रामजन्मभूमीचे तारणहार सवाई जयसिंह!

    दिनांक :22-Dec-2019
|
विनोद देशमुख
  
सुमारे पाचशे वर्षे वादग्रस्त आणि संघर्षग्रस्त बनलेल्या अयोध्येच्या प्रसिद्ध रामजन्मभूमीत त्याच जागी रामाचा जन्म झाला कशावरून... इथपासून ते हिंदू पद्धतीनुसार रामजन्म कौसल्या राणीच्या हरयाणातील माहेरी झाला असावा... इथपर्यंत आणि मुळात राम झालाच कशावरून, असा रामाच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा मुद्दा काढत अकलेचे तारे तोडणार्‍या विद्वानांनी सतत अडथळे आणूनही शेवटी रामजन्मभूमीवरील मंदिराचा मार्ग मोकळा झालाच. त्यादृष्टीने 9 नोव्हेंबर 2019 हा दिवस इतिहासात नोंदला गेला. कारण, याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी एकमताने निर्णय देत वादग्रस्त 2.77 एकर जागा मंदिरासाठी दिली आणि मशिदीसाठीही स्वतंत्र 5 एकर जागा देऊ केली. आधीचे मंदिर तोडून त्यावर बाबरी मशीद उभारण्यात आली असल्याचे सबळ पुराव्यानिशी सिद्ध झालेले असतानाही, मशिदीला वेगळी जागा देण्याचा निर्णय भारताच्या संतुलित न्यायव्यवस्थेचा आणि सहिष्णू मानसिकतेचा निदर्शक आहे. हे लक्षात न घेता काही लोकांनी या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, आपल्या सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने अशा सर्व याचिका फेटाळून लावल्या. राममंदिरासाठी ट्रस्टची स्थापना आणि मशिदीच्या जागेची निवड, हे दोन महत्त्वाचे मुद्दे अजूनही बाकी आहेत. त्यानंतरच हा पाच शतकांचा प्रश्न खर्‍या अर्थाने सुटला, असे म्हणता येईल.
 

po_1  H x W: 0   
 
सवाई दूरदृष्टी
हा प्रदीर्घ वाद सोडविण्यात वेळोवेळचे संघर्ष, आंदोलने आणि न्यायालयीन लढाया यांची भूमिका असली, तरी त्याची सुरुवात राजपूत राजा (सवाई) जयसिंह द्वितीय यांनी तीनशे वर्षांपूर्वी केली, असे इतिहास सांगतो. हे तेच जयसिंह आहेत ज्यांनी आजचे जयपूर वसविले आणि पाच जंतरमंतरची देशभर उभारणी करून त्या काळी खगोलशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले. आधुनिक काळात अश्वमेध यज्ञ करणारे ते एकमेव राजे होते! हा यज्ञ त्यांनी एकदा नव्हे, दोनदा केला! औरंगजेबाने हिंदू समाजावर लादलेला जिझिया कर, तसेच गया यात्रेवरील कर रद्द करवून घेण्याची कामगिरीही याच जयसिंहांंच्या नावावर आहे. असा हा कर्तबगार राजपूत राजा अयोध्येच्या रामजन्मभूमीचा खरा उद्धारकर्ता आहे.

jaysinh _1  H x 
 
पहिला मोगल बादशहा बाबर याचा सेनापती मीर बाकी याने रामजन्मभूमीवरील मंदिर तोडून 1528 साली तेथे मशीद उभारली आणि मालकाला खुश करण्यासाठी तिला ‘बाबरी मशीद’ असे नाव दिले. (मंदिराचे पुरावे बाबरीच्या मलब्यात आणि उत्खननात जमिनीखाली सापडले आहेत. प्रामुख्याने त्यावर विसंबूनच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.) तेव्हापासून पुढचे दोन शतक ही जागा पूर्णपणे मुस्लिमांच्या ताब्यात होती. याला पहिला छेद दिला तो सवाई जयसिंहांंनी! औरंगजेबाच्या वारसांशी असलेले चांगले संबंध वापरून ही जागाच जयसिंहांंनी विकत घेतली. (1717) मशिदीच्या बाहेर (राम चबुतरा) रामाची मूर्ती स्थापून पूजाअर्चा सुरू करण्यात आली. ही व्यवस्था सुमारे दीडशे वर्षे कायम राहिली. परंतु, 1853 मध्ये पहिल्यांदा मालकीसाठी रक्तरंजित संघर्ष झडला. तोपर्यंत इंग्रजांनी हातपाय पसरले होते. त्यांनी या प्रकरणात दखल देत या 2.77 एकर जागेभोवती कुंपण घातले आणि दोन्ही गटांना त्यांची जागा वाटून दिली. (1859) त्या त्या भागात- म्हणजे मोकळ्या जागेत रामाची पूजा आणि मशिदीत नमाज हा सिलसिला पुढची नव्वद वर्षे सुरू होता.
  
22 डिसेंबर 1949
मधल्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने हिंदू समाजाच्या आशा बळावल्या. 1949 च्या डिसेंबरमध्ये संपूर्ण जागाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न हिंदूंनी केला. यावेळी मोठा संघर्ष झाला. अचानक 22 डिसेंबरच्या मध्यरात्री मशिदीच्या मधल्या घुमटाखाली रामलला अवतरित झाल्याची वार्ता सकाळी वार्‍याच्या वेगाने अयोध्येतील पंचक्रोशीत पसरली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही लोक मशिदीत बेकायदा घुसले आणि त्यांनी रामाची मूर्ती मधल्या घुमटाखाली बसविली, असा मशीदवाल्यांचा आरोप होता. दोन्ही पक्षांनी जागेच्या मालकीसाठी दिवाणी दावे दाखल केले. यात राज्य सरकारने अशी भूमिका घेतली की, प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने ही जागा वादग्रस्त बनली आहे. त्यामुळे आम्ही या जागेच्या संरक्षणासाठी कुंपणाला कुलूप ठोकत आहोत. तथापि, जैसे थे स्थिती कायम ठेवण्यासाठी रामललाची पूजा बंद दरवाजाच्या बाहेरून सुरू राहील. नमाज पढणे मात्र तेव्हा सुरूच नसल्याने बंद पडले. भविष्यासाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरले. तेव्हापासून पुढचे अर्धशतक लाखो भाविकांनी हा बंदिवासातील रामच पाहिला! 
 
या काळात ताला खोलो आंदोलनही झाले. परंतु, एकूणच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे काही होऊ शकले नाही. रामभक्तांना आपल्या आराध्याचे दर्शन गजाआडून घेण्यातच समाधान मानावे लागत होते. अखेर हे नष्टचर्य संपले 1986 साली! अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका याचिकेवर असा निकाल दिला की, कुलूप उघडून भाविकांचा मर्यादित प्रवेश मोकळा करावा. या निर्णयाने भगवान रामाचा बंदिवास संपला. साडेचारशे वर्षांनंतर रामजन्मभूमीवर रामललाची पूजाअर्चा पूर्वीसारखीच मोकळ्या वातावरणात सुरू झाली. आणि, तीनच वर्षांनी 1989 मध्ये शेजारच्या जागेत नवीन राममंदिराचा शिलान्यास करण्यात आला. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने शिलान्यासाला रीतसर परवानगी दिल्यामुळे, केन्द्रीय गृहमंत्री बुटािंसग आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी हे कॉंग्रेसनेते सोहळ्याला हजर राहिले. 
 
सर्वो(च्च)त्कृष्ट तोडगा
नंतरच्या मुलायमिंसह यादव सरकारने मात्र मंदिरविरोधी पवित्रा घेत कारसेवेला परवानगी नाकारली आणि रामभक्तांवर गोळ्या झाडल्या. पुढे काय झाले ते सर्वांना माहीत आहे. 6 डिसेंबर 1992 च्या सायंकाळी संतप्त रामभक्तांनी बाबरी मशिदीचे तीनही घुमट पाडून टाकले आणि त्या मलब्याशेजारीच एक तात्पुरते राममंदिर उभारले, जे गेले पाव शतक पुनर्निर्माणाच्या प्रतीक्षेत होते. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रतीक्षा नुकतीच (9 नोव्हेंबर 2019) संपवली आणि अतिशय उत्तम निर्णय देत मंदिरासोबतच मशिदीसाठीही जागा देऊन भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा गौरव वाढविला. मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे या दोघांचीही यात मोलाची भूमिका राहिली. आतातरी सर्वांनी हा प्रदीर्घ तिढा सोडविण्याच्या कामात हातभार लावला पाहिजे. 
 
रामजन्मभूमी मंदिराच्या पुनर्प्रतिष्ठापनेचे श्रेय न्यायालयापासून रामभक्तांपर्यंत अनेकांना आहे. पण, खरे मानकरी ठरतात ते अठराव्या शतकातील विलक्षण राजपूत महाराजा (सवाई) जयसिंह द्वितीय हेच! बाबराच्या सेनापतीने बळकावलेली रामजन्मभूमीची जमीन विकत घेण्याचे चातुर्य त्यांनी त्या वेळी दाखविले नसते तर पुढचे सारे प्रकरणच उद्भवले नसते. काळाच्या ओघात रामजन्मभूमीवरील मंदिर विस्मृतीत गेले असते आणि त्या जागेवर हिंदूंनी दावा करण्यासारखे काही अवशेषच जमिनीच्या वर दिसले नसते. मंदिराचे सत्य नेहमीसाठी जमिनीच्या आत दफन होऊन राहिले असते! सवाई जयसिंहांचे हे उपकार हिंदू समाजाने कधीही विसरायला नको. आपल्या हातून गेलेली रामजन्मभूमी परत मिळवून देण्याचे खरे श्रेय त्यांचेच आहे. त्यामुळेच त्यांचे छानसे स्मारक नवीन राममंदिराच्या परिसरात किंवा आसपास तरी व्हायला हवे, असे मला वाटते.
••