गॅब्रिएल आर्मीच्या स्थापनेवरून वादंग

    दिनांक :03-Dec-2019
|
 
तिसरा डोळा  
 
चारुदत्त कहू 
 
जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, कार्डिनल जॉर्ज मॅलेनचेरी यांच्याविरुद्ध असलेला जमीन बळकावण्याचा आरोप तसेच ऑर्थोडॉक्स आणि जॅकोबाईट गटांमध्ये सत्तेच्या खुर्चीवरून सुरू असलेल्या संघर्षामुळे केरळमधील ख्रिस्तानुयायी सध्या विचलित झाले आहेत. अशात केरळमध्ये गॅब्रिएल आर्मीसारख्या निवृत्त लष्करी सैनिक आणि पोलिस अधिकार्‍यांच्या एका संघटनेचा उदय झाल्याने तिच्या औचित्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
 
धर्मप्रसार हे ख्रिस्ती धर्माचे अभिन्न अंग आहे. त्यासाठी इतर धर्मातील नाडले गेलेले, मागासलेले, वंचित आणि परिस्थितीने ग्रासलेल्या लोकांना निरनिराळ्या प्रकारची आमिषे दाखवून धर्मांतरित केले जाते आणि आपल्या धर्मबांधवांची संख्या वाढविली जाते. केरळ सरकारमधीलच एका विभागात िंहदूंमधील धर्मांतरित मागासवर्गियांना सरकारतर्फेच कर्जाच्या, अनुदानाच्या सोयी-सुविधा दिल्या जात असल्याचे आपण याच स्तंभामध्ये वाचलेले आहे. यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अथवा पादर्‍यांना चर्चकडून मोठ्या बिदाग्यासुद्धा दिल्या जातात. आता या धर्मप्रसाराच्या आड येणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला जावा, या हेतूने केरळमधील चर्चने निवृत्त लष्करी आणि पोलिस अधिकार्‍यांचे एक संघटन उभारले असून, ‘गॅब्रिएल आर्मी ऑफ थलासेरी’, असे खिस्ती लोकांमध्ये लोकप्रिय ठरेल असे नावही त्याला देण्यात आले आहे.
 
 
 
grabieal army_1 &nbs
 
केरळच्या उत्तर भागात प्राबल्य असलेल्या कन्नूर जिल्ह्यातील आर्चडायोसिस ऑफ टल्लीचेरीने (थलासेरी) निवृत्त लष्करी सैनिक, निवृत्त पोलिस अधिकार्‍यांची संघटन बांधणी केली आहे. ग्रॅब्रिएल आर्मीच्या स्थापनेची बातमी पसरताच सर्वत्र खळबळ माजली आहे. तथापि, चर्च प्रशासनाने ही संघटना धर्मप्रसारकांच्या संरक्षणासाठी नव्हे तर कन्नूर जिल्ह्यात 9 डिसेंबरला होऊ घातलेल्या कृषी मेळाव्यात सहभागी होणार्‍या शेकडो लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. सुमारे 100 ते 150 जणांची निवृत्त लष्करी सैनिकांची ही आर्मी 9 डिसेंबरला कन्नूरमध्ये तैनात राहणार आहे. या मेळाव्यासाठी कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यातील सुमारे 1 लाख शेतकरी तसेच निरनिराळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही सारी गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी गॅब्रिएल आर्मी स्थापन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ज्याप्रमाणे नर्सेस आणि डॉक्टरांचा समावेश असलेल्या फोरमची स्थापना केली जाते, त्याच धर्तीवर गॅब्रिएल आर्मीसुद्धा अस्तित्वात आणण्यात आली आहे, असाही खुलासा चर्चने केलेला आहे. ख्रिस्ती धर्मात देवदूत म्हणून मान्यता असलेल्या गॅब्रिएल यांचे नाव या संघटनेला देण्यात आले आहे. ख्रिस्ती धर्मानुयायांचा विश्वास बसावा आणि संघटना बांधणीसाठी मदत व्हावी, म्हणून मुद्दाम या नावाची निवड करण्यात आली आहे.
 
केरळमधील चर्च सध्या निरनिराळ्या वादात सापडल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या गॅब्रिएल आर्मीकडेही संशयाच्या दृष्टीने बघितले जात आहे. काहींनी गॅब्रिएल आर्मीची गरज काय, असा सवाल उपस्थित केला आहे. या आर्मीचा कुठलाही जातीय अजेंडा नसून, कोणत्याही कॅथॉलिक व्यक्तीस गॅब्रिएल आर्मीमध्ये सहभागी होता येईल, असे चर्चकडून सांगण्यात येत आहे. सध्या चर्चने पोलिस आणि लष्करातील निवृत्त अधिकारी आणि जवानांना या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे. तथापि, इतर संघटनांशी संबंध असलेले लोकही या संघटनेत सहभागी होऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. चर्चच्या कार्यक्रमांच्या आयोजनात आमचा सहभाग राहणार असेल तर आम्हाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया गॅब्रिएल आर्मीत दाखल झालेल्या काही निवृत्त सैनिकांनी व्यक्त केलेल्या आहेत; पण अशा प्रकारच्या संघटनेच्या स्थापनेला जॉइंट ख्रिश्चन कौन्सिलचे सचिव आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी जॉर्ज जोसेफ यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते सध्या केरळमधील चर्चवर कुणाचे नियंत्रण असावे, कुणाची सत्ता आणि प्राबल्य असावे, यासाठी संघर्ष सुरू असल्याने अशा प्रकारच्या संघटनांची उभारणी औचित्यपूर्ण ठरू शकत नाही. आपल्या ध्येय-धोरणांना विरोध करणार्‍या प्रामाणिक अनुयायांविरुद्ध जर या आर्मीच्या सेवा वापरल्या जाणार असतील तर त्याचे समर्थन होऊच शकत नाही. विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे काही दिवसांपासून गैरकॅथॉलिकांमधील ऑर्थोडॉक्स आणि जॅकोबाईट गटांमध्ये मध्य केरळमधील अनेक चर्चवर सत्ता कुणाची यावरून संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. यावरून अनेक धर्मानुयायांना अंत्यसंकारासाठी भूमी नाकारण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
 
अलीकडे, एर्नाकुलमच्या आर्चडायोसिसमधील कॅथोलिकांच्या गटाने जमीन घोटाळ्याचा आरोप असलेल्या कार्डिनल जॉर्ज अॅलेनचेरी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कोची येथील कार्डिनल हाऊसकडे कूच केले होते. डॉर्ज अॅलेनचेरी यांच्याकडे अतिशय प्रतिष्ठित धर्मगुरू म्हणून बघितले जाते; पण त्यांचेच नाव जमीन घोटळ्यात आल्याने अनेकांची धर्मावरील श्रद्धा आणि चर्चवरील विश्वास विचलित झाला आहे.
ननच्या नियमबाह्य बदल्यांच्या वादामुळेही केरळमधील चर्च सध्या चर्चेत आहेत. यासदर्ंभात बिशपसोबत झालेल्या संघर्षाने वर्तमानपत्राच्या जागाही व्यापल्या. काही दिवसांपूर्वी एका फादरने त्याच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या एका विद्यार्थिनीशी केलेल्या दुर्व्यवहारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटाने आंदोलन केले होते. केरळातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या दुष्कृत्यांवर पांघरुण घालण्याचे काम व्हॅटिकनकडून होत असल्याबद्दलही सर्वसामान्य चर्च समर्थकांमध्ये नाराजी आहे.
जॉर्ज जोसेफ यांनी व्यक्त केलेली भीती सार्थ आहे, कारण फ्रँको मुलक्कल बलात्कार प्रकरणाचा विरोध करणार्‍या ख्रिस्तानुयायांवर आणि वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही चर्चभक्तांनी हल्ला चढवून त्यांना पळवून लावले होते. फ्रँको मुलक्कल यांच्या अटकेची मागणी लावून धरणार्‍या आणि ‘सेव्ह अवर सिस्टर’ आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍या अॅड्‌. इंदूलेखा जोसेफ म्हणतात, ‘‘चर्चच्या पुढार्‍यांच्या एकामागोमाग एक उघड होणार्‍या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी निवृत्त सैनिक आणि पोलिसांच्या संघटनेचा वापर होणार असेल तर अशा संघटनेच्या स्थापनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितच होणार. निवृत्त अधिकार्‍यांचा सध्या सेवेत असणार्‍या अधिकार्‍यांशी संबंध असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या संघटनेचा दुरुपयोग होण्याचीच अधिक शक्यता आहे.’’
 
हनुमान सेना, छत्रपती सेना या धर्तीवर या संघटनेला गॅब्रिएल सेना या नावाने भारतीय ओळख देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. गॅब्रिएल सेनेचे (आर्मीचे) संचालक मॅथ्यू अशारीपराम्बल म्हणतात, सेवानिवृत्त सैन्य आणि निमलष्करी सैनिकांनी विश्र्वासाचे रक्षण करणारे आणि आदर्शांचे योद्धा व्हायला हवे, अशी आमची इच्छा आहे. पुढे त्यांच्या सेवा चर्चच्या लहान-मोठ्या कार्यक्रमांमध्ये बहुधा गर्दी नियंत्रणासाठी वापरल्या जातील. कॅथॉलिक चर्चने वेगवेगळ्या व्यावसायिकांचे गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केरळमध्ये डॉक्टर्स, शिक्षक आणि अनिवासी केरळींचे गट यापूर्वीपासूनच कार्यरत आहेत.
रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंची भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि त्यांनी केलेल्या छळवणुकीला कंटाळून गेल्या काही वर्षांत अनेक ख्रिस्ती लोकांनी रोमन कॅथॉलिकांचे वर्चस्व झुगारून इतर गटांशी हातमिळवणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कॅथॉलिक चर्च नाकारणार्‍यांविरुद्ध गॅब्रिएल सेनेचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
केरळमधील ख्रिस्ती लोकसंख्येमध्ये रोमन कॅथॉलिकांची संख्या 61 टक्के आहे. परंतु सिरियन ऑर्थोडॉक्स आमि जॅकोबाईट सिरियन्स हे स्वतंत्र गट असून, त्यांचा रोमन कॅथॉलिकांशी कुठलाच संबंध नाही. पण संख्याबळामुळे रोमन कॅथॉलिक या गटांवर हावी होण्याच्या प्रयत्नात असतात. यातूनच सत्तासंघर्ष सुरू असतो. आता गॅब्रिएल आर्मीच्या स्थापनेच्या निमित्ताने हा संघर्ष अधिक टोकदार झालेला आहे.
9922946774