बदल आणि बदलणे!

    दिनांक :27-Dec-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
बदल हा शब्द बघायला, लिहायला आणि उच्चारायला किती सोपा आहे. काना, मात्रा, वेलांटी, जोडाक्षर काहीही नसलेला शब्द. पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात सहजपणे खपून जाईल, असा हा शब्द. पण काहीवेळेला त्याचा परिणाम मात्र आयुष्यभर लक्षात राहील, असा अनुभव देणारा.
 
 
खरं तर, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे बदल सातत्याने होत असतात. हे नैसर्गिक बदलही कधी पटकन स्वीकारले जातात, तर कधी ते स्वीकारणं अवघड जातं. परीक्षेत मिळालेलं यश स्वीकारणं, हे जितकं सोपं तितकंच अपयश स्वीकारणं अवघड असतं. या अपयशामुळे होणारे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक बदल स्वीकारणं त्या व्यक्तीला अनेकदा शक्य होत नाही. यातून पुढे अनेक समस्या निर्माण होतात. 
 
asja _1  H x W:
 
अनेकदा किरकोळ वाटणारे हे बदल एखाद्या व्यक्तीसाठी खूप मोठे असू शकतात. अगदी आपली रोजची झोपायची जागा बदलली, तरी अनेकांना झोप येत नाही. विद्यार्थ्यांचा रोजचा वर्ग काही कारणांनी एका दिवसापुरता जरी बदलला, तरी त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. एका विशिष्ट प्रकारचा पेन किंवा पेन्सिलीने लिहिणार्‍या विद्यार्थ्यांला एखाद्या वेळी दुसर्‍या पेन किंवा पेन्सिलने लिहिण्याची वेळ आली, की- त्याच्याशी ॲडजेस्ट करायला वेळ लागतो. एखाद्या विद्यार्थ्यांला नेहमीच्या जागेवरून उठवून कोणत्यातरी वेगळ्या जागेवर बसवलं, तरी त्या दिवशी तो अस्वस्थ असतो. म्हणजेच- अनेकदा या अशा बदलांना सामोरं जाण्याची आपली मानसिकता नसते.
 
 
रोजच्या रोज घरी जेवणार्‍या आपल्यालाही कधीतरी एक दिवस बदल म्हणून हॉटेलमध्ये जेवायला जावंसं वाटतं. याउलट रोज खानावळ किंवा टिफीन सेंटरमध्ये जेवणार्‍याला घरचं जेवण बदल म्हणून मिळालं, की- काय आनंद होतो. रोजच्या रुटीनमधून विरंगुळा म्हणून चार दिवस आपण फिरायला जातो, पण शेवटी-शेवटी घराची ओढ वाटायलाच लागते. ‘होम स्वीट होम!’चं महत्त्व तिथे जाणवायला लागतं.
 
 
लहानपणी मोठं कधी होणार, याची वाट बघणारे आपण मोठेपणी परत लहान होण्याची इच्छा सतत व्यक्त करत असतो. जीवशास्त्रीयदृष्ट्या ते शक्यही होणार नाही, याची आपल्याला खात्री असते; पण असा बदल झाला तर, तो आपल्याला आवडणारा असेल, हे नक्की. बदल हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. बालपण, शैशव, तारुण्य, मध्यमवयीन, म्हातारपण अशा आयुष्याच्या प्रवासात शाळा, कॉलेज, नोकरी, प्रवास, लग्न, संसार, जबाबदार्‍या या बदलांना आपण कधी सहजपणे, कधी जबरदस्तीने तर कधी मन मारून सामोरे जात असतो. अनेकदा हे बदल चटकन स्वीकारले जातात, तर अनेकदा ते जबरदस्तीने स्वीकारावे लागतात.
 
 
म्हातारपण येणार, शरीरात, बाह्य रूपात बदल हे होणारच हे माहीत असूनही ते लांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकजण करताना दिसतात. मग कुठे केस कलप करून काळेच कर (हल्ली कलर केले जातात), ओघळलेली त्वचा ऑपरेशन करून वर खेचून घे (अर्थात ज्यांना हा खर्च परवडतो ते), सुरकुत्या लपवण्यासाठी काहीतरी उपाय कर, असे अनेक प्रकार करताना दिसतात. म्हणजेच वयात झालेला बदल मानसिकरीत्या स्वीकारणं अनेकदा कठीण होतं.
 
 
यंदाच्या वर्षी विद्यापीठांतर्गत येणार्‍या ‘बॅचलर ऑफ मास मीडिया!’ अर्थात बीएमएम या डिग्रीच्या नावात तर बदल झालाच, पण अभ्यासक्रमही आमूलाग्र बदलला. माध्यमांमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन, त्याप्रमाणे माध्यमांची गरज पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल होणं आवश्यक असतं. मात्र यावर यंदाचे विद्यार्थी जरा नाराज झाले, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे- आता तयार नोट्स आधीच्या विद्यार्थ्यांकडून आयत्या मिळणार नाहीत. स्वत:ला नोट्स तयार कराव्या लागतील.
मुळात या अभ्यासक्रमासाठी एकच एक पाठयपुस्तक असत नाही, त्यामुळे गाईड, कोिंचग क्लासेस असे प्रकार नाहीत. म्हणूनच हा झालेला बदल पटकन स्वीकारणं, अनेक विद्यार्थ्यांना कठीण जातंय्‌. हा अभ्यासक्रम सध्याच्या काळात घडणार्‍या घडामोडींनाही प्राधान्य देणारा असल्यामुळे आता रोजचं वर्तमानपत्र वाचन आलं, विविध वृत्तवाहिन्या बघणं आवश्यक बनलं आहे आणि म्हणूनच आजपर्यंत कधीही न केलेल्या गोष्टी करायला लावणारा अभ्यासक्रमातला हा बदल स्वीकारणं, विद्यार्थ्यांना अवघड वाटत आहे.
 
 
पण हेच विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर कुठे ना कुठे तरी रुजू होतील. तेव्हा, नोकरीच्या ठिकाणी वेळ बदलणं, बॉस बदलणं, नोकरीची जागा बदलणं याला सामोरं जाताना होणारी चिडचिड, पगारात झालेल्या वाढीच्या बदलाला मात्र आनंदाने स्वीकारतात. अनेकदा परिस्थितीपुढे हतबल होऊन झालेले बदल जबरदस्तीने स्वीकारण्याशिवाय इतर कोणताही पर्याय आपल्यापुढे नसतो. वातावरणात झालेला बदल आणि त्याचे होणारे परिणाम (दुष्काळ, पाणीटंचाई, पूर, वादळे, भूकंपाचे धक्के) आपल्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम करत आहेत, हे गेल्या काही दशकांपासून आपण सगळेच अनुभवतोय्‌.
म्हणूनच बदल या शब्दाकडे कुतूहलाने, जिज्ञासेने बघायला शिकूया. आयुष्यात जितके बदल होणार आहेत, आधी घडलेले आहेत त्यांचा डोळसपणे विचार करूया. त्यातूनच हे बदल समंजसपणे स्वीकारणं, शक्य होईल.