झारखंडमधील निकालाचा शोध आणि बोध...

    दिनांक :26-Dec-2019
|
दिल्ली वार्तापत्र 
शामकांत जहागीरदार  
 
 
झारखंड विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात भाजपाने गमावलेले झारखंड हे पाचवे राज्य आहे. याआधी भाजपाचा राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. महाराष्ट्रात भाजपाचा पराभव झाला नसला, तरी सत्ता गमवावी लागली. त्यात आता झारखंडची भर पडली आहे.
 
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजय मिळाला, तेव्हा देशातील फक्त सात राज्यांत भाजपाची सत्ता होती. अमित शाह यांच्याकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आल्यानंतर भाजपाचा विजयरथ वेगाने दौडू लागला. वर्षभरातच जवळपास दुप्पट म्हणजे 13 राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवली. 2016 मध्ये भाजपाशासित राज्यांची संख्या 16 झाली, तर मार्च 2018 मध्ये देशातील विक्रमी म्हणजे 21 राज्यांत भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता होती. आता देशातील 16 राज्यांत भाजपाची सत्ता उरली आहे. यातील 10 राज्यांत भाजपाचे स्वबळाचे सरकार आहे, तर 6 राज्यांत मित्रपक्षाच्या मदतीने.
 
 
raghu _1  H x W
 
 
मार्च 2018 मध्ये देशातील जवळपास 76 टक्के भूभागावर तसेच 70 टक्के लोकसंख्येवर भाजपाची सत्ता होती. आज देशातील 35 टक्के भूभागावर तसेच 43 टक्के लोकसंख्येवर भाजपाची सत्ता उरली आहे. मार्च 2018 मध्ये 24 टक्के भूभागावर तसेच 30 टक्के लोकसंख्येवर विरोधी पक्षांची सत्ता होती, आता 65 टक्के भूभागावर आणि 57 टक्के लोकसंख्येवर विरोधी पक्षांची सत्ता आहे.
 
 
लोकसभा निवडणुकीच्या आधी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. हरयाणा आणि कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला मोठी कसरत करावी लागली. गुजरातमध्ये भाजपाचे सरकार असले, तरी तेथे भाजपाचे संख्याबळ कमी झाले. त्यामुळे झारखंडच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
 
 
झारखंडमध्ये भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. 25 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 14 पैकी 12 जागा भाजपाने जिंकल्या होत्या. भाजपाच्या मतांची टक्केवारी 50 पेक्षा जास्त होती. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 81 पैकी 65 मतदारसंघांत भाजपाचे मताधिक्य होते. त्यामुळेच भाजपाने ‘अबकी बार पैसट पार’चा नारा दिला होता. मात्र, भाजपाचा पराभव झाला.
 
 
निवडणुकीतील पराभवासाठी कोणतेही एक नाही तर अनेक कारणे जबाबदार असतात. निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाला आत्मिंचतनाची गरज नसते. कोणत्या कारणामुळे आपल्याला विजय मिळाला, हे कोणताच विजयी पक्ष कधी पाहात नाही. त्याची गरजही नसते. मात्र, कोणत्याही पराभवानंतर पराभूत पक्षाला आत्मचिंतन करावे लागते. किमान आम्ही आत्मचिंतन केले, पराभवाच्या कारणांचा शोध घेतला, असे दाखवावे तरी लागते.
 
 
तसा या आत्मचिंतनाचा त्या राज्यात किमान पाच वर्षे तरी काही उपयोग होत नसतो. मात्र, एका राज्यातील निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती दुसर्‍या राज्यात होणार नाही, याची खबरदारी संबंधित पक्षाला अशा आत्मिंचतनामुळे घेता येते.
 
 
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विचार केला, तर भाजपाच्या 40 जागा कमी झाल्या. भाजपाला 17 टक्के मतेही कमी मिळाली. मुळात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यात खूप फरक असतो. लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर लढवली जात असते, तर विधानसभा निवडणूक स्थानिक महत्त्वाच्या मुद्यांवर. भाजपाची पहिली चूक येथे झाली, भाजपाने विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे आणले. त्यामुळे स्थानिक महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष झाले. झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे, राज्यातील आदिवासींची संख्या 28 टक्के आहे, त्यांच्यासाठी 28 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. मात्र, भाजपाने या आदिवासीबहुल राज्यासाठी जो मुख्यमंत्री निवडला, तो गैरआदिवासी होता. रघुवरदास यांची भाजपाने मुख्यमंत्री म्हणून निवड केली. यातही काही गैर नव्हते. मात्र, नंतर रघुवरदास यांनी आपल्या कार्यकाळात जल, जमीन आाणि जंगलबाबतचे जे काही निर्णय घेतले, त्यामुळे आदिवासी मतदार दुखावले गेले. त्याचा फटका या निवडणुकीत भाजपाला बसला. स्वत: मुख्यमंत्री रघुवरदास यांचा तसेच प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि विधानसभेच्या सभापतींचाही पराभव झाला. रघुवरदास यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. रघुवरदास यांच्या कार्यपद्धतीबाबतही मोठी नाराजी होती. रघुवरदास यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री त्यांच्या कार्यपद्धतीमुळे दुखावले गेले होते. मात्र, या नाराजीची वेळीच दखल घेण्यात आणि ऑपरेशन डॅमेज कंट्रोल करण्यात भाजपा कमी पडली.
 
 
राज्यातील ज्येष्ठ भाजपा नेते सरयू राय मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज होते, मात्र त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही. सरयू राय यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या असतील, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असते तर त्यांची उपेक्षा करणे, त्यांना उमेदवारी नाकारणे समजण्यासारखे होते. पण, त्यांनी असे काही केल्याचे आतापर्यंत तरी समोर आले नाही. त्यामुळे राज्यातील भाजपाचे बहुतांश कार्यकर्ते सरयू राय यांच्यासोबत होते. मुळात सरयू राय यांची प्रतिमा, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा नेता, अशी होती. बिहारचे विभाजन करून झारखंड राज्याची निर्मिती झाली. जुन्या बिहारमध्ये असताना सरयू राय यांनी लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा आणि मधू कोडा यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष केला होता. या तीन माजी मुख्यमंत्र्यांना मीच तुरुंगात पाठवले, असे सरयू राय जाहीरपणे सांगत असत. रघुवरदास यांच्यामुळे सरयू राय भाजपापासून दूर गेले होते. पण, त्यांनी आपला वेगळा पक्ष काढला नाही तसेच अन्य राजकीय पक्षातही प्रवेश केला नाही. मुख्यमंत्री रघुवरदास यांच्या विरोधात त्यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
 
 
झारखंडमधील निवडणूक निकालाचा पुढील वर्षी होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बिहारमध्ये आज जदयु आणि भाजपा आघाडीचे सरकार आहे. जदयु हा भाजपाचा मित्रपक्ष असला, तरी या दोन पक्षांतील संबंध तणावपूर्ण आहेत. जागावाटपावरून दोन पक्षांत वाद आहे. बिहारची निवडणूक आपल्या नेतृत्वात आणि आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून लढवावी, असा नितीशकुमार आणि त्यांच्या जदयु पक्षाचा आग्रह आहे. बिहारमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजपाच्या हालचाली सुरू होत्या. झारखंडच्या निकालामुळे भाजपाला आता आक्रमक नाही, तर बचावात्मक पवित्र्यात यावे लागेल. जदयुसोबतची आघाडी तुटणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. जागावाटपात जदयुला झुकते माप देताना भाजपाला नितीशकुमार यांना बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही जाहीर करावे लागू शकते.
 
 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जदयुला सन्मानजनक जागा द्याव्या लागतील. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ तयार करताना भाजपाने जदयुला एक जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सहा खासदारांच्या लोजपालाही एक जागा आणि 18 खासदारांच्या जदयुलाही एक जागा, ही विसंगती मान्य नसल्यामुळे जदयुने मंत्रिमंडळात सहभागी होण्यास त्यावेळी नकार दिला होता. भाजपाच्या विरोधात आघाडी बनवली, भाजपाविरोधी मतांचे विभाजन रोखले तर भाजपाला पराभूत करता येते, असा संदेश झारखंडमधील विधानसभा निवडणुकीने दिला आहे. त्यामुळे बिहारमध्येही भाजपाविरोधात महाआघाडी बनवली जाऊ शकते. बिहारमध्ये अशा भाजपाविरोधी महाआघाडीचा प्रयोग याआधीही यशस्वी झाला आहे. त्यामुळे भाजपालाही बिहारमध्ये जदयुशी आघाडी करून निवडणूक लढवावी लागणार आहे. झारखंडमध्ये भाजपाला आपला मित्रपक्ष अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेलाही (आजसु) आपल्यासोबत ठेवता आले नाही. झारखंडमध्ये आजसुने भाजपाचा हात सोडल्यामुळे भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे बिहारमध्ये जदयु आपला हात आणि साथ सोडणार नाही, याची काळजी भाजपाला घ्यावी लागणार आहेे.