युरोपियन युनियनमधून बाहेर पडा : स्पष्ट जनादेश!

    दिनांक :24-Dec-2019
|
आंतरराष्ट्रीय
वसंत गणेश काणे  
 
डिसेंबर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ब्रिटनमधील पक्षोपपक्षांनी मिळविलेल्या जागा, मतांची टक्केवारी व ठोकळमानाने मतसंख्या पुढीलप्रमाणे आहे. ब्रिटिश पार्लमेंटमधील सर्व म्हणजे एकूण 650 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. बहुमतासाठी 326 जागा मिळणे आवश्यक आहे. तरुणाईच्या ट्विटरवरील ट्विवट्विवाटाला सपशेल चूक ठरवून बहुसंख्य प्रौढ मतदारांनी हुजूर पक्षाच्या (कॉन्झरव्हेटिव्ह) पदरात भरपूर जागांचे दान टाकले आहे. एवढेच नव्हे, तर मजूर (लेबर) पक्षाच्या अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यातदेखील मतदारांनी त्या पक्षाच्या उमेदवारांची दांडी उडविली आहे. ब्रिटिश तरुणाईने मात्र बहुसंख्येने मजूर पक्षाला मते दिली, असे मानले जात आहे. 
 
brexit _1  H x
 
बढत वा फटका
कॉन्झरव्हेटिव्ह (हुजूर) पार्टीने बोरिस जॉनसन यांच्या नेतृत्वात 365 जागा व 43.6 टक्के म्हणजे 1 कोटी 40 लाख मते मिळविली आहेत. पार्लमेंटच्या विसर्जनापूर्वी त्यांच्या 317 जागा होत्या. आता त्यांना 48 जागांची बढत मिळाली आहे.
लेबर पार्टीने (मजूर) जेरेबी कॉर्बिन यांच्या नेतृत्वात 202 जागा व 32.2 टक्के म्हणजे 1 कोटी 2 लाख मते मिळविली आहेत. पूर्वी त्यांच्या 262 जागा होत्या. त्यांना 60 जागांचा फटका बसला आहे.
स्कॉटिश नॅशनल पार्टीने मिसेस निकोला स्टर्जियन यांच्या नेतृत्वात (स्कॉटलंडमधील 59 जागांपैकी) 48 जागा व 3.9 टक्के म्हणजे 12 लाख मते मिळविली आहेत. (क्र 4 च्या लिबरल डेमोक्रॅट पार्टीच्या तुलनेत कमी मते पण जास्त जागा) पूर्वी त्यांच्या 35 जागा होत्या. आता त्यांना 13 जागांची बढत मिळाली आहे. यामुळे फुटून निघण्याची स्कॉटलंडची मागणी जोर धरू शकते, ही ब्रिटनसाठी चिंतेची बाब आहे. 
 
लिबरल डेमोक्रॅट पार्टीने मिसेस ज्यो स्विन्सन यांच्या नेतृत्वात 11 जागा व 11.6 टक्के म्हणजे 37 लाख मते मिळविली आहेत. (क्र. 3 स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या तुलनेत जास्त मते पण कमी जागा) पूर्वी त्यांच्या 12 जागा होत्या. त्यांना एका जागेचा फटका बसला आहे. अन्य सर्व 5 पक्षांनी मिळून 23 जागा मिळविल्या आहेत.
अ) मजूर पक्षाची मते 2017 च्या तुलनेत 8 टक्के कमी झाली, तर ब) हुजूर पक्षाची मते एक टक्का वाढली. क) लिबरल डेमोक्रॅट नेत्या जो स्विन्सन या पराभूत झाल्या. पण, त्यांची मते 4.2 टक्क्यांनी वाढली. म्हणजे गड राखला पण सिंहीण गेली, असे झाले. ड) स्कॉटिश नॅशनल पार्टीची मते एक टक्क्याने वाढली. 
 
कोण कसा?
कॉन्झरव्हेटिव्ह (हुजूर) पक्ष उजवीकडे झुकलेला पक्ष असून, 2010 पासून सतत सत्तेत आहे. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे/गेट ब्रेक्झिट डन, ही भूमिका ब्रिटिश मतदारांनी उचलून धरली आहे.
लेबर (मजूर) पक्ष काहीसा डावीकडे झुकलेला व कामगारांच्या हक्कांबाबत जागृत असलेला पक्ष आहे. जनहितासाठी शासकीय हस्तक्षेप व सामाजिक न्यायाचे आपण पुरस्कर्ते असल्याचा या पक्षाचा दावा आहे. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडू नये, असे या पक्षाचे मत आहे. मतदारांनी हे मत सपशेल फेटाळले आहे. 
 
स्कॉटिश नॅशनल पार्टी हा पक्ष स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असून, युरोपियन युनियनमध्ये स्वतंत्र स्कॉटलंडला स्वतंत्र स्थान असावे, असे मानतो. याची मते फक्त स्कॉटलंडमधूनच आलेली असल्यामुळे मते कमी (3.9 टक्के) मिळूनही स्कॉटलंडच्या वाट्याला एकूण 59 जागांपैकी याला सर्वात जास्त (48) जागा मिळाल्या आहेत.
 
लिबरल डेमोक्रॅट पक्ष हा नावाप्रमाणे मवाळ असून, या पक्षाच्या जागा 21 वरून कमी होऊन 11 झाल्या आहेत. याने सर्व देशभर निवडणुका लढवल्या असल्यामुळे जास्त मते (11.5 टक्के) पण कमी जागा (11) असे चित्र दिसते आहे.
विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉनसन हे बेभरवशाचे व खोटारडे म्हणून कुप्रसिद्ध आहेत, तर विरोधी पक्षनेते जेरेमी कार्बनी हे बेजबाबदार, हिंदुद्वेष्टे, पाकधार्जिणे व दहशतवाद्यांबाबत सौम्य भूमिका घेणारे म्हणून बदनाम आहेत. या दोघांतून 4.6 कोटी ब्रिटिश मतदारांनी बोरिस जॅानसन यांच्या बाजूने कौल दिला. 
  
अनावश्यक जनमत चाचणी
2010 ते 2015 या कालखंडात ब्रिटनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष (हुजूर पक्ष) व लिबरल डेमोक्रॅट पक्ष यांच्या आघाडीचे सरकार होते. 2015 मध्ये ब्रिटिश मतदारांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला (हुजूर पक्ष) 331 जागी निवडून आणीत स्पष्ट बहुमत बहाल करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. डेव्हिड कॅमेरून हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांनी हात दाखवून अवलक्षण ठरावा, असा अजब व अनावश्यक निर्णय घेतला. स्पष्ट बहुमत असतानाही व ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे, ही पक्षाची भूमिका असतानाही ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावे की बाहेर पडावे (ब्रेक्झिट) यावर त्यांनी 23 जून 2016 ला जनमत चाचणी (रेफरेंडम) घेतली. त्यात राहावेच्या बाजूने 48 टक्के, तर बाहेर पडावे या बाजूने 52 टक्के मते पडली. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे खुद्द राहावे या मताचे होते व तसा त्यांनी प्रचारही केला होता. पण, 52 टक्के जनमत बाहेर पडावे, या बाजूने आल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. मग हुजूर पक्षाच्याच थेरेसा मे या पंतप्रधान झाल्या. पण, सत्ताधारी हुजूर पक्षाच्याच 100 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत 202 विरुद्ध 423 अशा भरपूर मताधिक्याने बाहेर पडावे, ही जनमताची भूमिका फेटाळून लावली. जनमत एका बाजूचे तर पार्लमेंटचे सदस्य अगदी विरुद्ध बाजूचे, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली. 
 
त्रिशंकूचा तिटकारा
थेरेसा मे यांनी दुसर्‍यांदा 8 जूनला पार्लमेंटची पुन्हा निवडणूक घेतली. पण झाले भलतेच. आता हुजूर पक्षाच्या 331 ऐवजी 317 जागा निवडून आल्या. म्हणजे बहुमत जाऊन 9 जागा कमी पडल्या. या त्रिशंकू स्थितीत आघाडीचे सरकार बनवावे लागले. पार्लमेंटमधला तिढा कायमच राहिला. पार्लमेंट काही केल्या बाहेर पडण्यास (ब्रेक्झिट) संमती देईना. शेवटी थेरेसा मे या पायउतार झाल्या व 24 जुलै 2019 ला हुजूर पक्षाचेच बोरिस जॉनसन पंतप्रधान झाले. पण, पार्लमेंटची नकारघंटा कायमच राहिली. शेवटी जॉनसन यांनी तिसर्‍यांदा 12 डिसेंबर 2019 ला निवडणूक घेतली. या निवडणुकीत मात्र ब्रिटिश मतदारांनी हुजूर पक्षाच्या पदरात 365 जागा टाकल्या व युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला. 
 
निकालाची वैशिष्ट्ये
मतदारांनी हुजूर पक्षाला ब्रेक्झिटसाठी मोठे बहुमत दिले आहे. या निवडणूक निकालाची आणखीही निदान तीन वैशिष्ट्ये आहेत. पहिले असे की, मजूर पक्ष दहशतवाद्यांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेतो, कलम 370 बाबत पाकिस्तानची तसेच मध्यपूर्वेतील स्थलांतरितांची बाजू घेतो, असे सर्वसाधारण मत आहे. मतदारांनी हुजूर पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन आपली स्थलांतरितविरोधी, दहशतवादविरोधी व ब्रेक्झिटच्या (युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे) बाजूची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरे असे की, ब्रिटनमध्ये 6 लाख भारतीय मतदारांनी मजूर पक्षाबाबत तीव्र नापसंती दर्शवत हुजूर पक्षाच्या बाजूने भरघोस मतदान केले, असे मानले जाते. तिसरे असे की, आघाडीऐवजी कोणत्यातरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत देण्याकडे कल निर्माण होण्याची प्रक्रिया ब्रिटनमध्येही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आली आहे. 
  
हुजूर पक्ष का जिंकला?
हुजूर पक्ष जिंकण्याची आणखीही काही कारणे आहेत. हुजूर पक्षाची पुढील आश्वासने मतदारांवर खूप परिणाम करती झाली. युरोपियन युनियनमधून बाहेर पडून त्यांच्याशीच अधिक फायदेशीर करार करू. इतरांशीही स्वतंत्र व उभयपक्षी करार करून ब्रिटनला फायदेशीर ठरतील, असे व्यवहार करू.
  
नॅशनल हेल्थ स्कीममध्ये आणखी सुधारणा करून, तिचा विस्तार व विकास करू. आरोग्य सेवेवर भर आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे हे दोन मुद्दे प्रौढ मतदारांना (60 टक्के) विशेष भावले. प्रौढांची अधिक व विशेष काळजी घेऊ. पर्यावरणाची जपणूक करून हवामानात होत असलेल्या हानिकारक बदलांना आळा घालू. देशांतरित व स्थलांतरांच्या बाबतच्या भूमिकेत देशहिताला प्राधान्य देऊन धोरणे आखू. 
 
ही आश्वासने देणार्‍या हुजूर पक्षावर विसंबून मतदारांनी त्या पक्षाला भरभरून मते व स्पष्ट बहुमत मिळवून दिले. आता पुढचा काळ आश्वासनपूर्तीचा असणार आहे. ब्रिटिश जनता त्याकडे आशेने व अपेक्षेने पाहणार आहे, तर जगाची नजरही औत्सुक्याची असणार आहे.
  
9422804430