स्त्रियांवरील वाचिक अत्याचार

    दिनांक :27-Dec-2019
शंकर गो. पांडे
 
 
आजकाल देशभरांतून रोज चार-पाच बलात्काराच्या बातम्या येतात. स्त्री, मग ती तरुण असो, वृद्ध असो, विवाहित असो, अविवाहित असो, विधवा असो, परित्यक्ता असो, बाालिका असो, अपंग किंवा गतिमंद असो... बलात्कार करणार्‍या नराधमांना या कशाचाही विधिनिषेध नसतो. कित्येकदा आपले बलात्काराचे पाप लपविण्यासाठी पीडित स्त्री अथवा बालिकेची या नराधमांकडून नृशंसपणे हत्याही केली जाते. बलात्कारांच्या प्रचंड प्रमाणामुळे कधीकाळी या देशाची, स्त्रियांची पूजा करणारा, तिला सन्मानाने, बरोबरीने वागविणारा, ही ओळख पुसली जाते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. अशा वेळी बलात्कार्‍यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, त्यांच्याबद्दल समाजाला जास्तीत जास्त घृणा कशी वाटेल, या दृष्टीने राज्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी यांचे प्रामाणिक प्रयत्न असावयास पाहिजे. पण, या वर्गांचाच स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन हीन, एक उपभोग्य वस्तू आणि बलात्कार्‍याबद्दल सहानुभूतीचा असेल, तर स्त्रियांवरील अत्याचारांचे-बलात्कारांचे प्रमाण कमी कसे होणार? दुर्दैवाने याचे भान काही राज्यकर्त्यांना, नेत्यांना नसल्याचे त्यांनी केलेल्या बिनधास्त विधानावरून दिसून येते.
 
 
एखाद्या नेत्याला एखाद्या स्त्री नेत्याबद्दल राग असू शकतो; पण तो जाहीरपणे व्यक्त करताना विवेक बाळगणे आवश्यक असते. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. एकदा समाजवादी पक्षाचे नेते ओमप्रकाशसिंह, उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल बोलताना असभ्य भाषा वापरत म्हणाले, ‘‘तुम्ही मायावतीसारख्या कुरूप महिलेला खपवून घेऊ शकता, तर मग आमच्या पक्षात तर खूप सुंदर दिसणारे अनेक जण आहेत.’’ रूप कसे मिळावे हे आपल्या हातात असते काय? कर्तृत्व हे रूपावर अवलंबून असते काय? मुळात कोणत्याही स्त्रीला तिच्या रूपावरून हिणवणे हेच कुरूप मानसिकतेचे लक्षण आहे.
 
 
एकदा तत्कालीन केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, स्त्रीबद्दलचे कोळशासारखे आपले काळे मन उघड करताना म्हणाले होते, ‘‘बायको जुनी झाली की मजा येत नाही.’’ काय बोध घ्यायचा तरुण पिढीने यापासून? बायको काय केवळ मजा मारण्यासाठी करायची असते? भारतीय तरुणांनीही काय पाश्चात्त्यांप्रमाणे बायका बदलत भारतीय कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करावी? 
 
straa _1  H x W
 
 
दूरदर्शनच्या एबीपी न्यूज वाहिनीवर एका चर्चेत, शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये जाऊन खासदार बनलेले संजय निरुपम, आजच्या केंद्रीय मंत्री व पूर्वीच्या अभिनेत्री स्मृती इराणी, पत्रकार शाहीद सिद्दिकी सहभागी झाले होते. चर्चा रंगात आली असताना निरुपम स्मृती इराणींबद्दल बेतालपणे बडबडले, ‘‘आप तो पैसो के लिये ठुमके लगाती थी. आज चुनावी विश्लेषक बन गयी.’’ चित्रपटसृष्टीतून अनेक नट-नट्या राजकारणात उतरून आज मोठमोठी पदे भूषवीत आहेत. मग स्मृती इराणी राजकारणात उतरल्या तर निरुपम यांनी त्यांच्याबद्दल असे अपशब्द का उच्चारावे?
 
 
पश्चिम बंगालचे माजी मंत्री व माकपचे नेते अनीसुर रेहमान यांनी तर संजय निरुपम यांच्यापेक्षा नीच पातळी गाठत, आपल्या नैतिक व बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले होते. प. बंगालमधील एका बलात्कारपीडितेला, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 20 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहमान यांनी कोणत्या भाषेत मुक्ताफळे उधळावीत? ते म्हणाले, ‘‘अशी 20 हजार रुपयांची मदत जाहीर करणार्‍या ममता बॅनर्जींवर बलात्कार झाला, तर त्या किती आर्थिक मदत स्वीकारतील? त्या स्वतः बलात्कारपीडित म्हणून समोर आल्यात तर मी त्यांना 20 हजार रुपये भरपाई आणि मेडलही देईन.’’ खरेतर, बलात्कारपीडितेच्या अब्रूची व तिच्या मानसिक वेदनांची भरपाई पैशात करणे शक्यच नसते. बलात्कार करणार्‍या नराधमाला कठोरात कठोर आणि दहशत बसेल असे शासन करणे, हाच यावरचा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. पण, बलात्कारपीडित महिला गरीब असल्यास, तिला शासनाच्या आर्थिक मदतीने थोडाफार दिलासा मिळू शकतो. ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेली आर्थिक मदत रेहमान यांना कदाचित फारच अल्प वाटली असेल. पण, त्यामुळे ममता बॅनर्जीसारख्या एका स्त्री मुख्यमंत्र्यासाठी इतक्या हीन दजार्र्ची भाषा वापरणे निश्चितच आक्षेपार्ह होते.
 
 
‘‘जेथे स्त्रियांची पूजा होते तेथे देवतांचा निवास असतो.’’ असे ज्या देशात म्हटले जाते, त्याच देशात आणि त्यातही जागतिक महिलादिनी आणि प्रत्यक्ष राष्ट्रपिता म. गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी स्त्रियांबद्दल काय बोलावे? ते म्हणाले होते, ‘‘हॅपी वुमन्स-डे म्हणायचे असेल, तर महिलांनी पुरुषांना आनंद वाटावा यासाठी स्वतःला स्पर्श करू देण्याची परवानगी द्यावी.’’ राष्ट्रपित्याचा नातू स्त्रियांबद्दल एवढ्या घाणेरड्या शब्दांत कसे काय बोलू शकतो? चहूकडून टीका झाल्यानंतर आपल्या बेताल वक्तव्याबद्दल माफी मागणे तर दूरच, उलट त्यांनी आपल्या विधानाचे समर्थनच केले. स्त्रियांच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या अशा तथाकथित प्रतिष्ठितांकडून स्त्रियांच्या सन्मानाची, तिच्या सुरक्षेची काय अपेक्षा करावी?
 
 
तसा क्रिकेटमधील सट्टेबाजी आणि बलात्कार यांचा काय संबंध? पण, सीबीआयचे तत्कालीन संचालक रणजित सिन्हा यांनी या दोन भिन्न बाबींचा असा काही संबंध जोडला होता की, ऐकणार्‍यांना आपल्या कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली. विषय होता, क्रिकेटमधील सट्टेबाजीचा प्रकारण रोखणे शक्य नसल्यामुळे त्याला कायदेशीर रूप देण्याचा. याबाबतीत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे बलात्कार रोखणे शक्य होत नसेल तर तो एन्जॉय करायला हवा, त्याप्रमाणे सट्टेबाजी रोखता येत नसेल, तर त्याला कायदेशीर करण्यात यावे.’’ बलात्कारावर आळा घालण्यासाठी कडक कायद्यांची मागणी करण्याऐवजी बलात्कारापुढे हतबल होत शेवटी तो ‘एन्जॉय करावा’ या पातळीपर्यंत सिन्हासारखे जबाबदार अधिकारी उतरत असतील, तर बलात्कारांचे प्रमाण कमी कसे होणार? आणि बलात्कारासारखी घृणित घटना एन्जॉय करण्याची कल्पना सूचणे याला तर विकृत मानसिकतेची परमावधीच म्हणावे लागेल.
 
 
उत्तरप्रदेशात तर तेथील नेत्यांनी एकापेक्षा एक बेताल वक्तव्ये करून कहर माजविला आहे. तेथील समाजवादी पक्षाचे एक नेते नरेश अग्रवाल बलात्कारावर भाष्य करताना बरळले होते, ‘‘घरेलू जनावरावरही आपण बळजबरी करू शकत नाही तसेच ही जनावरेही बळजबरीसाठी राजी होत नाहीत.’’ यातून अग्रवाल महोदयांना काय सुचवायचे होते? हेच ना की, स्त्रियांवर बलात्काराचे जे प्रकार घडत आहेत ते सारे खोटे आहेत. मुळात ते बलात्कार नसून सहमतीने घडलेले शारीरिक संबंध आहेत. कारण जेथे मुके जनावरही आपल्यावर कोणतीही बळजबरी होऊ देत नाही, तेथे चालत्याबोलत्या स्त्रिया आपल्यावर बलात्कार कसा होऊ देतील? उत्तरप्रदेशातील वाढलेल्या बलात्कारांच्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांचे अशाप्रकारचे विकृत समर्थन किती िंनदनीय व निर्लज्जतेचे म्हणावे?
 
 
पण, यावरही ताण केली ती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमिंसह यांनी. मुंबईच्या शक्ती मिल परिसरात एका वृत्तछायाचित्रकार महिलेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणाने सारा देश सुन्न झाला. पुढे या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होऊन तिघा आरोपींना फाशीची, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा झाली. खरेतर, या नराधमांचा अपराध एवढा नृशंस होता की, त्यांच्यासाठी ‘जाहिररीत्या फाशी’ हीच शिक्षा योग्य ठरली असती. पण, आरोपींपैकी तिघांना फाशी झाल्यामुळे मुलायमिंसह यांचा लोण्यासारखा मुलायम असणारा जीव कळवळला. त्यांनी मुक्ताफळे उधळली, ‘‘बलात्कारांच्या प्रकरणात सरसकट फाशीची शिक्षा देणे अयोग्य आहे. तरुणांकडून अशा चुका होऊ शकतात. तरुण-तरुणी आधी फ्रेंडशिप करतात आणि त्यांच्यात भांडण झाले की, मग मुली पोलिसांकडे जाऊन बलात्कार झाल्याचा आरोप करतात आणि बिचार्‍या युवकांना फाशी दिली जाते.’’ मुलायमिंसहसारखे एक वयस्कर व जबाबदार नेते बलात्कार्‍यांना प्रेरित करणारे एवढे बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकतात? परदुःख शीतल असते म्हणतात, ते असे.
 
 
पण ‘बडे मियॉं तो बडे मियॉं छोटे मियॉं सुभानल्ला’ असे म्हणण्याची पाळी मुलायमिंसह यांचे पुत्र व उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आणली. बदायूं येथे दोन अल्पवयीन मुलींवर भीषण असा सामूहिक बलात्कार होऊन नंतर त्यांना झाडाला लटकवून फाशी देण्याची, मावतेला कलंकित करणारी घटना घडली होती. या घृणास्पद घटनेवर काही महिला पत्रकारांनी अखिलेश यादव यांना महिला सुरक्षेसंबंधी विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर अत्यंत संतापजनक होते. ते त्या महिला पत्रकारांना म्हणाले, ‘‘तुम्हीतर सुरक्षित आहात ना? तुम्हाला तर काही झाले नाही ना?’’ ...याचा अर्थ काय समजायचा? हाच ना की, ज्या महिला उत्तरप्रदेशात बलात्कारापासून सुरक्षित आहे त्यांनी बलात्काराबद्दल चीड व्यक्त करू नये आणि शासनाला जाबही विचारू नये. तात्पर्य, ज्या महिला अद्याप बलात्काराला बळी पडल्या नाहीत त्यांनी ते आपले सुदैव समजावे.
उत्तरप्रदेशमधील सपाचे एक नेते रामगोपाल यादव यांनी एक अफलातून विधान करून बलात्काराचे खापर चक्क स्त्रियांच्या डोक्यावरच फोडले होते. ते आपल्या अकलेचे तारे तोडत एकदा म्हणाले,‘‘अनेक प्रकरणांमध्ये तरुण-तरुणी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सहमतीने जवळ येतात आणि त्यांचे संबंध उघडकीस आले की मग मात्र तरुणी आपली लाज वाचविण्यासाठी बलात्काराचा आरोप करतात.’’ मुळात बलात्कार होऊनही अनेकदा काय बहुदा नेहमीच मुली घराण्याची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, तिथे सहमतीच्या प्रकरणात त्या कशाला पुढे येत बलात्काराचा आरोप करीत स्वतःची अब्रू उघड्यावर आणतील? पण, बोलणार्‍यांच्या तोंडावर हात कोण ठेवणार?
 
 
भारतातील व विशेषतः उत्तरप्रदेशातील वाढते लैंगिक अत्याचार व त्यानंतर होणार्‍या हत्येच्या घटना पाहून अमेरिकेनेसुद्धा भारतातील हे चित्र भयावह असल्याचे म्हटले होते. उत्तरप्रदेशमधील अमानुष बलात्कार व त्यांची दखल संयुक्त राष्ट्र संघालासुद्धा घेणे भाग पडले. संयुक्त राष्ट्र संघाने उ.प्र.चे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुनावताना म्हटले होते की, ‘‘बदायूं जिल्ह्यातील दोन अल्पवयीन बहिणीवरील बलात्कार व नंतर त्यांची हत्या, अशा घृणास्पद घटनांचे समर्थन मुळीच व्हायला नको. अशा गुन्हेगारांना थोडीही दया न दाखविता त्यांना कठोर शासन व्हायला हवे.’’ युनोलासुद्धा उत्तरप्रदेशातील बलात्कारांची दखल घ्यावी लागली होती, ही खरेतर लाजिरवाणी बाब आहे. पण, दुर्दैवाने उ.प्र मधील नेत्यांना मात्र याची काही लाज वाटत असावी, असे त्यांच्या बिनधास्त बोलण्यावरून दिसून येत नाही. कारण मुलायमिंसह म्हणाले होते, ‘‘उत्तरप्रदेशाची लोकसंख्या 21 कोटी आहे. या लोकसंख्येच्या मानाने राज्यात बलात्कारांचे प्रमाण कमीच आहे.’’ नरेश अग्रवाल या नेत्यासह समाजवादी पक्षाच्या अनेक नेत्यांनी मुलायमिंसह यांच्या या वक्तव्याचे निर्लज्जपणे समर्थन केले होते. उत्तरप्रदेशात 2013 या वर्षाच्या तुलनेत 2014 मध्ये बलात्कारांचे प्रमाण तब्बल 58 टक्क्यांनी वाढले होते. पण, या वाढत्या बलात्कारांबद्दल िंचता किंवा दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी समाजवादी पक्षाचे एक वरिष्ठ नेते रामगोपाल यादव म्हणाले होते, ‘‘आम्ही या वाढत्या बलात्कारांबद्दल क्षमा का मागावी?’’ अशा बेदरकार व निलाजर्‍या वृत्तीचे नेते सत्तेवर असतील तर बलात्कारांचे, हत्यांचे प्रमाण कसे कमी होणार?
 
 
बलात्काराबाबत किंवा स्त्रियांच्या अब्रूबाबत केवळ उत्तरप्रदेशामधील नेतेच असे असंवेदनशील व बेताल बोलणारे आहेत असे नाही, तर इतर राज्यातील नेतेसुद्धा याबाबतीत कमी अथवा मागे नाहीत. पुरुषांच्या पिसाट कामवासनेला बळी पडणार्‍या महिलेबद्दल सहानुभूती आणि बलात्कारी पुरुषाबद्दल चीड व्यक्त करणे तर सोडून द्या, पण उलट मध्यप्रदेशमधील एका काँग्रेस नेत्याने बलात्कारासाठी महिलांनाच दोषी ठरविण्याचा निर्लज्जपणा दाखविला होता. भिंड जिल्ह्यात आयोजित केलेल्या पक्षाच्या रॅलीला संबोधित करताना मध्यप्रदेश काँग्रेसमधील एक वरिष्ठ नेते व माजी मंत्री सत्यदेव कटारा आपल्या अकलेचे तारे तोडत म्हणाले, ‘‘बलात्कारांच्या घटनेसाठी स्वतः महिलाच जबाबदार आहेत. त्या पुरुषाकडे सूचक नजरेने पाहतात आणि त्यांना जवळ येण्यासाठी आमंत्रित करतात.’’ काय म्हणावे या वाचाळतेला?
 
 
काँग्रेसचे तत्कालीन महासचिव व आपल्या बेताल बडबडीसाठी कुख्यात असलेले दिग्विजयसिंह यांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाबद्दल काय बोलावे? त्यांचा हा दृष्टिकोन त्यांच्या बोलण्यातून व वर्तनातून वेळोवेळी दिसून आला आहे. आपचे नेते अरिंवद केजरीवाल यांनी काँग्रेस नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना दिग्विजयसिंह यांचा तोल गेला आणि ते म्हणाले, ‘‘केजरीवाल यांचे आरोप राखी सावंतसारखे असून दोघांजवळ दाखविण्यासारखे काहीच नाही. तरीही हे दोघेही काहीतरी दाखविण्याचा (एक्सपोज) प्रयत्न करीत असतात.’’ आपल्या या विधानाने त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले होते. एकीकडे केजरीवाल यांची तुलना राखी सावंतसारख्या आयटमगर्लशी केली आणि दुसरीकडे राखी सावंतने आतापर्यंत एवढे काही शरीरप्रदर्शन केले आहे की, आता तिच्याकडे दाखविण्यासाठी काहीच उरले नाही, असेही सूचित केले होते.
एकदा तर स्त्रियांबद्दल बोलताना त्यांची जीभ जास्तच घसरली. मध्यप्रदेशात मंदसौर येथे एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राहुल बिग्रेडच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांची स्तुती करताना त्यांचा उल्लेख ‘टंच माल’ असा केला होता. एका तरुण स्त्रीचे वर्णन अशा अश्लील शब्दांत आणि तेही जाहीर रीत्या करणे, कितपत उचित होते? भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून 2014 ची लोकसभेची निवडणूक लढविताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या अर्जात पत्नी जसोदाबेन यांचा उल्लेख प्रथमच केला होता. यावरून त्यांच्यावर असभ्य भाषेत टीका करताना आपण स्वतः किती खोल पाण्यात उभे आहोत, याचा मात्र दिग्विजयसिंह यांनी विचार केला नव्हता. पुढे त्यांचे, त्यांच्या मुलीच्या वयाची असणार्‍या अमृता राय या अंँकर (निवेदिका) असणार्‍या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे दिग्विजयसिंह यांच्या पत्नीचे निधन होऊन 6 महिनेही पूर्ण झाले नव्हते आणि अमृता राय हिचा अद्याप आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट व्हायचा बाकी होता, तरीही दोघांनी आपले एकमेकांवर प्रेम असल्याचे मान्य केले होते. उतरत्या वयातील दिग्विजयसिंहसारख्या प्रेमवीराकडून देशातील तरुण पिढीने कोणते आदर्श घ्यावेत आणि कोणती नैतिकता शिकावी?
 
 
प. बंगालमध्ये माकप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच शाब्दिक आणि शारीरिक लढाया सुरू असतात. पण, कित्येकदा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कोणत्या शब्दांचा वापर करायचा, याचे भान दोन्ही पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राहात नाही, असे दिसून आले आहे. कित्येकदा या शाब्दिक चकमकीत स्त्रियांनाही ओढले जाते. अशाच एका शाब्दिक चकमकीच्या प्रसंगात माकपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कुटुंबीयांचा अपमान केला. यामुळे तृणमूल काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार तापस पाल चांगलेच संतप्त झाले आणि माकपला इशारा देताना त्यांचा तोल गेला. नदिया जिल्ह्यातील चौमाहा गावात एका सभेत बोलताना ते म्हणाले होते, ‘‘माकपच्या एखाद्या व्यक्तीने आमच्या कार्यकर्त्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबीयाच्या शरीराला साधा स्पर्श केला तरी त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. मग आमचेही कार्यकर्ते तुमच्या घरात घुसून तुमच्या बायकांवर बलात्कार करतील.’’ राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या भांडणात स्त्रियांच्या अब्रूचे असे धिंडवडे काढण्याचे काय कारण? ही आपली भारतीय संस्कृती आहे काय? पूर्वी भारतात छोटी छोटी राज्ये असताना त्यांच्या आपसांत लढाया होत असत. विजयी राजांनी पराजित राजाची संपत्ती व राज्यही लुटले असेल. पण, पराजित राजाच्या राज्यातील स्त्रियांना लुटल्याचे, त्यांच्या अब्रूवर घाला घातल्याचे एकही उदाहरण इतिहासात दिसून येत नाही. कारण स्त्री आपली असो अथवा शत्रूची, तिचा सन्मान करणे, ही भारतीय संस्कृतीने दिलेली शिकवण आहे. मग खा. तापस पाल यांना या शिकवणुकीचा विसर का पडावा? अर्थात, चहूकडून टीका झाल्यानंतर तापस पाल यांनी या विधानाबद्दल माफी मागितली. तरी प्रश्न उरतो की, त्यांच्या मनात असा विकृत विचार यावा तरी का?
 
 
खा. तापस पाल यांच्या बेताल वक्तव्यामुळे उडालेला धुराळा खाली बसत नाही, तर त्याच पक्षाचे आमदार दीपक हल्दर यांच्या अंगात जणू दिग्विजयसिंह यांनी संचार केला की काय, असे म्हणण्याची पाळी आली. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील स्वतःच्या डायमंड हार्बर या मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना तृणमूल कांँग्रेसचे आमदार दीपक हल्दर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात बलात्कारांच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. पण, पूर्वीही बलात्कार होत होते, आजही होत आहेत आणि या जगाचे अस्तित्व असेपर्यंत बलात्कार होतच राहतील.’’ काय म्हणावे या बेताल वक्तव्याला? बलात्कार रोखण्याचा निर्धार व्यक्त करण्याऐवजी ‘जग असेपर्यंत बलात्कार होतच राहतील’ अशी हतबलता व्यक्त करणे, एका आमदारासाठी तरी निश्चितच अशोभनीय होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी एक महिला असताना त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराने असे वक्तव्य करणे, हे तर निश्चितच आक्षेपार्ह व निंदनीय होते.
 
 
भारतात स्त्रियांना पूर्वीपासून देवतेचा, समानतेचा दर्जा दिला गेला आहे, तिला पुरुषाची ‘अर्धांगिनी’ मानले गेले आहे. पत्नी, माता, भगिनी, पुत्री असे तिच्याशी असणार्‍या सर्वच नात्यांना पवित्र मानले गेले आहे. पण, आज दुर्दैवाने त्याच देशात तिच्यावरील बलात्कारांचे, अत्याचारांचे प्रमाण अतोनात वाढले आहे. या वाढत्या बलात्कारामुळे अखेर संयुक्त राष्ट्रसंघालासुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. भारताचा दुर्लौकिक संपूर्ण जगात ‘बलात्कार्‍यांचा देश’ असा झाला. ही आपणा सर्व भारतीयांसाठी लाजिरवाणी बाब आहे, पण याहीपेक्षा या देशातील नेत्यांनी, बुद्धिवंतांनी बलात्कारांबद्दल, स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल एकापेक्षा एक बेजबाबदार वक्तव्ये करावीत, ही जास्त लाजिरवाणी बाब आहे. सर्व जगाला कधीकाळी स्त्रीदाक्षिण्याचे धडे देणार्‍यावर आता इतर देशांकडून हे धडे घेण्याची पाळी आली आहे. जपानमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेला एक प्रसंग भारतातील नेत्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारा आहे.
 
 
जपानमध्ये महिलांसंबंधीच्या विषयावर संसदेमध्ये चर्चा सुरू होती. त्याच चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील तत्कालीन महिला खासदार आयाका शिओमुरा, देशातील मातांच्या मदतीसाठी सरकारी उपाययोजनांच्या मुद्यांवर, आपले मत मांडत होत्या. त्या वेळी पंतप्रधान अॅबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे खासदार अकिहिरो सुझुकी यांनी शिओमुरावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. ते म्हणाले, ‘‘तुम्हीच लग्न का करीत नाही? काय तुम्ही बाळाला जन्म देऊ शकत नाही?’’ अकिहिरो यांची ही असभ्य भाषा संसदेमधील कुणालाच आवडली नाही. वृत्तपत्रे, दूरदर्शन, सोशलमीडिया अशा सर्व प्रसारमाध्यमांतून त्यांच्यावर टीका होऊ लागली. अकिहिरो यांच्या कार्यालयावर अंडी फेकण्यात आली.
 
 
देशातील वातावरण अकिहिरो यांच्या बेताल वक्तव्यामुळे खूप तापले. अखेर या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पंतप्रधान अॅबे यांनी विरोधी पक्षनेत्याला पत्र पाठवून त्यांची माफी मागितली. खासदार अकिहिरो सुझुकी यांनी तर महिला खासदार आयाका शिओमुरा यांच्यासमोर मान झुकवत सार्वजनिक रीत्या त्यांची माफी मागितली आणि अखेर प्रायश्चित्त म्हणून आपल्या खासदारकीचाही राजीनामा दिला. आपल्या देशात असे कधी घडेल काय? स्त्रीदाक्षिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या देशात तर नेते स्त्रियांबद्दल वाटेल तसे बरळतात, काही जण कशीबशी माफी मागून मोकळे होतात, तर काही जण एवढेही सौजन्य दाखवीत नाहीत. उलट, सर्व जण आपल्या पदावर कायम राहून समाजात परत ताठ मानेने वावरतात. समाजही त्यांनी केलेले वक्तव्य विसरून परत त्यांच्याभोवती गोंडा घोळतो. जपानपासून आपले नेते व समाज यांनी काही धडा घेतला, तर खूप बरे होईल. यामुळे देशात माजलेले बलात्कारांचे व बेताल वक्तव्यांचे माजलेले तण कमी होण्यास थोडीतरी मदत होईल...