...म्हणून डावा विचार इथे रुजत नाही!

    दिनांक :28-Dec-2019
चौफेर  
 
 सुनील कुहीकर 
 
इतक्या वर्षात संघ विस्तारला, मग कम्युनिस्ट संघटना का नाही, असा सवाल कार्यकर्त्यांसमोर उपस्थित करीत, याबाबत चिंतन  करण्याचे आवाहन परवा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात पक्षनेते रतिनाथ मिश्रा यांनी केले. इतकी वर्षे आपले पक्षसंघटन कधी पंडित नेहरूंच्या, कधी इंदिरा गांधींच्या, तर कधी कॉंग्रेसच्या दावणीला बांधणार्‍या नेत्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित व्हावा, त्यासाठीचे चिंतन करण्याची गरज कुणालातरी जाणवावी, याचे वेगळे महत्त्व आहे. भारतीय समाज तसा सहिष्णू आहे. सर्वांना संधी देतो. तो सर्वांना पारखतो. पटला तर त्या विचारांचा स्वीकार करतो, नाहीच पटला तर तेवढ्याच त्वरेने तो झिडकारतोही. संघाची स्वीकारार्हता दिवसागणिक वाढते आहे. त्या तुलनेत कम्युनिस्ट मात्र माघारले असल्याची सल मनाला बोचत असेल, तर त्याचे अपश्रेय नेमके कुणाचे याचाही विचार होणे गरजेचे आहे. इतकी वर्षे लोटली तरी भारतीय मातीत कम्युनिस्ट विचार हवा तसा रुजू का शकला नाही, याच्या कारणांचाही बोध होऊ शकेल कदाचित त्यातून.
इंग्रजी राजवटीत भारतीय समाजात राजकारण करण्यास परवानगीही नसलेला हा वैचारिक समूह. नंतरच्या काळात सरदार पटेलांनीही त्यास थारा दिला नाही. त्या समुहाला राजकीय आश्रय मिळाला तो पंडित नेहरूंच्या चरणी लीन झाल्यानंतर. 

sampadakiy 28 dec_1 
तद्नंतरच्या कालावधीतही कॉंग्रेसचा पदर धरूनच त्याची वाटचाल सुरू राहिली. तेव्हापासून आजतागायत हा समूह केवळ तत्त्वज्ञान तेवढे मांडत राहिला. खरंतर, भांडवलशाही अन्‌ कम्युनिझम ही औद्योगिक सभ्यतेची अपत्य. उत्पादकता हा त्याचाच एक अविभाज्य भाग. रशियापासून तर चीनपर्यंतच्या देशांनी ‘सुपर पॉवर’ होण्याच्या कल्पनेचे इमले रचले ते औद्योगिक क्रांतीतून. त्या पुढच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या स्वीकारातून. पण भारतात त्या विचारांच्या पखाली वाहणार्‍या कथित तत्त्विंचतकांना यातील कशाचाच धड स्वीकार करता आला नाही. ते भांडवलशाहीला विरोध करीत राहिले, औद्योगिक क्रांती त्यांनी अस्पृश्य मानली. उत्पादकता अन्‌ खाजगीकरणालाही त्यांचा कायम विरोध राहिला. सारेकाही सरकारकृत, सर्वकाही सरकारी नियंत्रणात, असा अजब, अतर्क्य, अव्यवहारी सिद्धांत मांडण्यात धन्यता मानत राहिलेत त्या समुहाचे धुरीण. जे जे म्हणून प्रगत, वैज्ञानिक, आधुनिक ते ते झिडकारण्यातच दिवस गेलेत त्यांचे. कम्युनिस्ट विचारांच्या किती कामगार संघटना संगणकीकरणाविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या याचा हिशेब मांडा, तीन दशकांहून अधिक काळ सत्ता हातात असताना केरळ- बंगालातील औद्योगिकीकरणाविरुद्ध कोण दंड थोपटून उभे राहिले होते, हे आठवून बघा. कुणी रोखून धरली त्या राज्यांतील उद्योगांची प्रगती? बंगालच्या दाराशी उभ्या राहिलेल्या टाटा उद्योग समुहाला हिंसाचाराच्या माध्यमातून विरोध करीत कोणी परतावून लावले होते, हे आठवा. दुर्दैव हे की, याच कम्युनिस्टांना रशियातील औद्योगिक क्रांतीचा दुराभिमान असतो. त्यासाठी, लेनिन, स्टॅलिननी घडवलेला रक्तपात, शेकडो लोकांचे त्यांनी घेतलेले बळी विसरण्याचीही त्यांची तयारी असते. याउलट संघाने जे जे म्हणून नवे, आधुनिक ते सारे स्वीकारले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सहज स्वीकार केला. जे कालबाह्य ते टाकून देण्याची हिंमत दाखवली. समाजातील सर्व घटकांना स्पर्श करण्याचा, त्यांना संघ सरितेत सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ‘परिवार’ या संकल्पनेतून, वनवासींपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत अन्‌ कलावंतांपासून तर कामगारांपर्यंतच्या, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. गावखेड्यांपासून तर शहरातील झोपडपट्‌ट्यांमध्ये सेवाकार्याच्या माध्यमातून संघाचा कार्यकर्ता पोहोचला. त्याचा सकारात्मक परिणाम समोर आहे. संघकार्य विस्तारते आहे. याच्या नेमकी उलट परिस्थिती कम्युनिस्टांची झाली आहे. प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा एक कॅडरबेस्ड राजकीय पक्ष असूनही त्या पक्षाच्या नेत्यांनी कॉंग्रेसच्या खुंट्याला स्वत:ला बांधून घेतले. नेहरू-इंदिरा यांनी टाकलेल्या तुकड्यांवर, चार-दोन सरकारी पदांवर समाधान मानू लागले त्या पक्षाचे प्रमुख. त्यातून मिळणार्‍या मानमरातबीचा आनंद त्यांच्या लेखी परमोच्च ठरला. मुख्य म्हणजे ते त्या मर्यादित परिघातच घुटमळत राहिले. त्यापलीकडे जाऊन पक्षसंघटन विस्तारण्याची कल्पना नेत्यांच्या मनात रुजली असती कधी, तर आज ‘आपण का विस्तारलो नाही,’ हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारणच उरले नसते.
 
 
‘‘जगात आजवर जेवढ्या लोकांनी समाजवाद मांडला तो केवळ ‘युटोपियन’ म्हणजे, आदर्श जीवनासंबंधीचा कल्पनारम्य परंतु अव्यवहार्य असा विचार होता. मी मांडतोय्‌, तो मात्र ‘मेथेडोलॉजिकल’ म्हणजे पद्धतशीर मांडणी असलेला वास्तववादी समाजवाद आहे,’’ हा कार्ल मार्क्सचा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीतून अतिशय चांगल्या शब्दात खोडून काढला आहे. बाबासाहेब म्हणतात, हा विचार वास्तववादी, वैज्ञानिक असता तर आजवर तो समाजमनात रुजला असता. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली असती. तसे काहीही झालेले नाही, याचाच अर्थ कार्ल मार्क्स यांनी मांडलेला समाजवाद सुद्धा ‘युटोपियन’च ठरतो. हा असा कल्पनारम्य, अव्यवहार्य सिद्धांत रुजवण्याच्या धडपडीत, आपले अस्तित्वच मुळात औद्योगिक क्रांतीत दडले असल्याच्या वास्तवाचा विसर पडत गेला अन्‌ मग नीतीतत्त्वांच्या आडून, पचनी न पडणारे संकेत जनमानसात रुजविण्याचे प्रयत्न आपसूकच असफल ठरत गेले. गरिबांच्या हक्कांसाठीचा लढा लढणार्‍या कॅडरबेस्ड पार्टीचे नेते दिवसागणिक श्रीमंत कसे होत गेले, लढाईचे नेमके माध्यम कोणते असावे, हे ठरवता ठरवता भारतातल्या कम्युनिस्टांनी मार्क्स अन्‌ माओंना विभक्त करीत पक्षाची शकले कशी पाडली, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे गवसूच नये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीकाळी उद्योजकांना प्रस्थापित करण्याच्या नादात क्रांतीचा रक्तरंजित मार्ग स्वीकारणारी ही मंडळी भारतात मात्र औद्योगिक विकासाला विरोध करू लागली. खरं तर भांडवलशाहीचे समर्थन अमेरिका, युरोपातही झाले. पण त्यांना त्यासाठी रक्त सांडावे लागले नाही. लोकांचे बळीही द्यावे लागले नाहीत. कम्युनिस्टांचा प्रभाव असलेल्या रशिया, चीनमध्ये मात्र रक्ताच्या चिरकांड्या उडवून औद्योगिक क्रांती मार्गस्थ झाली. इकडे मात्र, टाटाला विरोध, अंबानीला विरोध, अदानीला विरोध. उद्योग चालू द्यायचे नाही. भांडवलशाहीला बेंबीच्या देठापासून विरोध करायचा. गरिबीचे गुणगान करत राहायचे. अन्‌ वर पुन्हा रोजगार निर्मिती होत नसल्याचा कंठशोषही उच्चरवात करायचा. केरळ, बंगालात तीन तीन दशकांहून अधिक काळ सत्ता राखूनही नावालाही उद्योग विकसित करू न शकलेल्या या विचारांची उत्पत्ती औद्योगिक क्रांतीतून झाली होती, यावर विश्वास बसू नये, इतका विरोधाभास भारतातील कम्युनिस्टांच्या वागण्या-बोलण्यात राहिला आहे. बरं गरिबांच्या हिताची भाषा बोलताना, कामगारांच्या हितार्थ कायम उद्योजकांशी भांडताना इथे मोठ्या संख्येत असलेल्या असंघटित कामगारांच्या समस्यांना हात घालण्याची गरज कम्युनिस्टच काय कोणालाच कधीच वाटत नाही. बँकांच्या अधिकार्‍यांचे संघटन तयार करून त्यांच्या प्रश्नांसाठी भांडण्यातच यांना रस. मोर्चे काढताना मात्र कधीनव्हे इतकी आठवण होते शेतमजुरांची. तिथे दाखवायला गर्दी हवी असते ना!
 
इथल्या भूमीत कम्युनिस्ट विचार न रुजण्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण त्याच्या कडव्या हिंदू द्वेषातही दडले आहे. हिंदू ही जीवनपद्धती आहे, हे वास्तव नाकारून त्याला धर्माच्या तराजूत तोलण्याच्या अट्टाहासाचा तो स्वाभाविक परिणाम आहे. कम्युनिस्टांद्वारे संघाला होणार्‍या विरोधाचे कारणही तेच आहे. मुळात संघाचे हिंदुत्व धार्मिक नाही. तसे असते तर ज्याप्रमाणेे ख्रिश्चन चर्चमध्ये, मुस्लिम मशिदीत अडकून पडलेत तसेच संघाचेही झाले असते. संघाचे हिंदुत्व ‘बिआँड द रिलीजन’ आहे. त्याला अध्यात्माची जोडही आहे. गोळवलकर गुरुजींनी त्यातून संघटन बांधले. अध्यात्माची ही ताकद कम्युनिस्टांना उमगली नाही. म्हणून ते हिंदूंना विरोध करीत राहिले. पण म्हणून त्यांना इथल्या मुस्लिमांचा विकास साधता आला, असेही नाही. त्यांना तर केरळ, बंगालातल्या गरिबांचाही विकास करता आला नाही. फक्त त्यांच्या बळावर सत्ता तेवढी काबीज करता आली. स्वत:चा मूळ विचार सोडून भारतात नेहरूवाद निर्माण करण्याचे अन्‌ ते जोपासण्याचे फलितही रतिनाथ मिश्रांनी कार्यकर्त्यांना विचारलेल्या, ‘आम्ही का विस्तारलो नाही,’ या प्रश्नातच दडले आहे...
9881717833