घर सजावटीत सुरक्षा!

    दिनांक :27-Dec-2019
अवंतिका तामस्कर
 
 
ठरावीक कालावधीनंतर घर (गृह) सजावट करावी लागते. मात्र, ही सजावट करताना काही सावधगिरी आणि सुरक्षा बाळगण्याची गरज आहे. ही काळजी कशी घ्यावी, यावर टाकलेला प्रकाश. 

home _1  H x W: 
 
तुमच्या इमारतीला काही वर्षे होऊन गेली असतील आणि अशा इमारतीतील घराचे किंवा फ्लॅटचे नव्याने अंतर्गत काम काढणार असाल, तर साहजिकच सिव्हिल, प्लंम्बिंग आणि इलेक्ट्रिकल काम करण्यापूर्वी, सर्वप्रथम जुने इलेक्ट्रिकल कनेक्शन काढून टाकणे महत्त्वाचे. जुन्या सिव्हिल कामातील तोडफोड करताना ही सुरक्षितता बाळगणे अत्यंत गरजेचे असते. तसेच जुन्या वायर्स काढून टाकून इलेक्ट्रिशियनने सर्व कंत्राटदारांना कामासाठी आवश्यक असतील तेवढे दोन ते तीन तात्पुरत्या स्वरूपातील स्वीच-बोर्ड आणि लाईट-पॉईंट्स चालू करून देणे आवश्यक असते. बरेचदा काम चालू असताना प्लग पिन न लावताच वायर्स सॉकेटमध्ये टाकल्या जातात, हे देखील धोक्याचे असते. सराईतपणे या गोष्टी साईटवर घडत असतात. याऐवजी इलेक्ट्रिशियनने व्यवस्थित स्विच सॉकेट आणि प्लग पिन तयार करून दिली, तर संभाव्य धोके टाळता येतात.
 
 
प्लंम्बिंग कामाच्या बाबतीतही सिव्हिल कामातील तोडफोड चालू करण्यापूर्वी जुने नळ आणि प्लंम्बिंग कनेक्शन काढून टाकून साईटवरील कामास आवश्यक असा एक पाण्याचा नळ चालू ठेवावा. यामुळे दररोज संध्याकाळी काम संपल्यानंतर नळ चालू राहण्याची शक्यताही संपुष्टात येते. तसेच आपल्या फ्लॅटपुरता स्वतंत्र असा एक मेन नळ लावून घेतल्यास आपले काम चालू असताना प्रत्येक वेळेस सोसायटीमधील मेन लाइन बंद करावी लागणार नाही आणि इतर फ्लॅटधारकांची गैरसोय होणार नाही. कंत्राटदाराने काम चालू करण्यापूर्वी फ्लॅटमध्ये कोठेही लिकेज प्रॉब्लेम्स असतील, तर ते नमूद करणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे हे महत्त्वाचे.
 
 
फ्लोअरिंगचे काम करायचे असले तरी तोडफोड करताना सुरुवातीच्या काळात कधीही जुने फ्लोअरिंग तोडू नये. इतर सर्व सिव्हिल कामे चालू असताना कमी-अधिक पाण्याचा वापर होऊन खालच्या मजल्यावर सिलिंगला ओल आली, तर तेही त्रासदायक ठरू शकेल. कारपेन्टर बोलावून जुने फिक्स्ड फर्निचर काही असेल, तर काढून घेणे, स्वयंपाकघरातील जुने ट्रॉली वर्क काढून टाकणे, पडद्याचे जुने रॉड, वॉल हँगिंग्ज वगरे सर्व गोष्टी व्यवस्थित काढून घरातील व्यक्तीच्या ताब्यात देणे हे सिव्हिल वर्क सुरू करण्याआधीच होणे योग्य असते. तसेच, जुन्या परंतु सुस्थितीतील फर्निचरचे स्वरूप बदलून पुन्हा नव्याने वापरण्यासंबंधित योग्य तो निर्णय घेणे आणि हा विचार करून मगच त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे उत्तम. इमारत खूप जुनी असेल, तर बरेचदा प्लास्टरची मजबुती कमी झालेली असते आणि ग्रीलचे अँकर किंवा होल्डफास्ट्स बरेचदा खिडक्यांच्या फ्रेम्समध्ये बसवलेले असतात. म्हणूनच खिडक्यांच्या जुन्या फ्रेम्स काढण्याआधी तेथील ग्रिल वर्कची मजबुती पडताळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते; अन्यथा जुने ग्रील आधी काढून ठेवून मगच फ्रेम्स काढाव्यात.
 
 
तोडफोडीच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी इमारतीच्या स्ट्रकल मेम्बर्सचे स्थान निर्देशित करून कामगारांना त्यासंबंधात सूचना आणि जाणीव करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. तोडफोड चालू असताना स्ट्रक्रल मेम्बर्सना जराही धक्का लागता कामा नये. तसेच तोडफोड करताना विशेषत: त्यासाठी मशीन वापरताना जास्त काळजी घ्यावी. खूप जुनी इमारत असेल, तर हेवी ड्युटी मशिन्स न वापरणे हेच योग्य होय. तसेच सिमेंट बॅग्स, रेती किंवा टाईल्स बॉक्सेस याचा साठा खोलीच्या मध्यभागी न करता भिंतीलगत थोड्या प्रमाणात ठेवावे. तसेच एकदम सर्व मटेरियल साईटवर आणले, तर ते ठेवण्यासाठी जागेचा प्रश्न येतो. म्हणून सुरुवातीच्या काळात बेसिक मटेरियल जसे- की रेती, सिमेंट, प्लंम्बिंग चे कन्सिल कामाचे पाईप्स हे आणले आणि मग कामाच्या गतीनुसार एकेक फिनिशिंग मटेरियल आणले तर उत्तम. म्हणजे स्लॅबवरचे वजन मर्यादित राहील आणि महागड्या फिनििंशग मटेरियलची नासधूसदेखील होणार नाही. वॉश बेसिन, प्लंम्बिंग चे नळ तर सर्वात शेवटी रंगाचे काम संपत आल्यावर आणून लावावे.
 
 
नवीन खरेदी केलेला फ्लॅट असेल आणि अंतर्गत सजावटीच्या संदर्भातील फॉल्स-सिलिंग, फर्निचरचे काम करण्याआधी सिव्हिल कामाचा भाग फारसा नसेल, तर बरेचदा बिल्डरने दिलेले फ्लोअरिंग न तोडता पुढील कामाचा विचार होतो. अशा वेळेस संपूर्ण फ्लोअरिंग पीव्हीसी शिट्सने कव्हर करून घ्यावे; जेणेकरून काम चालू असताना फ्लोअरिंग कोठेही खराब होणार नाही किंवा तडा जाणार नाही.