली, ती सावरकरांचे विचार मान्य होते म्हणून नाही. स्वातंत्र्य चळवळीतील सावरकरांच्या भरघोस योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून ती ‘फूल ना फुलाची पाकळी’ होती. मग भाजपा जर, कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांच्या केलेल्या अपमानावर तीव्र आक्षेप घेत असेल, तर याचा अर्थ त्या पक्षाला सावरकरांचे सर्व विचार मान्य आहेत, असा होत नाही. विचारभिन्नतेला मान्यता या भारताच्या मातीतल्या तत्त्वाला भाजपाही मान देते आणि म्हणूनच भाजपाने राहुल गांधींच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या प्रतिक्रियेची मागणी केली होती. ‘वडिलांना दिलेला शब्द कुठल्याही स्तराला जाऊन पूर्ण करण्याच्या’ हट्‌टापायी, आपण आपल्या वैचारिक पायव्याला खोदत आहात, हे भाजपाला निदर्शनास आणून द्यायचे होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर सत्तेच्या हव्यासापोटी विचारांना तिलांजली देण्याचा हा प्रकार होता आणि भाजपाने तो उघड केला. त्यावर भाजपालाच प्रतिप्रश्न करण्याऐवजी, मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना सहज पटणारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करायला हवी होती.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविताना सर्वात अडचणीचा जो मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे, अतिवृष्टिग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील अतिवृष्टिग्रस्तांप्रती सहानुभूती दाखविण्यासाठी, उद्धव व आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी शेतीच्या बांधांवर जाऊन त्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांना वाटले असावे की, शिवसेनेचा काही मुख्यमंत्री होत नाही. त्यामुळे करून टाकावी मागणी. म्हणजे येणार्‍या सरकारला छळण्यासाठी हा मुद्दा बरा राहील. परंतु, योगायोगाने त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आता आपणच मोठ्या शहाजोगपणे केलेली मागणी स्वत:लाच पूर्ण करण्याची पाळी आली. विरोधी पक्षांनी हे अचूक हेरले आणि या मुद्यावरून सरकारला विशेषत: मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री िंचताग्रस्त दिसतात, ते यामुळेच असावे. सुमारे 93 लाख हेक्टरला प्रती हेक्टर 25 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. या रकमेची तजवीज करण्याची धडपड सोडून, मुख्यमंत्री विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यातच वेळ दडवत असल्याचे चित्र दिसत आहे. पुरवणी मागण्या मंजूर करताना, या मदतीसाठी काही रकमेची तरतूद त्यात करता आली असती. तसेच भरपाईसाठी एखादा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करता आला असता. पण तसे काही झाले नाही. उलट, ‘‘शेतकर्‍यांच्या मदतीसाठी इथे बोंबा ठोकण्यापेक्षा केंद्र सरकारसमोर जाऊन शिमगा करा,’’ असे विधान त्यांनी केले. शेतकर्‍यांना द्यायची भरपाई केंद्र सरकारच्या मदतीवर होती, तर शेतीच्या बांधावर जाऊन केलेली घोषणा मोदी सरकारला विचारून केली होती का? श्रेय लाटण्यासाठी घोषणा तुम्ही करायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी भाजपाने धावपळ करायची, हा कुठला न्याय? राज्यातील जनता आणि विशेषत: शेतकरी ही फसवणूक सजगतेने बघत आहे, याचे भान मुख्यमंत्र्यांनी ठेवलेले बरे.
थोडक्यात काय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे भाषण राज्यातील जनतेला कुठलाच दिलासा देणारे नव्हते. ‘एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला,’ एवढाच एक दिलासा सर्व जनतेने मान्य करावा, हे ठासून सांगणारे हे भाषण होते. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ याची तर तुम्ही भरपूर खिल्ली उडवलीत; परंतु आता तुम्ही ‘मी नवा आहे’ हे पालुपद आळवू लागला आहात. या पालुपदावर आणि या दिलाशावर जनता किती काळ झुलते ते बघायचे...