‘इभ्रत’मध्ये रंगणार मल्हार-मायडीची लव्हेबल केमिस्ट्री

    दिनांक :29-Dec-2019
जगातील सर्वात गाजलेल्या प्रेमकथांमध्ये रोमियो- ज्युलिएट, लैला-मजनू यांचे आवर्जुन नाव घेतले जाते. त्यांच्यावर आधारित चित्रपटांचीदेखील निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्येच आता अशाच एका प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘इभ्रत’ या चित्रपटातून मल्हार आणि मायडी यांची प्रेमकथा रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
 

ibhrat _1  H x  
 
रांगडा पण हळव्या मनाचा कुस्तीपटू ‘मल्हार’ म्हणजेच संजय शेजवळ आणि आपल्या सौंदर्याचा तसूभरही गर्व नसलेल्या ‘मायडी’ची म्हणजेच शिल्पा ठाकरेची ही प्रेमकथा ‘आवडी’ या साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारलेली आहे. संजय शेजवळ आणि शिल्पा ठाकरेची केमिस्ट्री ‘इभ्रत’ मध्ये चांगलीच रंगली असून मायडी तिच्या प्रेमाच्या जाळ्यात मल्हारला कसं अडकवते हे चित्रपटात पाहणे रंजक ठरेल. डॉल्फिन सिनेक्राफ्ट प्रस्तुत श्रुती वसंत दांडेकर निर्मित आणि प्रवीण रमेश क्षीरसागर दिग्दर्शित ‘इभ्रत’ चित्रपटाची पहिली झलक लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
 
मराठी-हिंदी-गुजराती चित्रपट-मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजेच संजय शेजवळ. इभ्रत मधील मल्हार ही व्यक्तिरेखा वाटते तेवढी साधीसोपी नाही, तर या मल्हारच्या भूमिकेत अनेक कंगोरे लपले आहेत शिवाय एक कुस्तीपटू साकारण्यासाठी मी सिक्सपॅक अॅब्स ही केलेत की जेणेकरून मल्हारच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळेल, असे संजयने सांगितले.
 
दरम्यान, मल्हार आणि मायडीची प्रेमकथा खुलते की यात अडथळे येतात हे चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल.या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे यांच्यासह सुरेश विश्वकर्मा डॉ.सुधीर निकम, अनिकेत केळकर, वृषाली हटळकर, राहुल बेलापूरकर यांच्याही भूमिका आहेत.