बॉलिवुडचा खिलाडी सोडणार कॅनडाचे नागरिकत्व

    दिनांक :07-Dec-2019
|
नवी दिल्ली,
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने सात वर्षांपूर्वी कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले? याचा गौप्यस्फोट अक्षयने दिल्लीतील एका कार्यक्रमात केला. त्याशिवाय, आता पुन्हा भारताचा नागरिक होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यासाठी त्याने भारताच्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.
 

akshay kumar _1 &nbs 
 
अक्षय कुमार अनेकवेळा नागरिकत्वाच्या मुद्यावरून टिकेचा धनी झाला आहे. कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्याविषयी तो म्हणाला, बॉलिवुडमध्ये माझे सलग 14 चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे आपली कारकीर्द आता धोक्यात आली असून जगण्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली. त्यात माझ्या कॅनडातील मित्राने कॅनडात दोघे मिळून व्यवसाय करु, असा सल्ला दिला होता. त्यामुळे मी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले. मात्र, सुदैवाने माझा पंधरावा चित्रपट चालल्याने माझ्यावरचे संकट टळले. त्यानंतर, पासपोर्ट बदलण्याबाबत विचार केला नसल्याचे अक्षयने सांगितले.
 
कॅनडाचे नागरिकत्व स्विकारल्यानंतर नेहमीच माझ्या देशभक्तीवर संशय व्यक्त केला जातो. त्यामुळेच मी भारतीय नागरिकत्व पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे अक्षयने सांगितले. दरम्यान, मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट दाखण्याची वेळ येते ही गोष्टी खेदजनक असल्याचे अक्षय म्हणाला.