शिवाजी महाराजांची युद्धनीती

    दिनांक :29-Dec-2019
•डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
 
 
युद्ध या नश्वर जगाचा एक अविभाज्य घटक राहिलेला आहे. अगदी देव-दानवांच्या संघर्षापासून युद्धांची वर्णने सापडतात. रामचंद्रांनी लंकेवर केलेले आक्रमण हे मानवी इतिहासातील प्राचीनतम्‌ युद्धवर्णनांपैकी एक आहे. राम-रावण युद्धापासून ते इ.स. 711च्या मोहम्मद बिन कासीमच्या रूपाने आलेल्या इस्लामी आक्रमणापर्यंत जवळपास सर्व भारतीय लढाया नैतिकतेने लढल्या गेल्या आहेत. लढणार्‍या राजसत्तांची धर्माने आखून दिलेली नैतिकमूल्ये होती. दोन राजसत्तांमधील संघर्ष हा राजकीय स्वरूपाचा असे व त्याचा सामान्य जनतेशी विशेष संबंध नसे. या लढायांचे निर्णय रणमैदानावर लागत असत, जनतेला त्या युद्धांमुळे त्रास होत नसे. रात्री युद्ध लढणे हे निषिद्ध मानले जात असल्याने सायंकाळी युद्ध थांबत असे. सकाळी दोन्ही पक्षातील सैनिक सोबतच नदीवर स्नानादी आटोपून ठराविक वेळी एकमेकांसमोर युद्धास उभे ठाकत. नैतिकमूल्ये इतकी श्रेष्ठ होती, की- शत्रूची तलवार पडली तर त्याला ती उचलण्यास संधी दिली जात असे. तलवार तुटली तर नवीन शस्त्र हाती घेईपर्यंत वार केला जात नसे. काहीही झाले तरी पाठीवर वार करणे, एकाविरुद्ध अनेकांनी लढणे, निःशस्त्र लढवय्यावर हल्ला करणे हे अधर्म समजले जात असे. दिलेला शब्द पाळणे, वचनांवर विश्वास ठेवणे, शब्दासाठी जीव देण्याची तयारी ठेवणे ही योद्ध्याची भूषणे समजली जात. रथ, हत्ती, घोडे ही सर्वमान्य युद्धसाधने होती. तलवार, धनुष्यबाण, भाला, गदा हीच शास्त्रसंपदा होती.
 
 

chhatrapati shivaji mahar 
 
 
इस्लामी आक्रमण तर सर्वार्थाने वेगळे होते. ते जरी ‘जेहाद’ (धर्मयुद्ध) म्हणविल्या गेले असले, तरी मुळात त्याचा व धर्माचा काहीही संबंध नव्हता. विशेषतः इस्लामचा नाविन्यानी स्वीकार केलेल्या मंगोल, तार्तार आदी टोळ्या इतक्या रानटी होत्या, की- त्यांच्या युद्धतंत्राला नैतिकतेची कुठलीही बंधने ठाऊक नव्हती. खोटे बोलणे, खोटी वचने देणे, विश्वासघात करणे ही त्यांची प्रवृत्ती होती. शत्रूला एकटे गाठून त्यावर अनेकांनी प्राणांतिक हल्ला करणे, सर्रास पाठीमागून वार करणे, दगाबाजी करणे या पद्धती त्यांच्या अंगवळणी पडल्या होत्या. सर्वात भयानक प्रकार म्हणजे रणमैदानावर विरोधी पक्ष पराभूत झाल्यावर विजयी सुलतानी फौजा गावागावात प्रवेश करत असत. समोर दिसेल त्या माणसांची कत्तल उडविली जात असे, तारण्याताठ्या मुली व महिला अमानुष अत्याचारांना बळी पडत, विशालकाय मंदिरं काही तासांत जमीनदोस्त होऊन जात व त्यातील संपत्ती फरफटत बाहेर आणून अक्षरश: लुटली जात असे. सुलतानी आक्रमण परत गेल्यावर रस्त्यावर रक्तामासाचा चिखल साचलेला असे व वृद्ध मंडळी आपल्या आप्तांना शोधतांना दिसत. चिमुकली मुले सैरभैर होऊन त्या भयानक प्रेतांमध्ये त्यांचे माता-पिता सापडलेच तर आता ती उठून उभी राहतील, अशा केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत रडत राहत. गावे महामारीने ग्रस्त होऊन जात असत, गिधाडे पोटभर जेवत व मुले उपाशी मरत. आपल्या समाजाची उडालेली अशी दैना भारताने कधी अनुभवली नव्हती.
 
 
सुलतान अनेकदा आपल्या शत्रूला भेटायला बोलवत व दगाबाजीने त्यांचा खून करत. निजामशाहच्या दरबारात लखुजीराजे जाधव अन्‌ त्यांच्या मुलांची अशीच निर्घृण हत्या केल्या गेली तर अफझलखानाने कस्तुरीरंगनला भेटायला बोलावून त्याचा फडशा पाडला. अशा शेकडो घटना इतिहासात घडलेल्या असतानाही आम्ही शिकायला तयार नव्हतो. रात्री- अपरात्री गडाचे दरवाजे उघडून वाटसरूंना आत घेतले जात असे व मग समजत असे, की- ते वाटसरू नसून शत्रू सैनिक आहेत. हे सैनिक काही क्षणात गड आपल्या ताब्यात घेत असत. यदाकदाचित शत्रू जिवंत सापडलाच तर त्याला जिवंत सोडून देणे हाच क्षत्रिय धर्म आहे, असे गैरसमज निर्माण झाले होते. सुलतान ठरवत असत की युद्ध कुठे लढले जाईल व आम्ही त्या अडचणीच्या जागेत जाऊन लढाया हरत असू. यदाकदाचित आम्ही विजयी झालो तरी राज्याच्या सीमा मात्र वाढत नसत. याउलट आम्ही हरलो तर राज्य आकुंचन पावत असे. भौगोलिक परिस्थितीबाबत अज्ञान, गुप्तचरांचे जाळे विणण्याकडे दुर्लक्ष, शत्रूचे कच्चे दुवे ओळखणे, त्यांच्या बातम्या हेरणे या सगळ्या डावपेचात आम्ही कमजोर पडलो.
 
 
किल्ले, आरमार, नवी युद्धकौशल्य, हत्यारं यातही आम्ही मागे पडत गेलो. आपल्या राज्यातील गद्दारांना मृत्युदंड न देता आम्ही राज्याबाहेर हाकलून लावले, पुढे त्यांनी शत्रूला मदत करून आमचे राज्य बुडविले. समुद्रावर मुक्त संचार करणारे आपले पूर्वज आपण विसरलो अन्‌ समुद्र पर्यटन निषिद्ध मानायला लागलो होतो. सारा समुद्रकिनारा ओस पडलेला असल्याने त्यावर डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश आदी विदेशी शत्रू पाय रोवून बसले होते. शत्रूच्या शक्तीचा अंदाज न घेणे, स्वतःच्या ताकदीचा अदमास नसणे, विशालकाय शत्रूला उघड्या मैदानावर सामोरे जाणे, लढता येईल तेवढे लढणे व शेवटी स्वतःच्या प्राणांची आहुती देणे असे प्रकार नेहमीचे झाले होते. (आहुतीचे महत्त्व आहेच, पण देशासाठी जगणे त्यापेक्षाही महत्त्वाचे असते.) अल्लाउद्दीन खिलजी दख्खनवर येतो आहे, ही महत्त्वाची बातमी द्यायला आमचे गुप्तचर कुठे होते? खिलजीला भेटायला जातांना रतनिंसहाने शत्रूच्या शब्दावर विश्वास का ठेवला? जयचंदला आम्ही वेळेत का ओळखू शकलो नाही? असे अनेक प्रश्न आपल्या कमजोर युद्धनीतीकडे अंगुलीनिर्देश करतात.
 
 
पण शिवरायांच्या आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे- त्यांचा इतिहासाचा अभ्यास, त्यातून कमावलेले शहाणपण व त्या शहाणपणातून घडविलेली त्यांची युद्धनीती. महाराजांचा भौगोलिक अभ्यास दांडगा दिसतो. सारे बालपण अन्‌ किशोरावस्था सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये गेल्याने राजांना या प्रदेशाची खडानखडा माहिती होती. अवघड वाटा, घाट, आडवळणे, अडचणीच्या जागा, पाण्याचे साठे, भयानक उतार, जीवघेणे चढाव, शत्रूला कोंडता येईल, अशा खिंडी अशा कितीतरी महत्त्वाच्या जागा त्यांना व त्यांच्या सहकार्‍याना अवगत होत्या. अतिशय कमी वयात शिवबाराजांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचे जाळे विणले होते. परकीय मुलुखात घडणार्‍या घडामोडी, शत्रूचे डावपेच, हालचाली, आक्रमणाचे धोके, विस्तारासाठी अनुकूल परिस्थिती इ. अनेक बातम्या राजांच्या गुप्तचरांनी आणल्याचे अनेक दाखले देता येतील. फ्रान्सवरून आलेला बर्चेलमु ऍबे कारे लिहून ठेवतो, की- शिवाजी आपल्या गुप्तचरांवर भरपूर धन खर्च करतो. हे गुप्तचर त्याला विविध बातम्या आणून देतात, त्या बातम्यांवर तो योजना तयार करतो व म्हणून त्याला यश प्राप्त होते. दगे खाण्याचा इतिहास सोडून महाराजांनी दगे देण्याची परिपाठी सुरू केली. कुरुक्षेत्रावरून द्रोणाचार्यांना हटविण्यासाठी धर्मराजाकडून ‘नरो वा कुंजरो वा’ वदवून घेणार्‍या कृष्णाचा आदर्श घेतलेले शिवराय अफझल्खानादी शत्रूला भेटण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा कोथळा बाहेर काढू लागले. सिद्दी जौहर व औरंगजेबसारख्या मातबर शत्रूंना शरण येण्याचे आश्वासन देऊन राजे त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होऊ लागले. शत्रूला दिलेले वाचन मोडण्यासाठीच असते व शत्रूची माफी मागून त्याला धोका द्यायचा असतो, असे नवे पायंडे कृष्णावतारानंतर परत पाडले जात होते.
 
 
शिवरायांचे गुप्तचर त्यांच्या शत्रूच्या शक्तीचा अचूक अंदाज काढून काढत, त्यानुसार राजे आपली शक्ती पाहून आपली रणनीती ठरवत असत. शत्रूचे सामर्थ्य जास्त असल्यास राजे लपून वार करत. हे हल्ले शत्रूच्या आघाडीवर न होता पिछाडीवर अथवा बाजूंवर होत असत. शक्य तेवढी कापाकापी करून शत्रू सावध होताच मराठी सैनिक पळून जात. पळून जाणे हे कमीपणाचे द्योतक नसून आत्ता जीव वाचविणे व नंतर शक्तीसंपन्न होऊन पुन्हा शत्रूचे लचके तोडणे असे विलक्षण धोरण राजांनी पत्करले होते. हे करत असताना रात्री अपरात्री हल्ले करणे निषिद्ध न मानता, राजे हटकून रात्रीच हमले करत. तान्हाजी व कोंडाजींच्या अनुक्रमे कोंढाणा व पन्हाळ्यावरच्या इतिहासप्रसिद्ध लढाया रात्रीच मारल्या आहेत. हातात आलेल्या शत्रूला जिवंत सोडण्याची चूक राजांनी केली नाही. अफझलखान हातात येताच राजांनी त्याचा हिरण्यकश्यपू केला. स्वराज्याशी गद्दारी करणारे, फितुरीचा प्रयत्न करणारे दुसर्‍या दिवशीचा सूर्योदय पाहत नसत. राजांनी शत्रूला कितीतरी वेळा वचने दिलीत व ती सर्रास तोडली. सिद्दी जौहर, बहादूरखान, औरंगजेब अशा अनेक मातबर लढवय्ये व मुत्सद्यांना राजांनी हातोहात फसविले. मुळात शत्रूशी असेच वागायचे असते, त्याला विश्वासघात म्हटले जात नाही. विश्वासघात स्वकीयांचा केला जातो. शिवाजीराजांनी पालकरांचा अथवा मोरोपंतांचा विश्वास मोडला असता तर तो विश्वासघात झाला असता, शत्रूचा कसला विश्वासघात?
 
 
चाणक्याने वर्णिलेल्या कूटयुद्धाचा सातत्याने, प्रकर्षाने अन्‌ परिणामकारक उपयोग करणारे एकमेव नाव म्हणजे- शिवाजी महाराज. शहाजीराजे ‘निषायुद्धप्रवीण’ आहेत, असा उल्लेख स्वतः शंभूराजांनी केलेला आढळतो, पण शिवाजीराजे त्याबाबतीत शाहजीराजांच्याही पुढे गेलेले दिसतात. राजांच्या युद्धनीतीमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे ‘अखंड सावधपण.’ राजे सदासर्वदा आश्चर्यकारकरित्या सावध होते. स्वराज्याला कुठून धोका आहे, हे त्यांच्या गुप्तचरांमार्फत त्यांना भरपूर आधी कळत असे. इतकेच नव्हे, तर स्वराज्यासाठी अनुकूल परिस्थिती कुठे व कशी निर्माण होते आहे, हे सुद्धा त्यांना समजत असे. शत्रूशी चालणार्‍या चर्चा, तह, वाटाघाटी हे सर्व समर्थपणे हाताळत असताना हे सावधपण कधीही ढळले नाही. म्हणूनच मिर्झाराजा जयिंसह किल्ल्यांचे संपूर्ण स्वराज्य मागत असतांना व ते त्यांना सहज शक्य असताना, राजांनी मात्र 23 किल्लेच दिले व 12 किल्ले यशस्वीपणे रोखून धरले. इतकेच नव्हे, तर शतकानुशतकांनी समुद्राचे महत्त्व ओळखणारा हा पहिला राजा ठरला. दूरदर्शी शिवरायांनी समुद्राला सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी अशा जलदुर्गांची माळ बांधली.
 
 
प्रत्येक वेळी शत्रूला मारणे हाच केवळ उद्देश नसे, लहानमोठे सरदार आल्यास राजे त्यांना जिवंत सोडून देण्याच्या मोबदल्यात भरपूर खंडणी वसूल करत. तुंगारण्यात झोडपलेला कारतलबखान याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. इतकेच नव्हे, तर व्यापाराच्या नावावर आलेले इंग्रज सत्ताकांक्षी आहेत, हे ओळखून महाराजांनी त्यांनाही अनेकवेळा व्यापाराच्या खेळातच झोडपले. राजापूरची वखार लुटणे असो अथवा इंग्रजांकडून तांबे विकत घेऊन त्यांना पैशासाठी 2-2 वर्षे झुलविणे असो, महाराजांनी त्यांना आरामात झोपू दिले नाही.
 
 
अशा अनेकविध प्रसंगांमधून आपल्याला दिसते, की- शिवाजीराजांनी इतिहासातील चुकांमधून शिकत स्वतःचे असे युद्धतंत्र विकसित केले. आपल्या शत्रूला ओळखून त्याच्याशी त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचे तंत्र अवलंबिले आणि म्हणूनच जवळपास 600 वर्षांच्या संघर्षात महाराजांचे प्रत्युत्तर सर्वात उठून दिसते. हे असे युद्धतंत्र होते, की- ज्याने पुढील सर्व काळात संख्येने कमी असणार्‍या भारतीय लढवय्यांना शत्रूविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. आजही आपण पाहतो, की- भारतीय सैन्याच्या 20 व्या व 21 व्या शतकातील अनेक पराक्रम याच युद्धतंत्राभोवती एकवटलेले दिसतात.
••