प्रियांकाच्या निमित्ताने...

    दिनांक :06-Dec-2019
|
संघमित्रा खंडारे 
 
संत जनाबाई, मीराबाई यांसारख्या स्त्रियांनी भक्ती आणि बुद्धीचा मेळ साधून मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. मोगलसत्तेला छेद देऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे असामान्य स्वप्न जिजाबाईंनी शिवरायांच्या रूपाने साकार केले. स्वातंत्र्यलढ्यात असामान्य धाडस दाखवणार्‍या मादाम भिकाजी कामा, पहिली महिला राज्यपाल सरोजिनीदेवी नायडू, राजदूत विजयालक्ष्मी पंडित, पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील, अलीकडच्या काळातल्या पुरुष सहकार्‍यांचे नेतृत्व करून संशोधनकार्यासाठी सहा महिने अंतराळात राहणारी सुनीता विल्यम्स, गुन्हेगारी दुनियेला विधायक वळण लावणार्‍या किरण बेदी, बॉक्सिंगचे क्षेत्र गाजवणारी मेरी कॉम, अंजू बॉबी जॉर्ज यांसारख्या महिला; तर जगाच्या इतिहासात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या अंधत्वावर मात करून प्रसिद्ध पावणारी लेखिका हेलन केलर, दोन वेळा नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी मेरी क्युरी, सौंदर्यवती ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा या सगळ्या स्त्रिया आपल्या सभोवतीच आहेत.
 
 
sanghmitra _1  
 
 
आधुनिक युगाशी जुळवून घेणारी, अनेक भूमिका पार पाडणारी तीच सर्जक आहे. जीवनाचा प्रवास तिच्याच उदरातून सुरू होतो. तीच सुरुवात आहे तरीही ती केवळ उपभोग्य वस्तू आहे, कनिष्ठ आहे; पुरुषसत्ताक समाजाच्या या दृढ झालेल्या धारणेतून तिच्यावर लैंगिक अत्याचार व बलात्कार होत असतात. म्हणजे सुरुवातच धोक्यात आहे, हे दु:खद वास्तव आहे.
 
 
अश्लील विनोद करणे, दिसण्यावरून, पोशाखावरून भाष्य करणे, काम करताना द्विअर्थी भाषा वापरणे, उगाच स्पर्श करणे, रोखून पाहणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शरीरसुखाची मागणी करणे, चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, मुद्दाम एकटक रोखून पाहणे... या प्रकारच्या लैंगिक शोषणाला जवळपास प्रत्येक स्त्री बळी पडत असते. लैंगिक आकर्षणातून पुरुष हे असंमत लैंगिक छळ करत असतात. हा एक मानसिक आजारच आहे.
 
 
या विकृतीची पुढची पायरी, तीव्र स्वरूप किंवा अधिकाधिक विकृत स्वरूप म्हणजे बलात्कार. तो तिच्या संमतीशिवाय परपुरुषाकडून किंवा पतीकडून (जबरदस्तीने केलेला शरीरसंग) होत असतो.
 
 
बलात्कार करणार्‍या राक्षसांना भर चौकात फाशी द्यायला हवी, अत्याचार करणार्‍याचे गुप्तांग छाटून त्याच्या हातात द्या, या प्रकारच्या अत्यंत प्रक्षोभक प्रतिक्रिया येतात.
 
 
झेपत नसेल तर एकट्यादुकट्या स्त्रीने उशिरा रात्री मित्राबरोबर, सहकार्‍याबरोबर जायचेच कशाला? असे उत्तेजक, तोकडे कपडे घातले तर हे होणारच, यासारख्या बिनडोक प्रतिक्रिया पुरुषांच्या बरोबरीने खुद्द स्त्रियासुद्धा देतात आणि मग बलात्कार या पाशवी वृत्तीला आळा घालायचा राहून जातो.
 
 
जिच्यावर बलात्कार झाला ती किंवा बलात्कारी हे अमुक एका जातीचे, धर्माचे आहेत/होते, आता नाही उतरणार मेणबत्त्या घेऊन समाज रस्त्यावर, अशाप्रकारची शिसारी आणणारी संवेदनाशून्य चर्चा सुरू होते.
 
 
कोणत्याही स्त्रीवर बलात्कार होतो ही केवळ त्या स्त्रीदेहाची, भावनांची विटंबना नाही किंवा ती ज्या जाती-धर्मात जन्माला आली त्या जाती-धर्मावर झालेला अत्याचार नाही, तर अशा घटना या संपूर्ण समाजाला लागलेला कलंक आहे. बलात्कारी व्यक्तीसुद्धा कोण्या विशिष्ट जाती-धर्माची असत नाही. तो शिक्षित, अशिक्षित, नोकरी करणारा किंवा बेरोजगार, गरीब किंवा श्रीमंत कोणीही असू शकतो. हा एक साथीचा रोग आहे.
 
 
रात्री उशिरा कामावरून परत येणार्‍या पुरुषाच्या मनात आपली घड्याळ, पैशांचं पाकीट वगैरे कोणी हिसकावून घेईन ही भीती येते. पण, एखादी समलिंगी व्यक्ती आपल्यावर बलात्कार करेल, अशी भीती मनात येत नाही. एकट्यादुकट्या स्त्रीला मात्र सर्वात जास्त भीती लाटते ती लैंगिक छळ किंवा बलात्काराची!
 
 
एकटी असताना वडील, भाऊ किंवा पुरुष सहकार्‍यापेक्षा सभ्य दिसणार्‍या पुरुषाबद्दलही तिला विश्वास वाटत नाही. बलात्कार करणारा हा कधी चौदा वर्षांचा मुलगा, आपल्याच नातीवर बलात्कार करणारा ऐंशी वर्षांचा म्हातारा, कामावर जाणार्‍या बायकोच्या अनुपस्थितीत आपल्याच मुलीवर बलात्कार करणारा बाप, सख्खा मामा, काका, शेजारचा दादा, रस्त्यावरचा अनोळखी पुरुष किंवा कामाच्या ठिकाणचा सहकारी पुरुष असू शकतो. तो सहा महिने किंवा साठ वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करणारा असू शकतो.
 
 
म्हणून बलात्कार करणे या मनोवृत्तीकडे बघताना तिचे मूळ शोधणे गरजेचे आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या जडणघडणीवर कुटुंब आणि समाज यांचा प्रभाव पडत असतो. बालपणापासून वाढवतानाच मुलगा आणि मुलगी यांच्यावर दोन वेगवेगळ्या भूमिका लादल्या जातात. संगोपनादरम्यान तिला/त्याला अमुक एक गोष्ट करू नये, ते तुझं काम नाही किंवा हे तुझंच काम आहे, अशा सूचना दिल्या जातात. वडिलधार्‍या मंडळींच्या प्रत्यक्ष वागणुकीतून मुलगा-मुलगी भेद मनात रुजवला जातो.
 
 
मुलीला समजदार, सोशीक बनवले जाते आणि मुलाला बाहेर जा, दुकानातून वस्तू विकत आण, अशा कामांमधून त्यांच्यात धीटपणा, व्यावहारिकता रुजवली जाते.
 
 
पुढे जडणघडणीदरम्यान मुलगा नेहमीच कुटुंब आणि समाजात स्त्रीला असलेलं गौण स्थान पाहत असतो. घरातील सर्व कामे स्त्रीनेच (काही अपवाद वगळून सुनेने, सासूने नव्हे), घर, मुलं, पै-पाहुणा हे सारं सांभाळून करता येत असेल, तरच काही काम करण्यासाठी तिला बाहेर पडता येतं. नोकरी करत असली तरी घरकामं आणि सर्वांची सेवा मात्र तिनंच करायची, अशी अपेक्षा ठेवली जाते. काही सन्माननीय अपवाद सोडले तर तिला आर्थिक स्वातंत्र्य दिलं जात नाही. अशा परिस्थितीला तिनं विरोध केलाच तर तिची म्हणजेच कुटुंबाची वाताहत होते. या सगळ्यासाठी तिलाच जबाबदार धरले जाते. ती स्वतःही असं मानू लागते. हजारो वर्षांच्या गुलामीने स्त्रीने आत्मविश्वास गमावला आहे. स्त्रियांवर अत्याचार करणारा पुरुषच कुटुंबाच्या केंद्रस्थानी असेल, तर त्यांचा आदर्श ठेवणारी पुढची पिढी स्त्रियांचा सन्मान कशी करेल? तिला आर्थिक स्वातंत्र्य देईल? तिला कायम गौण वा दुय्यम स्थान देईन. आपल्याही नकळत हे बाळकडू पिढीदरपिढी संक्रमित केलं जातंय. यामधून मुलांची हिंमत वाढते. यातूनच स्त्रियांवर अत्याचार करण्याची वृत्ती बळावते. स्त्री ही माणूस नसून एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी व्यवस्था आहे, हा दृष्टिकोन रुजवणार्‍या पुरुषसत्ताक व्यवस्थेची ही बदमाशी आहे.
 
 
म्हणून केवळ लैंगिक भूक शमवण्यासाठीच वासनांध पुरुषांकडून बलात्कार होतात, हे संपूर्ण सत्य नाही तर ते समस्त स्त्रीवर्गाला दहशतीत, धाकात ठेवण्यासाठी केले जातात. तिने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर तिला धडा शिकवण्यासाठी त्यात अधिक क्रौर्य, विटंबना ते अगदी नंतर छळ करून निर्घृण खूनही केले जातात. ही विकृती नष्ट करायची असेल, तर स्त्रीला सर्व पापांचे मूळ कारण मानणार्‍या, तिचे माणूसपण हिरावून घेणार्‍या, देवी-देवता मानून तिला सन्मान देण्याची बतावणी करणार्‍या दांभिक पुरुषसत्ताक समाजाची; स्त्री आणि पुरुष दोघांचीही मनावर खोल कोरलेल्या या विचारातून मुक्तता होणे आवश्यक आहे.
 
 
बलात्कार्‍याला कठोरातलं कठोर शासन करणे केवळ हाच यावरचा दीर्घकालीन उपाय नाही. असे कायदे धाक निर्माण करू शकतात, पण बलात्कार थांबवू शकत नाहीत. कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. गावगुंडांना राजरोस फिरताना बघून, प्रसिद्ध नेते, अभिनेते कितीही मोठा गुन्हा केल्यावर चुटकीसरशी सुटलेले दिसतात. म्हणजे सरकार, व्यवस्था ‘मी यातून सहज सुटू शकेन’ असा विश्वास देत असतात. गुन्हेगारांना शासनयंत्रणेत अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे दिसते. याउलट शहाण्या माणसांना पोलिस स्टेशनची, कोर्टाची पायरी चढण्याची इच्छा नसते, असं दिसून येते. अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले खटले तातडीने निकालात निघायला हवेत. कायद्यातील सुधारणा तत्काळ अंमलात आणायला हव्यात.
 
 
शिक्षेची तीव्रता वाढली नाही तरी चालेल, पण शिक्षेची हमी असली पाहिजे. सोबतच स्वसंरक्षण सिद्धतेची प्रशिक्षणे अव्याहत सुरू राहायला हवीत. यासाठी शासन, प्रशासन, समाज यांनी एकजुटीने, एकदिलाने झटायला हवं.
 
 
सोबत संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुष सर्वांनीच आपल्यापासून सुरुवात करायला हवी. पुन्हा निर्भया, कोपर्डी, खैरलांजी, प्रियंका... घडू नये यासाठी सर्व भेदांपलीकडे जाऊन माणूस म्हणून संवेदनशीलतेने या समस्येकडे बघायला हवे.