'दबंग ३'ची पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई

    दिनांक :21-Dec-2019
|
मुंबई,
सलमान खानचा बहुप्रतीक्षीत 'दबंग ३' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २४ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. अशा परिस्थितीत पहिल्याच दिवशी २४ कोटींची कमाई करणे यातच 'दबंग ३'चे यश आहे, असे मानले जात आहे.

dabang_1  H x W
 
 
boxofficeindia.com यांनी हा चित्रपट पहिल्या दिवशी २२ ते २४ कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली होती. एका अन्य अहवालानुसार, देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे या चित्रपटाला १५ ते २० टक्क्यांचे नुकसान झाले आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा चित्रपट २५ कोटींचा आकडा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, तो पल्ला हा चित्रपट गाठू शकला नाही. काही ठिकाणी चित्रपटगृहे लवकर बंद करण्यात आली. चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे नसल्याचे काही अहवालातून सांगण्यात आले आहे.
'दबंग ३' चित्रपट तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांतूनही प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, यातून चित्रपटाला फारशी चांगली कमाई झालेली नाही. अन्य भाषा आणि मुख्य हिंदी भाषेतील मिळून या चित्रपटाची एकूण कमाई २५ कोटींचा आकडा पार करू शकलेली नाही. 'दबंग ३' चित्रपट प्रीक्वेल प्रकारातील चित्रपट असून, सलमान खानचा चुलबुल पांडे बनण्याचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. या तिसऱ्या भागात सलमान खान मुख्य भूमिकेत असून, सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, किच्चा सुदीप, टीनू आनंद, महेश मांजरेकर, नवाब शाह, वरीना हुसैन, डिंपल कपाडिया यांच्याही भूमिका चित्रपटात आहेत. प्रभूदेवा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दरम्यान, 'दबंग ३' चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच लीक झाला आहे. तमिलरॉकर्सने हा सिनेमा ऑनलाइन लीक केला. चित्रपट लीक करण्यासाठी तमिलरॉकर्सने 'दबंग ३' ची डाउनलोड लिंक आपल्या वेबसाइटवर शेअर केली. हा चित्रपट लीक होऊ नये, यासाठी सलमानने खूप प्रयत्न केले होते. इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानही खूप काळजी घेतली होती. लोकांना खूप गोष्टींसाठी अटकाव करण्यात आला होता.