नाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीची लढाई अजून वाढली

    दिनांक :06-Dec-2019
|
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताचं नाव मीटू चळवळीमुळे सर्वांच्याच लक्षात राहिलं. या चळवळीत तिने नाना पाटेकरांविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणातून पाटेकरांना क्लिनचीट मिळाली. आता पुन्हा एकदा तनुश्री लाइमलाइटमध्ये आली आहे. तनुश्रीने अंधेरीच्या रेल्वे मोबाइल मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयात 'प्रोटेस्ट' (निषेध) याचिका दाखल केली आहे. ही याचिका ओशिवरा पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या ब सारांश अहवाला विरोधात आहे. या अहवालानंतरच नाना पाटेकरांना क्लीनचिट मिळाली होती.

tanushree_1  H
 
अभिनेत्री तनुश्री दत्ताने हॉर्न ओके प्लीज (२००९) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. २०१८ मध्ये एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने नानांवर गंभीर आरोप करत हे प्रकारण पोलिसांपर्यंत नेलं होतं. पण सबळ पुरावा नसल्यामुळे नाना यांना क्लीन चिट मिळाली होती.
नाना यांना क्लीनचिट दिल्यामुळे तनुश्री दत्ताच्या वकिलाने तिच्यासोबत पक्षपात केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसांनी अनेक साक्षीदारांची साक्षच नोंदवली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. निषेध याचिकेत म्हटल्यानुसार, हॉर्न ओके प्लिजचे सहाय्यक सह-दिग्दर्शक शाइनी शेट्टी यांना तपासासाठी पोलिसांनी बोलावले होते. परंतु त्याचे म्हणणे पूर्ण न ऐकताचं त्यांना परत पाठवण्यात आले.
या व्यतिरिक्त अन्य साक्षीदारांनी या प्रकरणात आपली साक्ष दिली असतानाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पत्रकार वसीमची पोलिसांनी चौकशी केली नाही. या गुन्ह्याचा योग्य तपास केला गेला नाही तसेच या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्यामुळे अँटी करप्शन ब्यूरोद्वारे अन्वेषण अधिकाऱ्याची चौकशी केली पाहिजे आणि एफआयआर नोंदविला जावा असं तनुक्षीने सांगितलं. या याचिकेत मुंबई पोलिसांचा बी सारांश अहवाल फेटाळून लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाना यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर तनुश्री खूप चिडली होती आणि तिने नाना पाटेकर आणि मुंबई पोलिसांना भ्रष्ट म्हटलं होतं. तनुश्री दत्तामुळे बॉलिवूडमधील मीटू चळवळ जोर धरू लागली होती. तनुश्रीनंतर मीडिया, बॉलिवूड ते राजकारणापर्यंतच्या सेलिब्रिटींनी आपले अनुभव शेअर केले आणि या प्रकरणी अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली होती.