केवळ रंगकर्मी नव्हे, खरा रंगधर्मी!

    दिनांक :22-Dec-2019
|
प्रकाश एदलाबादकर
 
 
मला या सर्व प्रश्नांचं उत्तर एक दिसतं की, आपण कुणीही नाट्यधर्मी नाही आहोत. म्हणजे आपण वाचतो की, एका नाटककाराने किती ड्राफ्टस्‌ केले, किती मेहनत घेतली, तो कसा तहानभूक विसरून त्या नाटकाच्या मागे लागला. प्रयोग बघितल्यानंतर, संपल्यानंतर पुन्हा त्या नाटकात सुधारणा केल्या. एखाद्या ध्येयवादी माणसासारखी त्याच्या मागे ती गेलेली असतात. तसं मला वाटतं की, ती वृत्तीच आपल्या एकूण भारतीयांमध्ये दिसत नाही. ते नट असोत, लेखक असोत, आमचे रंगकर्मी असोत किंवा आणखी कुठल्याही क्षेत्रामध्ये असोत की जसं टोटल डेडिकेशन लागतं. जे केलं नाही त्याच्याच पाठीमागे इतकं जायचं की, मग बाकी काही नाही. पहिली प्रायोरिटी त्याला. बाकी माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज त्याच्यानंतर. माझं जगणंसुद्धा. माझं खाणंपिणंसुद्धा. अशी माणसं इथपर्यंत जातात, असा माझा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्या हातून एवढं मोठं काहीतरी निर्माण होतं. नाटक हा धर्म म्हणून आम्ही स्वीकारलेलाच नाही. 
 
sangpt_1  H x W 
 
नोव्हेंबर 2000 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘नाटक’ या नियतकालिकाच्या अंकात प्रा. महेश एलकुंचवार यांनी डॉ. श्रीराम लागू यांची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्या मुलाखतीत एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. लागूंनी वरील उद्गार काढलेले आहेत. मुळात ती मुलाखत नाहीच. समकालीन नाट्यव्यवहारावर दोन प्रतिभावंतांनी केलेली मूलाग्राही चर्चा आहे. डॉ. लागूंनी आपली मते या चर्चेत अत्यंत स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मांडली आहेत. त्यातले ‘नाटक हा धर्म म्हणून आम्ही स्वीकारलेलाच नाही,’ हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या मुलाखतीला आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत. आपण कुठपर्यंत पोचलो, याचा विचार रंगकर्मी म्हणवणार्‍या प्रत्येकाने करायला हवा. रंगकर्मी होण्यापेक्षा रंगधर्मी होण्याचा डॉक्टरांचा संदेश हा आजही विचार करण्यासारखा आहे. ‘रंगधर्मी’ हा डॉक्टरांचा अत्यंत आवडता शब्द होता. त्यांच्या पॉल म्युनीवरच्या पुस्तकाचे शीर्षकच त्यांनी ‘रंगधर्मी’ असे ठरवून टाकले होते.
 
‘नटसम्राट’ या नाटकातील गणपतराव बेलवलकरांची भूमिका बघितल्यावर आपल्याही तोंडून सहजच उद्गार बाहेर पडतात- ‘‘नाटक हे असं असतं राजा!’’ डॉ. लागू ज्यावेळेस रंगभूमीवर आले तो काळ रंगभूमीच्या संक्रमणाचा होता. काहीतरी नवीन करणार्‍यांची धडपड त्या वेळी नाट्यक्षेत्रात सुरू होती. विचार आणि कृती पक्की होती. ज्या काळात अलकाझी, सत्यदेव दुबे, भालबा केळकरांची पीडीए, नवे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होते त्या काळातच डॉक्टरांचा नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीची पदवी मिळाली. नाक, कान, घसा यातील व्याधींचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळविले. परंतु, डॉक्टरांचे मन त्यात रमले नाही. पुण्यासारख्या शहरातील उत्तम चालणारी प्रॅक्टिस सोडून डॉक्टर नाट्यक्षेत्राकडे वळले. पेशंटची नाडी तपासण्यापेक्षा त्यांना रसिक प्रेक्षकांची नाडी खुणावू लागली. काहीतरी वेगळे करणे हा तर उद्देश होताच, परंतु काहीतरी वेगळे घडविणे ही तळमळ होती. रंगभूमीला पारंपरिक जोखडातून नुसते बाहेर काढून उपयोग नव्हता, तर नव्या विचारांची तिच्याशी सांगड घालायची होती. 
 
शालेय, महाविद्यालयीन, स्पर्धात्मक अशा अनेक लहान-मोठ्या रंगमंचांवर डॉक्टर वावरले. अनुभव गोळा करीत गेले. वाचन आणि अभ्यास यातून स्वतःला घडवीत गेले. डॉक्टर हे उच्चविद्याविभूषित होते. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेशी ते वैचारिक पातळीवर संवाद साधत. अर्थात, ही बाब फार मोठी आहे. त्या पात्राच्या, त्या भूमिकेच्या नेमक्या काय मागण्या आहेत, हे अशा संवादातून साध्य होते.
  
प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘वेड्याचं घर उन्हात’ या नाटकातील दादासाहेबांच्या व्यक्तिरेखेने डॉक्टरांना असेच झपाटून टाकले. दादासाहेबांचा विलक्षण गुंतागुंतीचा मनोव्यापार त्यांनी विलक्षण ताकदीने रंगमंचावर उभा केला. ही तर सुरुवात होती. रंगमंचावर अभिनय करणार्‍याचे वैचारिक जगही समृद्ध असायला हवे. त्यासाठी साहित्याचे वाचन, समकालीन प्रयत्नांची दखल, कोशातून बाहेर पडणे, डोळस निरीक्षणाने भवताल न्याहाळणे, हे सर्व कलावंताला करावेच लागते. किंबहुना त्याने ते केले नाही तर त्याचे कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व कायमचे तोकडे राहते. अशा बुद्धिमत्तेच्या परंपरेतूनच अभिनेता घडत असतो, याची जाणीव डॉक्टरांना होती. किंबहुना रंगभूमीवरील त्यांच्या प्रवेशामुळे समकालीन आणि नव्या कलावंतांना तो एक वस्तुपाठ ठरला. आपल्याला मिळणारी प्रसिद्धी आणि सर्वत्र होणारे कौतुक यात अनेक कालावंत वाहवत जातात. अशी अनेक उदाहरणे या क्षेत्रात आहेत. कलावंत अशा बाबींमध्ये गुरफटला की, त्याच्या उताराला सुरुवात होते. परंतु, डॉक्टर या सर्व गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहिले. आपल्या अभिनयात जो संयम त्यांनी दाखविला तो व्यवहारातही दाखवला. ज्या आपल्या संयत अभिनयशैलीचे एवढे कौतुक होते, ती शैली आपल्याला बा. सी. मर्ढेकरांनी दिली, असे आपल्या आत्मचरित्रात लिहिताना डॉक्टरांनी अभिनेत्यांना एक संदेशच दिलेला आहे. ते लिहितात- 
 
‘नाटकातलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द या सार्‍या आशयानं भरलेल्या कुप्या आहेत. नुसत्या कुप्या प्रेक्षकांवर फेकून काही साध्य होत नाही. त्या कुप्या, बोलता बोलता सहज उघडून त्यात भरलेला आशय प्रेक्षकांवर उधळता आला पाहिजे. ‘काळ्यावरती जरा पांढरे’ करता आले पाहिजे. अंधारावर प्रकाशाने लिहिता आले पाहिजे. त्याकरता ‘हृदय भरून आले’ पाहिजे. ‘शरीर पिळून घाम निघाला’ पाहिजे आणि शब्दांच्या तोंडामध्ये तुझा गच्च लगाम बसला पाहिजे. शब्दांचे कुणी करोत चमचे ‘आ’ बनले हे सारे अंतर! त्या ‘आ’ बनलेल्या अंतराने सारा आशय शोषून घेता यायला हवा. तरच उगीच आवाजाची उधळमाधळ न करता आशय प्रेक्षकांपर्यंत अलगद नेमकेपणाने पोहोचेल. शब्दांना अर्थाचे धुमारे फुटत राहतील आणि प्रेक्षकांना किती वेचू आणि किती नाही असे होऊन जाईल.’ 
 
उगाचच नको ते अंगविक्षेप म्हणजे अभिनय आणि निष्कारण आरडाओरडा म्हणजे डायलॉग डिलिव्हरी, असे समजणार्‍यांनी डॉक्टरांनी सांगितलेले हे पथ्य पाळायला हवे. वाचिक अभिनयाचे तर ते आदर्शच होते. आजच्या बहुतांश नाटकांत शुद्ध, स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारांची वानवाच असते. आवाजातील चढउतार, आरोह-अवरोह यांना स्थानच नाही, अशांनी डॉक्टरांचे वाचिक अभिनयावरचे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. 
 
1951 साली ‘उद्याचा संसार’ या आचार्य अत्रे लिखित आणि प्रा. भालबा केळकर दिग्दर्शित नाटकातून रंगभूमीवर प्रवेश करणार्‍या या लोकोत्तर अभिनेत्याने 2003 पर्यंत विविध त्रेचाळीस नाटकांमधून भूमिका केल्या. डॉ. शिरीष आठवले लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘मित्र’ हे डॉक्टरांचे शेवटचे नाटक! याशिवाय दोन इंग्रजी आणि एका गुजराती नाटकातही त्यांनी भूमिका केली आहे. प्रत्येक भूमिका वेगळी. संभाजी, गणपतराव बेलवलकर, महर्षी कर्वे... अशी कितीतरी नावे घेता येतील. प्रत्येक भूमिकेत डॉक्टरांचे वेगळेपण आणि शैली जाणवते. ‘आत्मकथा’, ‘गार्बो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘मी जिंकलो मी हरलो’, ‘काचेचा चंद्र’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘क्षितिजापर्यंत समुद्र’, ‘दुभंग’... अशी किती नाटकांची नावे घ्यावीत! मराठी आणि हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. ‘सिंहासन’, ‘सामना’ आणि ‘पिंजरा’ कुणी विसरूच शकत नाही! डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून नाटकासारख्या बिनभरवशाच्या खडतर वाटेवरून आपण का गेलो, याविषयी ते लिहितात-
  
‘बाकी सगळ्या वाटा सोडून मी ही रंगभूमीची निबिड जंगलातून जाणारी खडतर, तरीही रमणीय वाट पकडली आणि आयुष्यभर त्या वाटेने प्रवास करीत राहिलो ते काही केवळ स्वतःला आनंद मिळावा, समाधान मिळावे एवढ्या माफक हेतूने नव्हे. तर रंगभूमी या माध्यमाचे समाजाच्या सांस्कृतिक जीवनात जे महत्त्वाचे स्थान आहे आणि त्या स्थानावरून ती आज भ्रष्ट झालेली दिसते ते स्थान तिला मिळवून द्यावे, या महत्त्वाकांक्षेनेदेखील!’ 
 
डॉक्टर हे प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी आणि समाजशील कलावंत होते. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी ‘लग्नाची बेडी’ चे प्रयोग महाराष्ट्रात केले होते. ‘परमेश्वराला रिटायर करा’ या त्यांच्या वाक्याने एके काळी महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. त्यांच्या वैचारिक भूमिकेशीही ते तितकेच प्रामाणिक राहिले, जितके की नाटकातल्या भूमिकांशी! अभिनेता हा शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही पातळ्यांवर संपन्न असावा, हा त्यांचा आग्रह होता. नाटक हा डोळ्यांनी आणि कानांनी करावयाचा यज्ञ आहे, हे महाकवी कालिदासाचे वचन डॉक्टरांच्या लेखी जेवढे महत्वाचे होते तेवढेच- ’’AN ACTOR SHOULD BE AN ATHLETE PHILOSOPHER.’’ या वचनावरही त्यांची श्रद्धा होती. शेवटी अभिनेत्याचे शरीर हेच त्याचे भांडवल असते. त्याची निगा त्याने राखालीच पाहिजे आणि त्या शरीराच्या भरोशावरच सगळा खेळ असतो. म्हणून डॉक्टरांचे दुसरे आवडते वचन होते-‘YOU ARE THE INSTRUMENT AND YOU ARE THE PLAYER!’’ हे सर्व साधण्यासाठी आपण केवळ रंगकर्मीच नव्हे, तर खर्‍या अर्थाने रंगधर्मी झाले पाहिजे, हाच त्यांचा आग्रह होता. अशा बुद्धिमान आणि तेजस्वी अभिनेत्याच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरील एका युगाचा अस्त झाला आहे, हे निःसंशय! त्यांचा परिपक्व अभिनय आणि त्यामामागील रंगनिष्ठ वृत्ती ही नव्या पिढीने समजून घ्यायला हवी.
 
 
••