पुन्हा एक निर्भया!

    दिनांक :06-Dec-2019
|
पल्लवी उधोजी
 
अन्वी कॉलेजमधून घरी आली. खूप खूश होती व उदासपण होती. आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. खूश यासाठी होती, शिक्षण संपताच तिचे नीलेशशी लग्न होणार होते आणि उदास होती की, कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी तिला आता कधीही भेटणार नव्हते. ठरल्याप्रमाणे लग्नाची बोलणी करण्याची तारीख ठरली. दुपारी 3 वाजता नीलेशच्या घरचे लोक बोलणी करण्यासाठी आले. अन्वीच्या घरचे लोक खूप खूश होते. नीलेशच्या आईवडिलांनी हुंडा मागितला, पण अन्वीच्या घरची परिस्थिती हुंडा देण्याइतपत चांगली नव्हती. त्यांच्याजवळ फक्त एकच श्रीमंती होती ती म्हणजे त्यांच्या मनाची श्रीमंती! अन्वीचे कुटुंब खूप चांगले होते. अन्वीच्या वडिलांनी नीलेशच्या आईवडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ. शेवटी लग्न मोडलं. अन्वी खूप तणावात गेली. तिच्या मनावर खूप परिणाम झाला. दुसर्‍या दिवशी अन्वीने आत्महत्या केली.
 
 
समाजात घडणार्‍या या घटनांना आजची तरुण पिढी बळी पडत आहे. ही घटना, मग ती हुंडाबळीची असो वा बलात्काराची. समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार याचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण दिसून येत आहे. त्यातल्या त्यात मीडियावाले हे अत्याचार अगदी चवीने चघळत आहेत. आरोपींना नुसते आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून या समस्या सुटणार नाहीत, तर समाजातील प्रत्येक शिक्षित, सुजाण व्यक्तीने या गोष्टींवर शांतपणे विचार करायला हवा. समाजात स्त्रियांना जरी असुरक्षिततेची भावना वाटायला लागली, तरी समाजात घडणार्‍या या गोष्टींकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस समाजात जे अत्याचार वाढत आहेत, तो या आदर्शवादी संस्कृतीला, आपल्या प्रगल्भतेला एक काळपट डाग आहे. या एकविसाव्या शतकात भारतीय संस्कृतीवर एक भयानक घाला घातला जात आहे. तसे बघता आजही काही ठिकाणी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे हुंडापद्धतीचा अवलंब समाज करताना आढळून येत आहे. हुंडापद्धतीवर कायद्याने जरी आळा आणला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून आज या 21 व्या शतकात राजरोसपणे हुंडा घेतला जातो व दिला जातो, हे सत्य नाकारता येणार नाही. 

nirbhaya _1  H  
 
 
समाजात असेही चित्र दिसत आहे की, बर्‍याचशा मुली, आपल्या वडिलांना हुंडा द्यावा लागेल, ते कर्जबाजारी होतील या भीतीने लग्नाआधीच आत्महत्या करत आहेत. या भयाण सत्याचा दुष्परिणाम समाजावर होत आहे. याच हुंडाबळीचा परिणाम म्हणजे समाजात आत्महत्या, कन्याभ्रूणहत्या आणि मुलींचा खून अशा घटना घडत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच राज्यात अराजकता वाढीस लागली आहे.
 
 
आज भारतात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे समाजात राहणार्‍या लोकांची मानसिकता ही स्त्रीविषयक गृहीत धरली जात आहे. याचा परिणाम काय होतो की, या हुंडापद्धीमुळेच मुलींचा जन्म आज समाज टाळत आहे.
 
 
आपला समाज पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेत पूर्णपणे जखडला गेला आहे. त्यामुळेच कायदे करूनसुद्धा, कायद्याला न जुमानता राजरोसपणे या गुन्ह्याचा अवलंब करत आहे. माझ्या मते, ब्रिटिशांचे जेव्हा राज्य होते तेव्हा त्या काळात भारताने ब्रिटिशांना हुंडा म्हणून काही ठेवी देऊ केल्या म्हणूनच त्यावेळेपासून ही हुंडापद्धती सुरू झाली असावी.
 
 
आज जोपर्यंत कडक शासन लागू होत नाही तोपर्यंत आपल्या देशात हे गुन्हे वाढतच राहणार. मग ते हुंडापद्धती असो वा स्त्रियांवर होणारे अत्याचार...
 
 
मला असं म्हणायचं नाही की, सगळ्या गुन्ह्यांसाठी फक्त पुरुषच जबाबदार आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे, रस्त्याने एखादी स्त्री जात असेल तर मागून बाईकवरून येणारा पुरुष तिच्या गळ्यातला दागिना हिसकावून पळून जातो. दुसरं उदाहरण म्हणजे, पुरुष एका स्त्रीवर अत्याचार करतो. या दोन्ही घटनांमध्ये आरोपी फक्त पुरुषच आहे. या दोन्ही घटना एकाच तराजूत तोलता येणार नाही. स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराला जेवढा पुरुष जबाबदार असतो तेवढाच स्त्रियांचासुद्धा सहभाग असतो, हे तेवढेच खरे आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास, गुन्हा करणारा व गुन्हा सहन करणारा हे दोन्ही गुन्ह्याला जबाबदार असतात.
 
 
हा लेख लिहीत असताना अचानक सुन्न करणारी घटना पेपरमध्ये वाचली. हैदराबादमध्ये एका निरागस डॉक्टर प्रियंका हिच्यावर काही बेधुंद नराधमांनी अत्याचार करून तिला जिवंत जाळले. खरंच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आज भारतात आपण पाश्चात्त्य संस्कृतीच्या पेहरावाचे अनुकरण करतो. पण, आज पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये अशा गुन्ह्याला जागीच कठोर शासन केले जाते. मग आपल्या देशात आपला कायदा त्या संस्कृतीचा अवलंब का नाही करत? निर्भया अशीच गेली, पण तिच्या मारेकर्‍याला अजूनपर्यंत शिक्षा झालेली नाही. जर कायद्याने गुन्हेगाराला जागीच शिक्षा केली तर निर्भया, प्रियंकासारख्या निष्पाप मुलींचा जीव जायला पाबंद लागेल. जर पाबंद नाही लागला तर आपल्या देशात असे अत्याचार होतच राहणार.
गुन्हेगाराला शिक्षा होईल. तो काही वर्षांनी सुटेलही व हे अत्याचार होत राहतील...
 
 
असं वाटतं की, रस्त्याने जाताना हा नराधम जर एकटा असेल तर त्याची एवढी हिंमत होणार नाही, जेवढी त्याची हिंमत समूहात होत असेल. हा समूह चौकाचौकात पानटपरीवर जमत असेल, रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या महिलांवर बारीक नजर ठेवत असेल. माझं असं म्हणणं आहे की, अशांवर पोलिसांनी नजर ठेवून त्यावर बंदी आणायला हवी. म्हणजे प्रियंका व निर्भयासारख्या केसेस या देेशात घडणार नाहीत.
 
 
निर्भया, प्रियंका प्रकरणापासून सुरू झालेल्या गुन्ह्यात अनेकदा असे अत्याचार घडत आहेत, पण आपल्या भारतात मेणबत्त्या लावण्याखेरीज आपण काय केले आहे? निर्भयाच्या त्या नराधमांना अजूनही फाशी झाली नाही. मला वाटतं या नराधमांना नुसती फाशीची शिक्षा न देता भरचौकात त्यांचे लचके तोडून त्यांना प्रियंकासारखं जाळायला हवं. तरच समाजात कायद्याची भीती या नराधमांत निर्माण होईल. कायद्यात सुधारणा करून या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करायला हवं.