सावरकरांची पत्रे!

    दिनांक :27-Dec-2019
माणिक नेरकर
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर! एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व! खरेतर त्यांचे नाव घेतानाही माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीने किमान शंभरदा विचार करावा. मग त्यांच्याविषयी बोलणं, लिहिणं ही तर फारच दूरची गोष्ट. त्यांच्या विचारांइतकी उंची गाठणे शक्य नसेल, तर किमान त्यांच्याविषयी जे काही लिखाण उपलब्ध आहे ते तरी जाणून घेण्याचा एक भारतीय नागरिक म्हणून आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
 
जयोस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती! त्वांमहं यशोयुता वंदे!
 
सावरकरांच्या या स्वातंत्र्यगीताचे स्मरण करून, सावरकरांची पत्रे या त्यांच्या पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेण्याचे धाडस इथे करतेय.
 
हे पुस्तक तसे 3 विभागात विभागले गेले आहे- 1) सावरकरांची पत्रे, 2) आता मृत्यूचे स्वागत करावे? आणि 3) नेपाळी व लिपी सुधारणा आंदोलन.
 
पहिल्या भागात त्यांनी लिहिलेली पत्रे आहेत, ती साप्ताहिक बलवंतमध्ये तारखांनिशी प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या पत्रांमधून त्यांची देशाप्रती असीम श्रद्धा, कळकळ, त्या दृष्टीने उचललेली पावले आणि हाती घेतलेल्या कार्याचा आढावा... हे सगळे जाणवते.
 
 
पहिल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे, लोकांनी आता (शिवोत्सव प्रसंग) नुसत्या सभा, उत्सव, परिषदा यातच वेळेचा, पैशाचा व शक्तीचा अपव्यय करीत न बसता थोडे तरी का होईना प्रत्यक्ष कार्य प्रत्येकाने करावे (आधी करावे, मग बोलावे). होते असे की, मोठी कामे मोठी म्हणून हातून घडत नाहीत, लहान कामे यत्किंचित, त्याने काय साध्य होणार म्हणून केली जात नाहीत. अशी सार्वजनिक शिथिलता जी आलेली आहे, ती सोडून दिली पाहिजे. फार सुरेख शब्दरचना वापरली आहे बघा, जोवर कर्तृत्वाचे मेघ ईश्वरी दयेच्या दक्षिण वायूवर आरूढ होऊन व आकाशात चढून येऊन ही तप्त पृथ्वी धराधर शतानी भिजवून िंचब, शीतल करत नाही, तोपर्यंत थेंबे थेंबे का होईना, तळे साचवले पाहिजे. तात्पर्य, प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार आणि परिस्थितीनुसार लहानसहान कामे उरकून घेतली पाहिजेत.
 
 
अस्पृश्यता निवारणासंबंधी फार मोलाचे विचार त्यानी पत्रातून मांडले आहेत. अर्थात, ते विचार कृतीतही उतरवले गेले आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे अस्पृश्यता निवारणास्तव प्रथम उपाय म्हणून महिन्यातून किमान एक/दोनदा महार, चांभारादिक आपल्या हिंदू बांधवांच्या वस्तीत जाऊन एकस्वराने भगवंताचे भजन करण्याचा कार्यक्रम रत्नागिरीत घेण्यात आला आणि त्याचा उत्तम परिणामही झाला. शिरगावात मोठे असे तीन समारंभ घेण्यात आले. हनुमानजयंतीस तिथे नव्यानेच स्थापन झालेल्या हनुमानाच्या देवळाभोवती सर्व हिंदुमात्रांनी मिळून प्रदक्षिणा घालण्याचा स्तुत्य उपक्रम झाला. दुसरी गोष्ट, तिथे चांभाराच्या घरच्या सत्यनारायण पूजेच्या वेळी झालेल्या समारंभात ब्राह्मण कुळवाडी इत्यादी स्पृश्य हिंदू व चांभार आदी अस्पृश्य हिंदू एकत्र कथा-कीर्तनात समाविष्ट झाले होते. इतकंच काय, पण सावरकर-दामले यांच्या घरी वासंतिक हळदीकुंकूच्या कार्यक्रमात स्वतः कुळवाडी स्त्रियांनी महार स्त्रियांस आमंत्रण दिले होते. आजही आपल्या देशात जे जातिभेदाचे राजकारण चालते, सहिष्णुता-असहिष्णुता यावरून जो विनाकारण वितंडवाद पाहायला मिळतो, ते बघता, सावरकरांनी किती दूरदर्शीपणे विचार केला होता, हे दिसून येते. ते म्हणतात, ‘‘तुमच्या आरामखुर्चीवर पडून महारवाड्यातील घाण निघणार नाही. ती न निघाली तर केवळ महारवाड्यातीलच वातावरण दूषित होणार नाही, तर तुमचे ‘आरामखुर्चीचे वातावरण’ही दूषित होईल. एकाच भयंकर सामाजिक रोगाचे साथीत सर्वांचा एकत्रित बळी जाईल. प्लेगच्या साथीप्रमाणे कोणतीही अवनीतीची साथ गावाच्या कोणत्याही भागात उद्भवली, आग वेळीच विझवली गेली नाही तर ती संपूर्ण गाव स्वाहा करणे सोडत नाही.’’ 
 
sawarkar _1  H
 
 
अस्पृश्यांना त्वरित हक्क देताना शाळेतून मुलांना एकत्रित बसू देणे, सर्व सभा, परिषदा, सार्वजनिक स्थळी येऊ देणे, धर्माच्या, उत्सवाच्या कार्यक्रमास मज्जाव नसणे... यासारख्या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. माणसामाणसातील भेद नाहीसा करण्याच्या दृष्टीने हे योग्य पाऊल होतं.
 
 
दुसर्‍या पत्रात त्यानी व्यायामशाळांच्या स्थापनेविषयी लिहिले आहे. समाज व जाती यांच्या सरंक्षणासाठी सक्षम व सुदृढ तरुण पिढी निर्माण व्हायला हवी. त्यासाठी नगरातील तरुणांनी शरीर संपत्ती उत्तम रीत्या कमावली पाहिजे आणि त्यासाठी आखाडे स्थापन करून सांघिक व्यायामावर भर दिला पाहिजे.
 
 
तिसर्‍या पत्रात त्यांनी ‘स्वदेशी वस्तू’ वापरण्यावर जोर दिला आहे. आपल्या देशात उत्पन्न होणारे सामानच आपण वापरले पाहिजे, भले त्यासाठी थोडी जास्त किंमत मोजावी लागली तरी, हे व्रत प्रत्येक हिंदूने पाळले पाहिजे. रत्नागिरीस असे उपक्रम राबवले गेल्याचे ते लिहितात. त्या त्या वस्तूंसाठी आपल्या देशात उपलब्ध असलेल्या व्यापारीवर्गाचे संदर्भही त्यांनी दिले आहेत. शेवटी ते लिहितात, तुम्ही स्वधर्मासाठी, तुमच्या हिंदू जातीच्या संघटनेसाठी वास्तविक पाहता तुमच्या तरुण देहाचा अणुरेणू झिजविला पाहिजे. ते न झाले तरी किमान अस्पृश्यतेचे उच्चाटन, आखाड्यात शरीरसंवर्धन व शक्यतो स्वदेशी वस्तूंचा वापर हे व्रत न राखाल, तर तुमच्या शरीरातून ताजे तरुण रक्त व्यर्थ जात आहे, असे म्हणावे लागेल. (आजकालच्या बहुतांश तरुण पिढीचे रक्त एकतर स्वतःच्या उन्नतीसाठी िंकवा भलत्याच गोष्टी करण्यात व्यर्थ जात आहे, हे देशाचे दुर्दैव आहे.)
स्वदेशी वस्तू वापरण्यासंदर्भात त्यांनी जी 39 कडव्यांची कविता केली आहे, त्यातील फक्त दोन ओळी इथे देत आहे.
 
 
चला चला जाऊ या देशी पटा ला पटापटा
जाडे भरडे गडे कसेही असो, सेवू परी झटाझटा.
द्रव्यखणी ही पोरे घेऊनी, परकी पोरे खणती रे
एकचित्त या करू गड्यांनो,
वित्त जिंकू ते पुनरपि रे...
 
आज परिस्थिती अशी आहे की, देशाचं हित कशात आहे, याचा विचार करणारे फार थोडे आणि विरोधाला म्हणून विरोध करणारेच जास्त दिसतात. राजकारण आणि विपर्यास हे जणू समीकरणच झाले आहे. असो.
 
 
आता मृत्यूचे स्वागत करावे? हे पत्र तात्यांनी म्हणजेच सावरकरांनी आपल्या थोरल्या बंधूंना म्हणजेच बाबांना लिहिलेले, जे बाबांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडे पाठवले होते आणि बाबांना ते वाचून दाखवण्यात आले होते. बाबांच्या दिव्य जीवनाचा समारोप करणारे ते अद्वितीय, अमर असे पत्र होते. सावरकरांचे वडीलबंधू, जे त्यांच्यासोबत अंदमानच्या तुरुंगात होते, यांचेदेखील स्वातंत्र्यसंग्रामात प्रचंड योगदान होते. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ ही पहिली क्रांतिघोषणा आणि तिचीच पूर्तता करणारी ‘हिंदुस्थान, हिंदुओंका, नहीं किसीं के बाप का’ ही दुसरी क्रांतिघोषणा बाबांचीच.
 

sawarkar _1  H  
 
 
पुढच्या भागात नेपाळ आंदोलन आणि लिपी आंदोलन याविषयी लिहिलेले आहे. त्यांच्या मते, नेपाळ हा हिंदुस्तानचा प्रांत आहे की नाही, हा वाद निदान भौगोलिकदृष्टीने तरी उपस्थितच होत नाही. कारण, एशियापासून हिमालयासारखा दुर्लघ्य पर्वत नेपाळास अत्यंत स्पष्टपणे अलग करीत आहे. नेपाळ हा एशियातील इतर जनपदापासून जितका पूर्णतेने अलग झालेला आहे, तितक्याच स्पष्टतेने हिंदुस्थानास संलग्नपणे जोडलेला आहे.
 
 
एकंदर 18 लेखांक त्यांनी या विषयावर लिहिलेले आहेत.
नागरी लिपिशुद्धीच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी अनेक मुद्दे अभ्यासपूर्ण रीतीने मांडले आहेत. अंदमानला असताना कारावासात बंदीवानांना साक्षर करण्याचे कार्य हाती घेतले होते. अच्या बाराखडीचा उपयोग करून आणि जोडाक्षरांना फाटा देऊन केवळ मुळाक्षरे शिकताच माणसे साक्षर होऊ शकतात आणि पुढे आपणच आपले ग्रंथही वाचू शकतात, हा अनुभव त्यांना आला. ते लिहितात, ‘‘आम्ही लिपिशुद्धीचे कट्टर अभिमानी बनलो.’’
 
 
शिक्षणसुलभता, मुद्रणसुलभता आणि शास्त्रशुद्धता या सगळ्या दृष्टीने नागरीलिपीत सुधारणा का आणि कोणत्या प्रकारे हवी, हे सावरकरांनी स्पष्टपणे मांडलं आहे. देवनागरीतील अक्षररूपाची आजची घडण कशी बनत आली, तेही त्यांनी यात ठळकपणे नमूद केले आहे. वर्णमाला, ब्राह्मीलिपी, याबद्दलही सविस्तर लिहिलेले आहे.
 
 
मला हे पुस्तक वाचताना सारखे जाणवत होते की, सावरकरांनी त्या वेळच्या प्रतिकूल परिस्थितीतही किती बारीकबारीक गोष्टींचा सखोल विचार केलेला दिसतो. सत्य बोलायचे तर आज सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे आचारविचार अंगीकारायला हवेत. बंदीगृहातील अत्यंत हालअपेष्टा, कष्ट, उपासमार सोसूनही एखादी व्यक्ती जेव्हा फक्त आणि फक्त देशाचाच विचार करते, अशा व्यक्तीसमोर आपोआप नतमस्तक व्हायला होते. इतकं आत्मबळ, इतकी सहनशीलता, इतकी श्रद्धा कुठून येते, कशी येते, ते जाणून घेण्यासाठी तरी निदान अशी पुस्तके वाचायलाच हवीत. काळे पाणी म्हणजे विनादुधाचा चहा कदाचित, इतकीच आमची समजण्याची कुवत. सावरकर समजून घेण्यासाठी मृत्युंजयच व्हावे लागेल! आपण तर त्यांच्या विचारांच्या आसपासही फिरकू शकत नाही. किमान त्या दिव्य, तेजोमय हस्तीच्या प्रतिमेचा पदस्पर्श घेता आला तरी भरपूर; पण त्यासाठी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून जाणारा मार्ग अवलंबणे, इतकं तरी आपण निश्चितच करू शकतो.
 
 
 लिंपुनी शिंपुनी जे
काय तरी सजविसी तू दिवसभरी
बंदी, मंदिर ते
एकादा महाल वा सोनेरी?
याही तटांपुढती, बंदीच्या
क्षितिजांच्याही भिंती
परीसु परी आम्ही कुणी कुणी
त्याही ओलांडुनि...
9370746482