'दबंग ३' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

    दिनांक :03-Dec-2019
|
कोल्हापूर,
सलमान खानचा बहुप्रतिक्षित दबंग ३ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'हुड हुड दबंग' या गाण्यामुळे हा वाद सुरू झाला. हिंदू जनजागृती समितीने या गाण्यावर आक्षेप घेतला असून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी #BoycottDabangg3 हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेण्ड करत होता.

sal_1  H x W: 0 
 
 
'हुड हुड दबंग' या गाण्यात साधू- संतांना नाचताना दाखवण्यात आल्यामुळे या गाण्याचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. गाण्यातील एका दृश्यात श्रीकृष्ण, श्रीराम, भगवान शिवची भूमिका केलेले कलाकार अभिनेते सलमान खानचा आशीर्वाद घेताना दाखवले आहे. यामुळे या चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये वगळावेत अशीही मागणी केली जात आहे.
दरम्यान या विवादाबद्दल बोलताना सलमानने स्पष्टीकरण देत म्हटलं की, 'असे वाद येत- जात असतात.' यानंतर वरीना हुसैनकडे पाहत सलमान पुढे म्हणाला की, 'वरिनाच्या सिनेमाच्या नावावरूनही वाद झाला होता. पण आता सर्व काही शांत आहे.' प्रभुदेवा दिग्दर्शित 'दबंग ३' सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप आणि सई मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमातून सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेची व्यक्तीरेखा साकारत आहे. येत्या २० डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सलमानला पुन्हा दबंग अवतारात पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्साही आहेत.