ऋतुचक्राच्या फेर्‍यांत अडकलेले वर्ष...

    दिनांक :30-Dec-2019
सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असताना अचानक थंडी अवतरली आहे. गेल्या वर्षाचा ताळेबंद मांडत असताना नव्या वर्षाच्या जमा-खर्चाची योजना तयार होते आहे. गेले वर्ष तसे भारतासाठी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेगळे आहे. सामाजिक या शब्दसंकल्पनेला ‘राष्ट्रीय’ असा नवा आणि यथायोग्य आयाम गेल्या वर्षाने दिला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत आले. एखाद्या अनुभवी फलंदाजाने नव्या चेंडूची चकाकी घालवत, चेंडूवर नजर पक्की करत पहिली काही षट्‌के खेळून काढावीत आणि नंतर धावगती वाढवावी तसेच केंद्रातल्या सरकारने केले आहे. पहिल्या पाच वर्षांत वातावरण तयार केले आणि आता दणक्यात आपला अजेंडा राबविणे सुरू केले आहे. त्रिवार तलाक संपविणारा कायदा, काश्मिरातील कलम 370 हटविणे आणि आता नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती अशी ‘चेस दी टार्गेट’ खेळी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या वातावरण तापले आहे. महाराष्ट्र आणि झारखंडात सत्ता मिळाल्यामुळे विरोधकांच्या शिडांतही वारे शिरकाव करू लागले, असे त्यांना उगाच वाटत आहे. अशा मस्तपैकी उष्ण वातावरणात थंडी आलेली आहे.
 

agralekh 30 dec_1 &n

खर्‍या अर्थाने हे वर्ष निसर्ग, पर्यावरणाचे वर्ष आहे. आता हे वर्ष सरत आलेले आहे. अगदी आमचे वाचक सकाळच्या थंडीत गरम चहासोबत हा लेख वाचत असतानापासून अगदी 40/44 तासांवर हे वर्ष अखेरच्या वळणावर उभे आहे. या वर्षाचा ताळेबंद मांडायचा झाला, तर तो ऋतूंच्या पाटीवरच मांडावा लागणार आहे. यंदाच्या वर्षात ऋतूंनी माणसांची मस्ती उतरविली आहे. भारतातच नव्हे, तर जगात हीच अवस्था आहे. ऋतुचक्राचे वेळापत्रक ही त्याची अगतिकता आहे, त्यामुळे ठरल्या वेळी पाऊस येणार, थंडी पडणार, भारतीय उपखंडात उन्हाळाही येणार, ही आमची मिजासच या वर्षाने मोडून काढलेली आहे. मानवाच्या अतिरेकी आणि अंध भुकेमुळे त्याने निसर्गाला गृहीतच धरले आहे. निसर्गाशी त्याने फारकतच घेतली. हवा खराब केली, पाणी नासविले, जंगले फस्त केली. कार्बनचे प्रमाण वाढते आहे, ते रोखले पाहिजे, असे पॅरिस परिषदेच्या आधीपासूनच सांगितले जात आहे. इशारे दिले जात आहेत. त्यामुळे ऋतुचक्र बिघडेल, त्याचा फटका मानवसमूहालाच जबर बसेल, या इशार्‍यांकडे कुणी लक्षच दिले नाही. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेने पॅरिस परिषदेला नाकारले. भारत, चीनसारख्या विकसनशील देशांनी ही जबाबदारी विकसित देशांवर टाकली, तरीही भारतात वृक्ष, पाणी आणि हवा संवर्धनासाठी सरकारने हाक दिलेली आहे. तरीही वातावरणाच्या र्‍हासामुळे जे काय घातक बदल होणार... होणार असे सांगितले जात होते, त्याची सुरुवात या वर्षात झालेली आहे. त्या अर्थाने या वर्षाची नोंद विशेषत्वाने घ्यावी लागणार आहे. कारण, या वर्षात निसर्गाने विनाशकारी विभ्रमांचे दर्शन घडविले. हा इशारा आहे. निसर्गाची ही भाषा आम्ही समजून घ्यायला हवी, हे सांगतच नवे वर्ष येते आहे.
 
सरत्या वर्षात उन्हाळा वाढला. निसर्गाच्या गणितानुसार हे असे फेरबदल होत असतात, मात्र यंदा अनुभवलेले हे बदल नैसर्गिक नाहीत. माणसाने निसर्गाशी जी काय छेड काढली आहे त्याचा हा पहिला दणका आहे. निजलेल्या सिंहाच्या अंगावर त्याच्या आयाळीशी खेळणार्‍या उंदराला सिंहाने पंजात पकडावे, तसे यंदा मानवाचे झालेले आहे. सरत्या वर्षात तापमान 48 डिग्रीच्या वर गेले होते. भारताचाच विचार करायचा झाला, तर देशाच्या अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यात मृगनक्षत्रावर गेल्या दशकात पाऊस आलेलाच नाही. कधी अल निनो तर कधी ला निनो या वादळांनी त्रास दिलेला आहे. इतरही वादळे नेमकी मान्सूनच्या आगमनाच्या काळातच येतात आणि वार्‍यांची दिशा बदलते. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या कृषिचक्राचे गणितही बिघडते. यंदा ते पार कोसळले होते. जून, जुलै हे महिने कोरडे गेले. ऑगस्टमध्ये पावसाला अखेरीस सुरुवात झाली. भाद्रपदात त्याने जोर धरला. इतका की मग केरळात महापूर आला. पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली आला असताना पाऊसमान इतके असंतुलित होते की, इकडे विदर्भ-मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत कोरड होती. नाशकातल्या धरणांचा ओसंड इकडे मराठवाडा जलमय करत होते. असे या आधी कधी झालेले नव्हते. विदर्भात अगदी भाद्रपदातही कूलर्स लावावे लागत असताना, तिकडे शेजारच्या आपल्याच राज्याच्या प्रदेशात महापूर आला होता. हे केवळ भारतातच घडत होते असे नाही. आशिया खंडात पाणी अनेक देशांच्या डोक्यावरून गेले असताना, तिकडे युरोपात कधी नव्हे ते तापायला सुरुवात झालेली होती. हिमनग वितळू लागले होते. भारतात सुरुवातीला यायला विसरलेला हा पाऊस नंतर जायला विसरला. परतीचा म्हणणारा पाऊस येतीचा वाटावा इतका थांबून राहिला. कशीबशी तगविलेली पिकंही अनेक भागांत हातची गेली. परतीच्या पावसाने नासाडी केली. अगदी अश्विनातील कोवळीकही या पावसाने खुडून नेली. कार्तिकाचा काकडा पावसात भिजला. आता पौषाचे हे दिवस आहेत. मकरसंक्रमणाकडे आपण वाटचाल करतो आहे. हे दिवस म्हणजे हळूहळू उन्हं करडी होेत जाण्याचे दिवस आहेत. शिशिरात पानगळ सुरू होते. थंडी हळवी होत जाते. मात्र, यंदा अजूनही पाऊस जायचे नाव घेत नाही. केवळ पीकपाण्याचा विचार करावा इतका हा लहान विषय नाही. ही मानवाने ओढवून घेतलेल्या विनाशाची सुरुवात आहे. दमट वातावरणाने थंडीला सुरुवातच झालेली नव्हती. आता थंडीनेही परत जावे, अशा दिवसांत पारा विक्रमी घसरतो आहे. हे बर्‍याचे लक्षण नाही, मात्र मस्तवाल सत्ताधार्‍यांची सत्ता लोकांनी घालविल्यावरही त्यांची मस्ती कणभरही कमी होऊ नये, अशीच आपली अवस्था आहे. अजूनही आम्ही झाडांची कत्तल करत सुटलो आहोत. विकासाच्या आमच्या संकल्पना नैसर्गिक विवेकाला धरून नाही. झाडे कापावीत की नाही, हा निर्णय खरेतर आमच्या नैतिक शहाणपणावर घ्यायचा; पण त्यासाठीही आम्ही न्यायालयात कायद्याच्या भाषेचा आधार घ्यायला लागलो आहोत. झाडे लावा, असा नारा देताना आम्ही झाडे कापत सुटलो आहोत. त्याचेही राजकारण करतो आहोत.
 
आता पर्यावरणाची चळवळ जोमाने उभी राहायला हवी. सरत असलेल्या वर्षाने आम्हाला हेच सांगितले आहे. निसर्गाची ही भाषा कळली नाही, तर आम्हाला पश्चात्ताप करायलाही वेळ उरणार नाही. अमेरिका याबाबत उर्मटपणा करत असली, तरीही फ्रान्स, जर्मनीसारखे देश त्यांना जागतिक हवामान परिषदेच्या मंचावरच सुनवायला कमी करत नाहीत. इंग्लंडमध्ये लोक पर्यावरणाचे बजेट सादर करा म्हणून रस्त्यावर उतरले. मोठे आंदोलन झाले. या वर्षात तुम्ही कार्बनचे प्रमाण किती कमी करणार, याचे बजेट द्या, ही तिथल्या जनतेची मागणी आहे. साहेबांच्या देशातली यावेळची निवडणूक खरेतर याच मुद्यावर व्हायची; पण ती ब्रेक्झिटवर नेण्यात आली. कुठल्याही देशातले सत्तेचे राजकारण हे असे शहाण्या मुद्यांपासून भरकटवत नेले जातेच.
भारतात पर्यावरण जागृतीची चळवळ आहे. झाडांसाठी लोक रस्त्यावर उतरतात. भारतीय संस्कृतीच मुळात निसर्गाधारित आहे. तरीही आणखी काम व्हायला हवे. केरळ, कर्नाटक त्या आधी काश्मिरात झालेली अतिवृष्टी हे सातत्याने मिळणारे इशारे आहेत. तिकडे पाश्चात्त्य देशांत ग्रेटा थनबर्गसारखी बालिका पर्यावरणाच्या र्‍हासासाठी आंदोलन करते. भारतातही शालेय विद्यार्थी आता आंदोलन करू लागले आहेत. ग्रेटाने तर अमेरिकेच्या अध्यक्षांनाही खडे बोल सुनावले. ऋतुचक्राचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, ही जाणीव आता बालवयापर्यंत पाझरली आहे. पृथ्वीची कवचकुंडले असलेल्या ओझोनच्या थराची काळजी घेणे आवश्यक आहे, हे ग्रेटासारख्या लहानग्यांना कळू लागले आहे. खरेतर त्यांच्या पिढीसाठी आम्ही मोठ्यांनी पृथ्वी राखली पाहिजे. ते काम आम्ही करत नाही म्हणून भविष्यच त्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरते आहे...