हिंदवी स्वराज्य

    दिनांक :08-Dec-2019
|
डॉ. परीक्षित स. शेवडे
0251-2863835
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव मानणारे होते. काही मनुवादी लोकांनी जाणीवपूर्वक त्याला हिंदवी स्वराज्य असे नाव दिले... आमचे एक पत्रकार मित्र तावातावाने सांगत होते.
व्यासांनी महाभारत आयपॅडवर लिहिलं होतं. काही जणांनी जाणीवपूर्वक भूर्जपत्रावर लिहिल्याचं खोटं सांगितलं. आमचे उत्तर!
पत्रकार मित्र चिडले आणि म्हणाले, काहीही वाट्‌टेेल ते बोलता काय? सुरू कोणी केलं? आमचा प्रतिप्रश्न! 

chatrapati _1   
 
इतिहास हा समकालीन कागदपत्रे, उल्लेख, पुरावे यांद्वारे वस्तुनिष्ठपणे अभ्यासायचा असतो. आपली विचारसरणी इतिहासावर लादायची नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे निर्विवादपणे हैन्दव स्वराज्य असल्याचे अनेक समकालीन संदर्भ आढळतात. अनेकदा आपल्याला ते ठाऊक नसतात इतकेच. याकरताच काही संदर्भ आवर्जून वाचकांसमोर ठेवत आहे.
 
•यवनाक्रांत राज्य आक्रमामवे अवनी मंडळ निर्यवनी करावे निगूढ चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व, पश्चिम, दक्षिण या प्रांती जे जे यवन स्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावरी सेनासमुदाय पेरून मारून काढले. साल्हेरी-अहिवंतापासून चंजी कावेरीपर्यंत गत राज्य संपूर्ण आक्रमिले. सदर उल्लेख आहे शिवरायांच्या प्रत्यक्ष आज्ञापत्रातील. निर्यवनी या शब्दाचा धर्मनिरपेक्ष अर्थ कोणी काढत असल्यास त्यांना शुभेच्छा!
 
 
•गोव्यातील हडकोळण प्रांतातील अंत्रुज येथे छत्रपती संभाजी महाराजांचा एक शिलालेख आहे. मुसलमानी अमल असताना गोवा प्रांतात कर घेतला जात होता. संभाजी महराजांनी फोंड्याचा अधिकारी धर्माजी नागनाथ यास 22 मार्च 1688 रोजी कळवले, आता हे हिंदुराज्य झाले आहे. त्यामुळे येथील सगळे कर आता त्वरित बंद करण्यात यावेत. सध्या हा शिलालेख पणजी येथील वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन असणारे कविराज भूषण महाराजांचे वर्णन करताना लिहितात-
 
 
वेद राखे विदित पुरान राखे सार युत
रामनाम राख्यो अति रसना सुघर मे
हिन्दुनकी चोटी रोटी राखी है सिपाहन की,
कॉंधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में.
 
 
शिवाजीराजांनी आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे रक्षण केले, संपूर्ण जीवनाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले. हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची उपजीविका रोटी चालवली. याच अवधी रचनेचे हिंदी भाषांतर करून दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या ‘तान्हाजी’ या आगामी चित्रपटात घेतलेल्या संवादावरून भाषा आणि इतिहास या दोन्हीचे ज्ञान नसलेली जात्यांध्य शेरेबाजी पाहिल्यावर समकालीन संदर्भ घेऊन इतिहास शिकण्याची आवश्यकता अधिकच अधोरेखित होते!
 
 
  • मिर्झाराजे जयसिंह यांचे पुत्र रामसिंह यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजी महाराज लिहितात- आम्ही हिंदू सांप्रत काय तत्त्वहीन झालो आहोत? आमच्या देवालयांची मोड-तोड झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत, श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माचरणशून्य आहोत, अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. आम्ही क्षत्रियांस योग्य असेच वर्तन करणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत आपण सारे एक होऊन त्या यवनाधमाला तुरुंगात डांबले पाहिजे. (मूळ संस्कृत पत्राचा मायना डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथात उपलब्ध.) 
  • शिवरायांच्या सैन्यात यवन होते, असे उल्लेख काही जण वारंवार करीत असतात. संदर्भ पाहायला गेल्यास मात्र; शिवकालीन पत्र सारसंग्रह 3 मध्ये महाराजांच्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या काही ठरावीक सरदारांची नावे दिलेली आहेत. सुमारे 95 अधिकार्‍यांची नावे येथे आली आहेत. मात्र, यात एकही यावनी नाव नाही. दौलतखानसारखे लोक स्वराज्यात जरूर होते. मात्र, एकतर ते पूर्णवेळ स्वराजात राहिले नाहीत आणि दुसरे म्हणजे हे लोक पगारी होते. तेथे धर्माचा संबंधच नाही. अशा अपवादांवरून महराजांचे राज्य धर्मनिरपेक्ष ठरवायचे असल्यास औरंगजेबकडे असलेल्या हिंदू सरदारांना पाहता त्यालाही धर्मनिरपेक्ष म्हणावे लागेल! 
  • •समकालीन संदर्भ पडताळत असता; 1672 ते 1681 मध्ये हिंदुस्थान आणि पर्शियामध्ये येऊन गेलेल्या आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाला स्वतः हजर असणार्‍या डॉक्टर जॉन फ्रायरच्या पुस्तकात एक महत्त्वपूर्ण उल्लेख सापडतो. description of Surat या प्रकरणात फ्रायर लिहितो की- शिवाजी महाराज कल्याण व भिवंडी शहरातल्या मशिदी पाडूनच टाकणार होते, पण तसे न करता त्यांचा वेगळ्या प्रकारे वापर करता यावा म्हणून त्यांची धान्य ठेवायची गोदामे करून टाकली! असाच उल्लेख शिवरायांना समकालीन असलेल्या; त्यांच्या दरबारात असलेल्या कवींद्र परमानंद लिखित शिवभारत या संस्कृत काव्याच्या 18 व्या अध्यायातील 52 व्या श्लोकातही मिळतो. इथे या घटना कल्याण आणि भिवंडी येथे घडल्या असल्याचेही उल्लेख आहेत. रायगडावर मशीद आहे, अशी थाप मारणारे त्याच्या समर्थनार्थ असा एखादा समकालीन पुरावा देतील?
  • इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख हेनरी रेव्हिंगटन याने 13 फेब्रु. 1660 या दिवशी शिवरायांना एक पत्र पाठवले आहे. त्यात तो महाराजांचा उल्लेख General of the Hindoo forces म्हणजेच हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा असा स्पष्टपणे करतो.
  • 30 नोव्हेंबर 1667 सालच्या पत्रातील उल्लेखानुसार; शिवरायांनी गोव्यात बळजबरीने सुरू असलेल्या धर्मांतरणाविरोधात मोहीम उघडली. त्यांनी बार्देश प्रांतात चार पाद्री पकडले आणि त्यांना धर्मांतर थांबवा अथवा तुम्हीच हिंदू व्हा, असे सांगितले. त्यांनी यास नकार देताच त्यांची मुंडकी मारून पोर्तुगीज विजरईकडे धाडून दिली!
 
 
धर्मनिरपेक्षता हे स्वराज्याचे उद्दिष्ट असते, तर परधर्म स्वीकारावे लागून मुहम्मद मुर्शीद कुलीखान हे नाव धारण करणार्‍या नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचे क्रांतिकारी पाऊल शिवरायांनी उचलले असते काय? राज्याभिषेकानंतर संस्कृत आणि मराठीचा राज्यकारभारात वापर, हिंदू शकाचा वापर केला असता काय? अवघे आयुष्य कधीही खंड पडू न देता देवस्थानांना देणग्या आणि वर्षासने दिली असती काय? इतिहासाच्या प्रत्येक पानांवर स्वराज्य हे हिंदवी असल्याची साक्ष सापडते. हिंदवी स्वराज्य असल्याने कुणा परधर्मीयावर अन्याय झाला का? तर तसे कधीही झाले नाही. तसे कोणत्याच हिंदू राज्यात झालेले नाही, हे लक्षात घेण्याजोगे आहे. मात्र, हा मुद्दा मांडण्यास थेट स्वराज्यालाच धर्मनिरपेक्ष असल्याचे लेबल चिकटवणे इतिहासाची प्रतारणा करणारे आहे. राज्य हे धर्मातीत असून चालत नाही, ते धर्माधिष्ठित असावे लागते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य!
 
 
(लेखक हे ‘आयुर्वेद वाचस्पति’, व्याख्याते, इतिहास अभ्यासक, राजकीय समीक्षक आहेत.)
••