याचसाठी केला होता अट्‌टहास?

    दिनांक :06-Dec-2019
|
संपदा गणोरकर
 
आतातरी सुधरा... नुसता ‘निषेध’ किंवा ‘हळहळ’ व्यक्त करून काहीच होणार नाही.
ती सशक्त झाली. आत्मरक्षक झाली. स्वावलंबी झाली; पण... पण, आजही ती ‘सुरक्षित’ नाही.
कारण...? कारण... आजही तिला फक्त ‘मादी’ म्हणून बघण्याचा समाजातील नराधमांचा ‘विकृत’ दृष्टिकोन.
मी प्रत्येकच पुरुषाला दोष देत नाही, देणारही नाही; पण अगदी कळवळून इतकेच सांगणार की, आज प्रत्येक आईला आपल्या घरातील मुलांवर योग्य संस्कार करणे गरजेचे होऊन बसले आहे.
का सुटावा तोल...
आपल्याही घरात एक स्त्री आहे. हे का विसरतात ही निर्लज्ज, नालायक मुलं?
अरे, तुम्हीसुद्धा एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलाय. ज्या स्त्री योनीतून तुम्ही जन्म घेतला त्या स्त्रीलाच असे भर चौकात उघडे-नागडे पाडून तिच्या देहाचे लचके तोडण्याचा हक्क दिला कुणी तुम्हाला?
आज सगळ्यात जास्त पॉर्न साईट बघण्याचे प्रमाण भारतात आहे. तरुणाई यात अग्रेसर आहेच; पण मध्यम वयातील पुरुषांची संख्या लक्षणीय आहे हे विशेष! का करतो आपण असे? हे वेड आले कुठून? ही विक्षिप्त मानसिकता आली कुठून?
ही भारतीय संस्कृती नक्कीच नाही. याची पाळं-मुळं रुजवण्याचे काम पाश्चात्त्य संस्कृती करतेय. भरीस भर इंटरनेटचा कमी (बाल) वयापासून वाढलेला सर्रास वापर (गैरवापर).
आपण म्हणतो, शिवबा जन्माला यावा; पण तो आपल्या घरात नाही तर शेजारच्या घरात. का? आपण ‘जिजामाता’ होऊ शकत नाही म्हणून? का आपल्याला स्वतःलाच अजून आपली स्वतःची ओळख पटलेली नाही? 
 
sampada _1  H x
 
 
हेही सगळे खरे की, मुली हल्ली कमी कपड्यांत वावरतात. त्यांना शरम राहिली नाही. मुलांची नजर त्यांच्याकडे वळेल इतके तोकडे कपडे त्या वापरतात... इ. इ. पण, मग त्या अनेक बलात्कारपीडित लहान चिमुकल्या मुलींचा, त्यांच्यासोबत जे घडले त्यात काय दोष होता? सांगा की त्यांनीही या अशा विकृतांना आव्हान केले होते, तोकड्या कपड्यांत वावरून? काय दिसले होते त्या नराधमांना त्या वेळी त्या सहा महिने वय असलेल्या लहानग्या चिमुकलीत? एक मादी?
 
 
जर आजच्या घडीला सामाजिक स्थितीत याबाबतीत सुधारणा करायची असेल, तर आधी एक सशक्त नागरिक जन्माला यायला हवा. त्यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीलाच ही जबाबदारी आजच्या घडीला पार पाडावी लागणार आहे की, तिने आपल्या मुलांना अगदी लहान असल्यापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवावे. ‘परस्त्री मातेसमान’ हा दृष्टिकोन िंबबवणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे होऊन बसले आहे.
 
 
आजूबाजूच्या बलात्काराच्या घटना पाहता, हे मात्र तितकेच खरे आहे की संयम सुटतोय. तो संयम फक्त संस्कारांनीच अंगी बाणविता येणार अन्‌ ते संस्कार करण्याची जबाबदारीसुद्धा आता आपण स्त्रियांनाच पेलावी लागणार.
 
 
मैत्रिणींनो, आपल्या आया-बहिणी, मैत्रिणी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपणच हा विडा उचलू या. आपल्या घरात ‘शिवबा’ जन्मला नाही तरी चालेल; पण येणार्‍या काळात अशा अवतीभवती घडणार्‍या बलात्काराच्या घटनांना इतर, कुटिल मनोवृत्ती ठेवणार्‍या लोकांना अशा घटनांमध्ये प्रतिसाद न देता प्रतिबंध करण्यासाठी. त्यांचा आपल्या देशातील स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराला विरोध करण्यासाठी. एक शूरवीर मावळा संस्कारांनी आपल्या घरात नक्कीच घडवावा. तर आणि फक्त तरच आपली ‘ती’ सुरक्षित, सुखरूप या देशात मुक्तसंचार करू शकेल. अगदी घड्याळाचे काटेसुद्धा तिच्यावर कुठलीही बंदी घालू शकणार नाहीत.
 
 
कराल ना इतकेच? नाहीतर तुम्हाला ‘निषेध-निषेध’ म्हणून ओरडण्याचासुद्धा काहीही अधिकार उरणार नाही.