अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

    दिनांक :27-Dec-2019
बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचे निधन झाले आहे. लक्ष्य, अंदाज, सलाम-ए-इश्क सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या कुशल पंजाबीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. पोलिसांना कुशलच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. डीटीपी परमजीत सिंह दहिया यांनी कुशलच्या सुसाईड नोटबद्दलचे तपशील शेअर केले आहे. 
 
 

kushal _1  H x  
 
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचे प्रकरण आहे. कुशलचे आईवडिल दुपारपासून आपल्या मुलाशी संपर्क करत होते. पण कुशलचा फोन बंद येत होता. रात्र झाली तरी कुशलशी संपर्क होत नव्हता. कुशलचे आईवडिल रात्री 10.30 वाजता तो राहत असलेल्या बिल्डींगमध्ये पोहोचले. कुशल त्यावेळी घरात एकटा होता. त्यामुळे आईवडिलांनी दरवाजा तोडला. आत कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. कुशलच्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने लिहिले आहे. 
 
कुशलच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कुशलचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. कुशल आणि करणवीर अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र होते. करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुशल पंजाबीचा फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो पोस्ट करत करणवीर म्हणाला की, तुझ्या निधनाची बातमी ऐकताच मला धक्का बसला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला माहित आहे, तू जिथे कुठे आहेस तिथे खूश आहेस. तू ज्याप्रकारे तुझे आयुष्य जगत होतास त्याने मला प्रेरणा मिळाली, असे करणवीरने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
 
 
 
 
कुशलने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘लव मैरिज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ‘ईश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
 
कुशलने चित्रपटांमध्ये देखील सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याने अक्षय कुमारसोबत 'अंदाज', अजय देवगणसोबत ‘काल’ आणि सलमान सोबत ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘दन दना दन गोल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुलशने यूरोपियन मुलीशी लग्न केले होते. २०१६ मध्ये त्याला एक मुलगा झाला. कुशलने त्याच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.