पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासादायक बातमी

    दिनांक :03-Dec-2019
|
नवी दिल्ली,  
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या खातेधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पीएमसीच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पिनाकी मिश्रा यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नावर उत्तर देताना पीएमसी बँकेचे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे मतही सीतारामन यांनी नोंदवले.
पीएमसी बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यात असलेली संपूर्ण ठेव काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यात एकावेळी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले. लग्न समारंभ, आरोग्य विषयक अचानक उद्भवलेली गंभीर स्थिती, शिक्षण अशा बाबतीत पीएमसी बँकेच्या खातेधारकांना रिझर्व्ह बँकेच्या संबंधित दिशानिर्देशांनुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढण्याचीही मुभा आहे, असे सीतारामन यांनी पुढे स्पष्ट केले.
 
pmc bank 1_1  H
'पीएमसी बँकेचे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. रिझर्व्ह बँकेशी सकारात्मक अशा समन्वयातून याबाबतीत ठोस पावले सरकार उचलत आहे. त्याचाच भाग म्हणून पीएमसी बँकेच्या ७८ टक्के खातेधारकांना त्यांची संपूर्ण जमाठेव काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सगळे मध्यमवर्गीय वा आयुष्याची कमाई बँकेत ठेवणारे ग्राहक आहेत. त्यामुळेच त्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची चिंता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत', असे सीतारामन यांनी नमूद केले.