संघ कसा जाणावा?

    दिनांक :28-Dec-2019
देशात अटलजींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले तेव्हाही आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले तेव्हाही, या घडामोडींचे वर्णन, संघ परिवाराचा झालेला विजय, अशा शब्दात विरोधकांनी अर्थात डाव्यांनी, कॉंग्रेसनी, समाजवाद्यांनी आणि कडव्या मुस्लिमांच्या मुस्लिम लीगवादी संघटनांनी केलेले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एक देश मे ‘दोन प्रधान, दो विधान, दो निशान नही चलेंगे’चा नारा देत जम्मू-काश्मीरमध्ये विनाअनुमती प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेत तेथील परमीट राजचा अंत झाला तेव्हाही तो विजय संघ परिवाराचा आहे, असे सांगितले गेले. श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविला गेला तेव्हाही त्यामागे संघ परिवाराची रणनीती सांगितली गेली. संसदेत तिहेरी तलाकविरोधी पारित झालेले विधेयक असो की जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35 (ए) कलम हटविण्याचा निर्णय असो... तो देखील संघ परिवाराचाच विजय असल्याचे िंबबवण्याचा प्रयत्न झाला. राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि काल-परवा नागरिकता संशोधन विधेयक पारित करण्यासाठी मिळालेले संसदेचे समर्थन, या सार्‍या घटनांकडे संघाचा विजय म्हणून बघितले जावे, असा प्रचार केला गेला. अशा कितीतरी राजकीय घटनांची नोंददेखील संघाचा म्हणून करण्याची खोड विरोधकांना जडली आहे. त्रिपुरामध्ये झालेले सत्तांतर, गुजरातेत कॉंग्रेसचा सातत्याने होणारा पराभव, पश्चिम बंगालमधून डाव्यांची शक्ती क्षीण होणे, देशातील जातीय दंगली, या सार्‍या घटना संघाशी जोडल्या जाव्या, असे प्रयत्न केले गेले. संघ म्हणजे फॅसिस्ट, जातीयवादी, मुस्लिम विरोधी, अल्पसंख्यकांचा कर्दनकाळ, एकचालकानुवर्ती, हुकूमशाहीवृत्ती, प्रतिगामी, रुढीवादी, मागास, अभिव्यक्तीविरोधी अशी कितीतरी दुषणे दिली गेली आणि संघशक्तीचा विजय कसा घातक आणि देशाला पिछाडीवर नेणारा आहे, असा अपप्रचारही केला गेला. 

agralekh 28_1  
 
पण हा विजय काही संघाचा नव्हताच. संघविचारांनी पोषित झालेल्या राष्ट्रवादी राजकीय पक्षांनी त्यांच्या ताकदीवर जय, विजय मिळवित केलेले ते सीमोल्लंघन होते. वाईट शक्तीवर संत शक्तीचा विजय होता. अंधारावर मिळविलेला प्रकाशाचा तो जय होतो. आसुरी शक्तींवर दैवी शक्तींनी मिळविलेला विजय होता. आणि हीच विजयाची व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्या स्थापनेपासून अभिप्रेत आहे. संघ सज्जन शक्तीच्या विजयासाठी आसेतुहिमाचल कार्यरत आहे. समाजाला संघटित करणे, त्याला योग्य दिशा दाखवणे, ही दिशा दाखवताना मार्गात आलेले काटे दूर करणे, लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी समाजाच्या बेरजेचे राजकारण करणे, हीच शिक्षा संघात आबालवृद्धांना दिली जाते. पण संघ समजून न घेणारे, संघ समजून घेण्याची इच्छा नसणारे आणि समजूनही असमंजसपणाची भूमिका घेणार्‍यांमुळे सारी गफलत होत आहे.
 
संघ व्याप्ती वाढविणे, हे संघाचे ध्येय कधीच राहिलेले नाही. तर सर्व समाजाला संघटित करणे आणि मनुष्यनिर्माण करणे, हीच भूमिका संघाची राहिलेली आहे, हेच हैदराबाद येथील विजय संकल्प शिबिरातील स्वयंसेवकांना संबोधित करताना संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. संघाची विजयाची संकल्पनाही त्यांनी विशद केली. एखाद्या निवडणुकीत कुण्या पक्षाचा अथवा राजकीय नेतृत्वाचा झालेला विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुळीच अभिप्रेत नाही. एखाद्या देशाने दुसर्‍या देशावर हल्ला करून त्या देशाची जमीन बळकावणे, एखाद्या निवडणुकीत राजकीय पक्षाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करणे, अथवा कुठल्या स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना लोळवून आपली ध्वजा उंच करणे यासारखे विजय हे तात्कालिक असतात आणि त्याचे विस्मरणही जगाला होते. पण टिकून राहणारे आणि शाश्वत म्हणून गणलेले विजय तीन प्रकारचे असतात. राक्षसी वृत्तीचे लोक दुसर्‍यांना त्रास देऊन आनंदाची अनुभूती करीत असतात आणि यालाच आपला विजय मानतात. तो झाला राक्षसी विजय. काही लोक आपल्या स्वार्थासाठी दुसर्‍या लोकांचा वापर करून घेतात, आणि दुसर्‍यांना आपापसात लढवतात. त्याला राजसी विजय म्हणतात. हे दोन्ही विजय संघाला आणि समाजालाही अभिप्रेत नाहीत. हिंदू समाजाने तर कुणावर आक्रमण करून, त्यांची भूमी पादाक्रांत केल्याचा इतिहास नाही.
 

संघ नेहमी सत्याची बाजू मात्र मांडत आलेला आहे. संघामध्ये हिंदुत्वाचा गौरव होतो,हिंदुत्वाची मांडणी होते, त्यानुसार हिंदूंचे संघटन करून मनुष्यनिर्माणाच्या कामात संघ स्वयंसेवक अथवा संघप्रेमी झोकून देतात. आणि संघ हिंदुत्वाची जी व्याख्या सांगतो ती म्हणजे जीवन जगण्याची एक पद्धती आहे, हेदेखील अनेकवार नमूद करून झालेले आहे. त्यामुळे हे जीवन चांगल्या प्रकारे कसे जगता येईल, त्यासाठी मनावर किती संयम असावा, तुमची वागणूक कशी असावी, सामाजिक भान किती असावे, पर्यावरणाचा विचार करावा की नको, विचार स्वातंत्र्य कितपत असावे, कुठल्याही बाबतीत स्वैराचार नसावा, धर्मपालन, देशकारण, समाजकारण, राष्ट्रकारण, समाजजागृती, असे कितीतरी विषय हिंदू जीवन पद्धतीमध्ये अंतर्भुत आहेत. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट नव्हे तर सर्व्हायव्हल ऑफ ऑल, वसुधैव कुटुंबकम्‌ हे सांगणारी आपली हिंदू संस्कृती आहे. धर्मपालन करताना दुसर्‍याच्या सुखात आपले सुख मानणे, दुसर्‍याच्या हिताची भावना मनात ठेवून त्याच मार्गाने वाटचाल करून धर्मविजय प्राप्त केला जातो. पण आपल्या देशात सध्या राक्षसी आणि राजसी शक्तींचा खेळ सुरू आहे. लोकशाहीने विरोधाचा अधिकार दिला असला तरी त्याचे लक्ष्य हिंसाचार, जाळपोळ आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान इथवर पोहोचू नये, इतपत शहाणपण प्रत्येकात रुजविण्याचा संघ प्रयत्न करतो. स्वयंसेवकांना मातीतून मोती निवडण्याचे कसब शिकवतो. देशासाठी कोण काळा कोण गोरा, याची जाण स्वयंसेवकांमध्ये यावी अशा कार्यक्रमांची शाखांमध्ये आखणी करतो. या सार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना शरीर, मन, आत्मा आणि बुद्धीला समाधान मिळावे, हीच संघाची अपेक्षा असते. प्रेम आणि कल्याणाची भावनाच विजयाचा मार्ग सुकर करीत असते. त्यामुळे असा धर्मविजय संघाला अपेक्षित असून, त्यानुसार संघानुयायी गेल्या 90 वर्षांपासून कार्यरत आहेत.
 
केवळ राजकारणाने समाजात परिवर्तन होणार नाही, समाजाचा उद्धार होणार नाही. समाजोद्धार संघर्षाने नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून केला जायला हवा, याचीदेखील संघाने उदाहरणे घालून दिली आहेत. अनेक राष्ट्रीय प्रश्नांच्या संदर्भात संघाची भूमिका सरकारच्या भूमिकेला छेद देणारी असते; म्हणून काही संघ कुठल्याही सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेत नाही. संघाच्या प्रतिनिधी सभांमधून देशासाठी चिंतेच्या ठरणार्‍या विषयांवर भाष्य केले जाते आणि सूचनाही केल्या जातात. समस्यांचे विश्लेषण करून, उपाययोजनाही सूचविल्या जातात. संघाच्या सूचना किती गांभीर्याने घ्यायच्या हे ती-ती सरकारे आपल्या वकुबाप्रमाणे ठरवत असतात. राष्ट्रीय प्रश्नांविषयी संघाच्या निष्कर्षांची, सूचनांची फारशी दखन न घेतलेल्यांची आज काय परिस्थिती झाली आहे, हे सांगावे लागू नये. त्यामुळे अपप्रवृत्तींविरुद्धचे संघाचे अभियान अविरत चालणारे आहे, त्याला विराम नाही. ज्या-ज्या वेळी राक्षसी वृत्ती डोकी वर काढतील, त्यावेळी हाती त्रिशुळ घेऊन संघशक्तीला तिच्या निर्दालनासाठी सज्ज व्हावेच लागेल.