हिंदूंच्या विरोधात भरलेला पहिला दरबार!

    दिनांक :08-Dec-2019
|
मौलवी अब्दुल खलिक मीथा यांचे एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये आले होते. 78 वर्षीय मीथा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहेत. त्यांनी कबूल केले की, मी हिंदू मुलींना मुस्लिम बनविण्याच्या कार्यात लिप्त होतो. शेकडो मुलींना मुसलमान बनविले. माझ्या पूर्वजांनीदेखील हेच केले आणि माझी नऊ मुलेदेखील हेच करतील. 
 
मीथा ही सामान्य व्यक्ती नाही. सिंध प्रांतातील कन्व्हर्जनचा सर्वात मोठा अड्‌डा म्हणून बदनाम धरकी शहरातील भरचूंदी दर्ग्याचे प्रमुख आहेत. इथे गेल्या 9 वर्षांत 450 मुलींना मुसलमान बनविण्यात आले. मीथा यांना, पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचेही मानले जाते. मीथा यांनी त्यांच्या पूर्वजांची गोष्ट केली. परंतु, ते कुठल्या पूर्वजांची गोष्ट करत आहेत, हे मला समजले नाही. 
 
सिंध प्रांताची दुर्दशा किंवा सिंधहून सुरू होऊन हिंदुस्थानच्या दुर्दशेची कहाणी ज्या एका नावापासून सुरू होते, ते म्हणजेे मोहम्मद बिन कासिम. कासिमने इ. स. 712 मध्ये सिंधला जिंकले आणि पुरते लुटले. स्त्रिया-मुलांना गुलाम बनविले. त्याने केलेल्या नरसंहाराच्या अनेक कथा आहेत आणि अशा रीतीने त्याने एका नव्या विचारधारेची ओळख हिंदुस्थानला करून दिली.
 
मीथाचे पूर्वज इ. स. 712 च्या आधी सिंधमध्ये कोण होते? याच त्या पूर्वजांनी 80 वर्षांपर्यंत अरबांचा जोरदार प्रतिकार केला आणि प्रत्येक ठिकाणी अरबांना पराभूत केले. 712 च्या जून महिन्यात मात्र मीथा यांचे पूर्वज हरले आणि काय विडंबना आहे बघा, आता मीथासारखे लोक आपले पूर्वज कासिम आणि गजनवीशी जोडण्यात अभिमान बाळगतात. आणि जर मीथा यांचे पूर्वज कासिम, गजनवी, गोरी वगैरेंनाही आपले पूर्वज मानत असतील, तर दोन-चार पिढ्यांपूर्वी त्यांचीही अशाच प्रकारे ओळख बदलविण्यात आली होती. जसे सिंधमध्ये घडले तसेच नंतर उर्वरित हिंदुस्थानच्या कानाकोपर्‍यातही घडले आहे. तलवारीच्या जोरावर किंवा आर्थिक लाभाच्या पदांच्या आमिषामुळे चिपकविलेले नवे नाव, नवी ओळख, नवे प्रार्थनास्थळ आणि नंतर स्मरणावर जमलेली शेकडो वर्षांपासूनची धूळ. आता आपली ओळख कुठल्या पूर्वजांपर्यंत घेऊन जायची, हे मीथासारख्या लोकांवर अवलंबून आहे. 
 
अखेर, हिंदूंना अशा रीतीने मुसलमान बनविण्याची जिद्द कशापायी? मीथासारख्यांच्या वक्तव्यांवर इतर इस्लामी संस्थांचे मौन हेच दर्शविते की, ते या विषारी जिद्दीवर समाधानी आहेत. नाहीतर या सर्वांनी मीथाला पागल म्हटले असते. असा विचार करणारा तो मुसलमान होऊच शकत नाही. असे वैचारिक विष मेंदूत भरणारे हे लोक कोण होते? हिंदुस्थानात मुस्लिम सल्तनत कायम झाल्याच्या 40 वर्षांच्या आतच, सुलतानाच्या दरबारात बाकायदा ठरविण्यात आले होते की, आता या हिंदूंचे काय केले जावे? त्या काळात नेमके काय घडत होते, हे जरा त्या जखमी इतिहासात डोकावून बघू या. 
 
मंगोल आक्रमक चंगेज खान आणि त्याचा नातू हलाकू खान यांच्या हल्ल्यांनी तेव्हा इराक-इराण या प्रदेशाची अतिशय दुर्दशा करून टाकली होती. तोपर्यंत इराक-इराणला इस्लामी प्रभावाखाली येऊन तीन-चार शतके झाली होती. चंगेज व हलाकूच्या हल्ल्यांनी त्रस्त झालेले हजारो इस्लामी अनुयायी हिंदुस्थानच्या दिशेने पळत सुटले होते. अगदी आजच्या सीरिया अथवा यमनसारख्या प्रांतांच्या शरणार्थींसारखे ते दिल्लीच्या आसपास स्थिरावले. ही इ. स. 1200-1260 सालची गोष्ट आहे. 
 
हलाकूने 1258 मध्ये, इस्लामी खलिफांच्या लुटीने मालामाल बनलेल्या बगदादला जमीनदोस्त केले होते. इस्लामच्या प्रभावाखाली नव्यानेच आलेल्या अरबांनीदेखील इराकच्या या भागाची अशी स्थिती, काही शतकांपूर्वी केली होती. एका अर्थाने इतिहासाची ती पुनरावृत्तीच होती. अंगावर शहारे येतील अशा कत्तली आणि लूट करीत इस्लामच्या खलिफांनी बगदादला शोभायमान बनविले होते. ही शोभा हलाकू नावाच्या अशाच प्रकारच्या एका वादळाने मातीत मिळवून टाकली. 
 
चंगेज-हलाकूच्या हल्ल्यांमुळे, कन्व्हर्टेड बगदादी विस्थापितांची भली मोठी रांग दिल्लीच्या दिशेने जात होती. यांची संख्या इतक्या वेगाने वाढली की, जियाउद्दीन बरनी यांनी तारीख-ए-फिरोजशाहीमध्ये लिहिले- ‘‘दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचे प्रदेश इस्लामी शिक्षण आणि मुस्लिम विद्वानांचा गड झाले होते.’’ बरनी नावाच्या या व्यक्तीने, त्या काळाची डोळ्यांनी बघितलेली परिस्थिती दस्तावेजांमध्ये नोंदविली आहे. 
 
खुद्द जियाउद्दीन बरनी यांचे सुरवातीचे आयुष्य याच बगदादी विस्थापित पळपुट्यांमध्ये गेले होते. याच लोकांच्या नशिबाने दिल्लीवर, काही वर्षांपूर्वीच पहिल्या मुहम्मद गोरीच्या तिसर्‍या आक्रमणात पृथ्वीराज चौहानच्या पराभवानंतर गोरीचा कब्जा झाला होता आणि कुतुबुद्दीन ऐबकपासून सुरू झालेल्या गुलामांच्या राज्यात, त्याच्या फौजांनी बंगाल आणि गुजरातपर्यंत हल्ले करणे सुरू केले होते. 
 
तो काळ असा होता की, संपूर्ण हिंदुस्थान शिकारीसाठी एकप्रकारे खुला प्रांत होता आणि जंगली कुत्रे, भुकेले लांडगे आणि तडसांच्या टोळ्यांनी सिंध प्रांताकडून त्याचे लचके तोडणे सुरू केले होते. सिंधपर्यंत हे अरबी वंशाचे होते. सिंधनंतर तुर्क आणि अफगाणींनी या हिंसक टोळधाडीला वेगाने पुढे नेले. 
 
लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या प्राणाच्या व संपत्तीच्या रक्षणासाठी मुसलमानांचे हे जत्थे जेव्हा दिल्लीत आले, तेव्हा ते एका मुस्लिम देशात आले होते. ही सुलतान इल्तुतमिशच्या काळातली गोष्ट आहे. बरनीच्या नुसार, इथे आल्यावर त्यांना आश्चर्य वाटले की, हिंदूंमध्ये अनैकेश्वरवाद आणि मूर्तिपूजा खोलवर रुजली आहे. हे हिंदू कुराण न मानणारे आहेत आणि तरीही दुसर्‍या दर्जाचे नागरिक नाहीत. ते जिझिया (गैरमुस्लिमांकडून वसूल करण्यात येणारा कर) भरायला तयार नसतात. परंतु, जर त्यांच्या मानेवर तलवारीचे पाते ठेवले तर ते लगेच तयार होतात. 
 
दिल्लीच्या गादीवर तेव्हा इल्तुतशिमचे राज्य होते. तो रझिया सुलतानचा बाप आणि गुलाम वंशाचाच एक सुलतान होता. बगदादेतून आपला जीव वाचवून पळून आलेल्या या तथाकथित विद्वानांना येथे येऊन हिंदूंचे हे असले वर्तन आवडले नाही. इस्लामी राज्यात दुसर्‍या धर्माचे लोक आपली पूजापद्धती कशी काय सुरू ठेवू शकतात? हा एका मोठ्या विवादाचा विषय बनला होता. या समस्येवर तोडगा काय? तीन पर्यायांवर चर्चा होऊ लागली. पहिला- हिंदूंची हत्या करण्यात यावी. दुसरा- त्यांना इस्लाम कबूल करण्यास भाग पाडावे आणि तिसरा- त्यांच्याकडून जिझिया वसूल करून मग त्यांना त्यांच्या पूजापद्धतीप्रमाणे वागू दिले जावे. 
 
दिल्लीत ही गरमागरम चर्चा सुरू राहिली आणि सर्वांचे एका मुद्यावर एकमत झाले की, मुस्तफा अलैहिस्सलामचे (पैगंबर मोहम्मद) सर्वात मोठे शत्रू हिंदू आहेत. कारण, मुस्तफा अलैहिस्सलामच्या पंथात सांगण्यात आले आहे की, हिंदूंची कत्तल करण्यात यावी, त्यांची बेइज्जत करून त्यांची धनदौलत लुटण्यात यावी. यातही हिंदू ब्राह्मणांना विशेषकरून सर्वात वर ठेवण्यात आले. 
 
या विवादाच्या तोडग्यासाठी हे विस्थापित शरणार्थी विद्वान, सुलतान शम्सुद्दीन इल्तुतमिशच्या दरबारात हजर झालेत आणि या समस्येला अतिशय विस्ताराने त्याच्यासमोर ठेवले. एका अर्थाने हा, दिल्लीवर कब्जा केल्यानंतर काहीच दशकांनंतर बाकायदा हिंदूंच्या भविष्याचा निर्णय करण्यासाठी भरलेला पहिला दरबार होता. यात सुलतानासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला की, दीने-हनीफीसाठी हिंदूंची कत्तल करणे अथवा त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे हेच उचित राहील. तिसर्‍या पर्यायाला या प्रस्तावात नाकारण्यात आले. हिंदूंकडून जिझिया अथवा खिराज घेऊन संतुष्ट होऊ नये, असे कारण सांगण्यात आले.
 
सुलतानाने या ‘शांतिदूतां’चे संपूर्ण म्हणणे शांतपणे ऐकून, वजीर निजामुलमुल्क जुनैदीला आदेश दिला की, त्याने या विद्वानांच्या प्रस्तावाला उत्तर द्यावे. जुनैदीने सुलतानच्या समक्षच म्हटले की, ‘‘विद्वानांनी जे सांगितले ते सत्य आहे, यात काही शंका नाही. हिंदूंच्या बाबतीत हेच व्हायला हवे होते की, एकतर त्यांची कत्तल करायला हवी िंकवा त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडायला हवे. कारण ते मुस्तफा अलैहिस्सलामचे कट्‌टर दुश्मन आहेत. ना ते इस्लामी राज्यातील गैरमुस्लिम नागरिक आहेत, ना त्यांच्यासाठी हिंदुस्थानात कुठला पवित्र ग्रंथ अथवा पैगंबर पाठविण्यात आला.’’ 
 
यानंतरचे जुनैदीचे म्हणणे लक्ष देण्यालायक आहे. तो म्हणतो- ‘‘परंतु हिंदुस्थान तर आताआताच आमच्या ताब्यात आला आहे. येथे हिंदू प्रचंड संख्येत आहेत. त्यांच्यात मुसलमानांची संख्या म्हणजे वरणातील मीठ! असे होऊ नये की, आम्ही एखादा हुकूम देऊन त्यावर अंमलबजावणी सुरू करावी आणि या सर्वांनी एकत्र येऊन चारही बाजूने बंड करावे. असे झाले तर आपण फार मोठ्या संकटात सापडू. काही वर्षे जाऊ द्या आणि राजधानीच्या आसपासचा प्रदेश अधिक मुसलमानबहुल झाला आणि आमचे फार मोठे सैन्य तयार झाले की मग आम्ही फर्मान काढावे की, एकतर हिंदूंची कत्तल करा िंकवा इस्लाम कबूल करण्यासाठी त्यांना अपमानित करा.’’
 
हे मुस्लिम विद्वान, हिंदूंची कत्तल करण्याच्या आपल्या मागणीवर इतके अडून बसले होते की, वजीर जुनैदचे उत्तर ऐकून ते सुलतानला म्हणाले- ‘‘जर हिंदूंच्या कत्तलीचा हुकूम देता येणे शक्य नसेल, तर सुलतानांनी त्यांच्या दरबारात आणि शाही इमारतींमध्ये हिंदूंचा आदर-सन्मान तरी होऊ देऊ नये. हिंदूंना मुसलमानांमध्ये वसती करण्यास मनाई करण्यात यावी. मुसलमानांची राजधानी, सुभा आणि वस्त्यांमध्ये मूर्तिपूजा आणि अल्लाबाबत कृतघ्नता कुठल्याही परिस्थितीत थांबविण्यात यावी.’’ जियाउद्दीन बरनी लिहितात की, सुलतान इल्तुतमिश आणि वजीर जुनैदी यांनी या मुस्लिम विद्वानांच्या या तीन प्रस्तावांना मान्य केले होते. 
 
आता तुम्ही त्या काळच्या दिल्ली आणि हिंदुस्थानाची कल्पना करा. ज्या दिवशी इल्तुतमिशच्या दरबारात हिंदूंच्या वर्तमान व भविष्याबाबत निर्णय घेतले जात होते, तेव्हा हिंदूंच्या घरी, दुकानांमध्ये आणि सतत संकटात सापडलेल्या लहान-मोठ्या राज्यांमध्ये जीवन कसे सुरू होते? भविष्यात येणार्‍या संकटांची त्यांना चाहूल तरी लागली होती का? इकडे, बगदादहून आलेले हे पळपुटे आणि भ्याड मुहाजिर, ज्यांना गेली चार-पाच शतके अरब आक्रमकांकडून अशाच प्रकारे निर्दयी व अमानवी पद्धतींनी धर्मांतरित करण्यात आले होते, आता ते सर्व विसरून इस्लामच्या नावाने जोशात आले होते आणि त्यांना हिंदुस्थानच्या काफिरांना लक्ष्य करण्याचे सुचत होते. येथे ते आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून चुकले होते. याच वेळेस दिल्लीच्या महरौली भागात 27 हिंदू मंदिरांना ध्वस्त केले जात होते आणि मंदिरांच्या मलब्यातून कुव्वत-उल-मशिदीसोबत एका उंच मिनाराचे काम सुरू झाले होते. हे सर्व अगदी याच काळात घडत होते. 
 
आपण एकदा पुन्हा बगदादकडे जाऊ, ज्याला 1258 च्या जानेवारीत हलाकूंनी घेरून जिंकले होते. हलाकूच्या फौजा भुकेल्या लांडग्यांसारख्या शहरात दाखल झाल्या होत्या. त्यांनी अब्बासी खलिफाचा खून करून सार्‍या शहराला लुटले, महालातील महिलांना रस्त्यांवर ओढत आणले, शहरातील सर्व मशिदी व 36 ग्रंथालयांना जाळून राख केले. असा अंदाज आहे की, सुमारे 10 लाख लोक या हल्ल्यात कापून काढण्यात आले. 
 
darbar_1  H x W  
 
या विध्वंसातून जीव वाचवत हे लोक शरणार्थीच्या रूपात हिंदुस्थानाकडे आले होते. हा सर्व प्रकार आजची सर्वात भयानक दहशतवादी संघटना- इस्लामिक स्टेटच्या (इसिस) सीरियावरील कब्ज्यानंतर समोर आलेल्या नृशंस घटनांशी किती मिळताजुळता आहे नाही! तेथे यजिदी समुदायाचे काय झाले? काही दिवसांपूर्वीच एक यजिदी महिला, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर रडत रडत, तिच्या संपूर्ण कुटुंबाला कसे ठार करण्यात आले ते सांगत होती. आताही अनेक लोक बेपत्ता आहेत. ती मात्र एका शरणार्थीच्या रूपात जीव वाचवून पळाली होती. 
 
मीथासारखी मानसिकता असलेल्या आजच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि हिंदुस्थानातील मुसलमानांनी थंड डोक्याने थोडा विचार करावा आणि या तपशिलाच्या बारकाव्यात जाऊ नये. हे त्यांच्यासाठी कुठल्याही अर्थाने गर्व करण्यालायक नाही. बरनी यांनी इस्लामच्या विस्ताराची जी आरंभीची चौकट समोर ठेवली आहे, ती त्या निर्दयी पळपुट्या विद्वानांच्या तसेच तलवारीच्या जोरावर शक्ती प्राप्त करणार्‍या क्रूर विदेशी सुलतानांच्या यशाची सुरवात होती. 
 
हा सर्व तपशील सिद्ध करतो की, सात शतकांपर्यंत आमच्या विवश आणि अपमानित पूर्वजांनी जो दहशतवाद सहन केला, त्याच दहशतवादाची निर्मिती म्हणजे ही आजची मुसलमान लोकसंख्या आहे. जो जेव्हा कमकुवत पडला, तो कन्व्हर्ट झाला. आम्ही एकाच प्रदेशातील आहोत. आमचे पूर्वज एक आहेत. आम्ही वेगळे कसे काय झालो, याचे दिग्दर्शन बरनीने दिलेला त्या अंधार्‍या इतिहासाची दुसरी बाजू करते. ते स्वत:ला ज्या विचारांचे अनुयायी मानत आहेत, ते खरे म्हणजे त्या विचारांचेच पीडित आहेत. पिढ्यान्‌पिढ्यांपासून पीडित आहेत. 
 
आता थोडा परिचय जियाउद्दीन बरनीचा. बरनीचा जन्म याच काळातला आहे. अलाउद्दीन खिलजीच्या काळात याचे वडील मुईदुलमुल्क हे बरन शहरात उच्च पदावर होते. अलाउद्दीनच्या देवगिरीवरील आक्रमणाच्या समयी याचे एक काका- अलाउलमुल्क दिल्लीचे कोतवाल होते. मोहम्मद बिन तुगलकच्या काळापर्यंत जियाउद्दीन यांनी खूप कमाई केली. ते स्वत: उच्च पदांवर राहिले. निर्दयी सुलतानाची वारेमाप स्तुती करत राहिले. कत्तल आणि लूट यांच्या जोरावर इस्लामच्या प्रगतीचे मरेपर्यंत खूप समर्थन केले; तसेच भविष्यात हिंदुस्थानच्या दूरवरच्या प्रांतांवर कब्जा करणार्‍या भावी सुलतानांना आणि नवाबांना, इस्लामच्या प्रसारासाठी काय काय करता येऊ शकते, याच्या एकाहून एक युक्त्या सांगितल्या. तो कट्‌टर सुन्नी मुसलमान होता आणि सुन्नींशिवाय जगात कुणालाही मानाने जगण्याचा हक्क नाही, असे मानत असे. हिंदुस्थानातील हिंदू काफिरांच्या सर्वनाशासाठी तो मजहबी दलालांच्या मदतीसाठी नेहमीच एका पायावर तयार राहिला. ‘सहीफै नाते मुहम्मदी’ नावाच्या पुस्तकात त्याने लिहिले आहे- ‘‘मुस्तफा अलैहिस्सलाम काफिरांच्या धर्माविरुद्ध होते. म्हणून मुस्तफा अलैहिस्सलाम व त्याच्या मजहबाचे हे काफिर दुश्मन आहेत.’’ 
 
मी जेव्हा इतिहासाच्या या कठीण काळाबाबत विचार करतो, तेव्हा वाटते की, आजचे जिन्ना, जिलानी, जरदारी, गिलानी, आझाद, अब्दुल्ला, आझम, ओवैसी, भट्‌ट, भुट्‌टो, इरफान, इक्बाल, इमाम, खान, सलमान, सुलेमान, हबीब, हाफिझ मीथा आणि मुफ्तींच्या पूर्वजांची मुळे इतिहासात कुठे जाऊन जुळत असतील? 
 
इस्लामी राज्यात गैरमुस्लिम असलेले (ज्यांना जिम्मी म्हणतात) ते दुर्दैवी लोक, जिझिया कर चुकवत राहिले आणि जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे गेले तेव्हा त्यांनी नवा मजहब कबूल केला. विवशतेने ते राज्यकर्त्यांचे सहधर्मी झालेत. असे प्रत्येक सुलतान आणि बादशाहच्या राज्यात सतत व प्रत्येक ठिकाणी होत होते. काही पिढ्यांपर्यंत त्यांना आपल्या मूळ पूर्वजांचे स्मरण राहिले असावे. परंतु, आता या हरविलेल्या स्मरणाच्या एका दयनीय वस्तुस्थितीवर शतकानुशतके जमलेल्या धुळीला साफ करण्याची आवश्यकता आहे. भूतकाळात झालेल्या आपल्या पूर्वजांच्या दुर्गतीला कुणी कसे काय विसरू शकेल?
 
(लेखक- ‘भारतात इस्लामचा विस्तार’ या विषयावर गेली 20 वर्षे अभ्यासरत आहेत.)