मधुमेहाचा समूळ नाश करणे शक्य?

    दिनांक :27-Dec-2019
भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मधुमेहाने ग्रस्त होऊ नये यासाठी अनेक जण अनेकविध उपायांचा अवलंब करताना दिसत असतात. पण मधुमेह असलेल्या रुग्णाला मधुमेहाचे समूळ उच्चाटन करता येणे शक्य आहे का? एका नवीन वैज्ञानिक शोधाद्वारे शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखविले आहे. मधुमेहाचा विकार हा वाढत जाणारा आणि कधीही समूळ बरा न होणारा विकार समजला जातो. पण इंग्लंड मधील न्यू कासल विद्यापीठाच्या प्रोफेसर रॉय टेलर यांनी टाईप 2 प्रकारचा मधुमेह संपूर्णपणे बरा केला जाऊ शकतो असे निदान केले आहे. 

shugar_1  H x W 
 
 
टाईप- 2 ह्या प्रकारचा मधुमेह हा लिव्हर आणि पॅनक्रिया मधील अतिरिक्त चरबीमुळे उद्भवतो. या अतिरिक्त चरबीमुळे पॅनक्रिया मध्ये इन्स्युलीन तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे तयार होतात, ज्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढू लागते. पॅनक्रियामधील ही अतिरिक्त चरबी कमी करून इन्स्युलीन तयार होण्याची प्रक्रिया जर पूर्ववत झाली तर मधुमेह समूळ नष्ट होऊ शकतो असे निदान प्रोफेसर टेलर यांनी केले आहे. यासंबंधीचा प्रबंध त्यांनी नुकताच युरोपियन असोसियेशन फॉर स्टडी ऑफ डायबेटिस येथे सादर केला आहे. प्रोफेसर टेलर यांच्या माहितीनुसार टाईप 2 या प्रकारात मोडणार्‍या मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात काही बदल केल्याने अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होऊन मधुमेह समूळ नष्ट करण्यात यश आल्याचे समजते.
 
 
प्रोफेसर टेलर यांनी केलेल्या प्रयोगामध्ये अकरा रुग्ण सहभागी झाले होते. त्या सर्व रुग्णांना अतिशय माफक प्रमाणात कॅलरीज असलेला आहार दिला गेला. हा आहार सुरु केल्यानंतर सातव्या दिवशी त्यांच्या लिव्हर व पॅनक्रिया मधील अतिरिक्त चरबी नाहीशी होण्यास सुरुवात होऊन शरीरामध्ये इन्स्युलीन तयार होण्याची प्रक्रिया पूर्वपदावर येत असल्याचे निदर्शनास आले. आहारामध्ये बदल केल्यानंतर जवळजवळ आठ आठवड्यांनी, मधुमेह होऊन काही वर्षे उलटून गेलेले रुग्ण मधुमेहाच्या व्याधीपासून मुक्त झाले, अशी माहिती प्रोफेसर टेलर यांनी दिली. या रुग्णांचा मधुमेह तर बरा झालाच, पण त्याशिवाय त्यांचे वजन कमी होऊन आता ते निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत असल्याचा दावा प्रोफेसर टेलर यांनी केला आहे.