काकाजी हादरले, पुतण्याजी हेलावले...

    दिनांक :08-Dec-2019
|
र. श्री. फडनाईक 
 
गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात घडलेल्या घटना या राज्यातील प्रजेला पाठ झाल्या आहेत; त्यांची उजळणी करण्याची आवश्यकता नसली, तरी त्यातील एका प्रसंगाचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकणारी, राजनीतीला आगळं वळण देणारी ही घटना आहे. नेतृत्वाच्या एका नव्या पैलूचा परिचय करून देणारा हा प्रसंग आहे.
 
 
गुर्‍हाळ-गडी हक्काबक्का
आमच्याजवळ बहुमत नसल्याने आम्ही सरकार बनवू शकत नाही, असे स्पष्ट करून भाजपा प्रेक्षक दीर्घेत जाऊन बसली आणि तिने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. विरोधकांच्या चर्चा-गुर्‍हाळावर भाष्य न करण्याचे पथ्य पाळले. मंथन सुरूच होतं, घुसळणं सुरूच होतं, पण बहुधा ताक फुळकं असावं, लोणी काही वर येत नव्हतं! वाट पाहून सारेच थकले. रवी ओढणारेही कंटाळले! शेवटी त्यातल्या एकाने दोरी ओढण्यातली व्यर्थता जाणली आणि एक अत्यंत गौप्यता बाळगून ती प्रत्यक्षात उतरवली. दि. 23 रोजी ती अंमलात आली आणि अख्ख्या राज्याला आश्चर्याचा धक्का देऊन गेली. योजना एवढी परिपूर्ण होती, तांत्रिक आणि कायेदशीर ऐरणीवर कसोटीस उतरवलेली होती, की गुर्‍हाळ-गड्यांना, बराच काळ समजलंच नाही की काय झालं आहे आणि जेव्हा समजलं तेव्हा, त्याला कसं तोंड द्यायचं हेही उमजलं नाही. ज्याने आपल्या हाती सोळाही सोंगट्या आणि फासे ठेवले होते, त्याच्या लक्षात आलं, की सारा पट उधळला गेला आहे, हातातल्या नरदा नदारत झाल्या आहेत आणि आघाडीची तिपाई (तिपायी) पार गलंडली आहे.
 
 
‘ती उभीच आहे, कोलमडली नाही,’ हा आव आणणं आवश्यक होतं, शिलकीतल्या शेलक्यांना हिंमत देणं निकडीचं होतं आणि बंडखोरांपुढे शिस्तभंगाच्या कारवाईचा बागुलबुवा नाचवणं त्यातून गरजेचं होतं. हादरलेल्यांनी उसनं अवसान आणलं. ओरड सुरू केली. पुतण्याने आमदारांची फसगत केली, असा कोलाहल माजविला. तिपाईच्या इतर दोन खुंटांना ‘तो मी नव्हेच’चा भरवसा दिला गेला. चार-दोन आमदारांकडून आरोपित फसगतीचा घटनाक्रम जाहीर वदवून घेण्यात आला. राज्यपालांना सादर करण्यात आलेली पुतण्याची यादी आणि पत्र ‘फर्जी’ असल्याची दवंडी पिटविण्यात आली. आमदारांच्या सह्या पािंठब्याच्या नाहीत, तर बैठकीतल्या उपस्थितीच्या होत्या, असे जाहीर वाचन करण्यात आले. पुतण्या ‘फाऊल गेम’ खेळत आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले. 

ajit _1  H x W: 
 
 
खटाटोपातील व्यर्थतेची जाण
मात्र, हा सारा खटाटोप जारी ठेवणार्‍यांना, तो व्यर्थ आहे, याची पुरेपूर जाण होती. तांत्रिकतेत कुठेही त्रुटी राहणार नाही, याची पुतण्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती. पुढाकार त्याने घेतला होता त्यामुळे शक्तिप्रदर्शनाच्या वेळी सारेकाही ठरल्याप्रमाणेच होईल, याचीही त्यानं खातरजमा करून घेतली होती. दुसरीकडे, बहुमताचा निर्णय ‘थर्ड एम्पायर’वर सोपविला जाण्याची परिस्थिती उद्भवायला नको, याची काका काळजी घेत होते. हॉटेलमधील 161 आमदारांची ‘परेड’ अंतिम फायद्याची नाही, हेही जाणत्या काकांना पक्के ठावुक होते. त्यामुळे त्यांनी पुतण्याला समजविण्यासाठी पक्षातील बुजुर्गांना कामी लावले. पण, पुतण्याने भाजपाला शब्द दिला होता, विश्वास दिला होता. त्यावर तो अडिग होता. इकडे, पुतण्याच्या सर्व समर्थकांनी घरवापसी केली आहे, असे संबंधितांवर जाहीरपणे बिंबविणे सुरू होते. असे असेल, तर पुतण्याची मनधरणी कशाला, या प्रश्नाचे उत्तर बुजुर्गांजवळ नव्हते. पुतण्या आपल्या निर्णयावर ठाम होता. नाका-तोंडात पाणी शिरू लागल्याचे दिसताच पुतण्यावर कौटुंबिक अस्त्राचा भावनिक मारा करण्यात आला. कुटुंबाचे सारे आबाल-वृद्ध सदस्य पुतण्याचे भावनिक शोषण करण्यासाठी पुढे सरसावण्यात आले. आमचा राजकीय विश्लेषक मित्र नाम्या या संदर्भात म्हणाला, दिवाणखान्यात बसलेल्या कुटुंबीयांसाठी उकडपेंडीचा नाश्ता करणार्‍या वहिनीसुद्धा बैठकीत सराटा तसाच हाती ठेवून आल्या अन्‌ म्हणाल्या, ‘‘तुम्हाला सांगते, मामंजीशी पंगा घेऊ नका. त्यांनी भल्याभल्यांना लोळविले आहे (असे त्यांचे पित्ते म्हणतात)! तेव्हा, देवेन भावजींना सॉरी म्हणा अन्‌ मामंजीच्या लॉरीतच बसून राहा!’’
 
 
शेवटी पुतण्या हेलावला. समोर बसले होते सारे आप्तजन आणि लिप्तजन; तो गुरू, तो गुरुवंदन, तो कृप, तो पितामह रे! त्यांनी ‘धेनू वळाव्या’ ही गोष्ट क्लेशदायक असली, तरी त्यांच्याच लवाजम्यात परत जाण्याशिवाय पुतण्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. काकांवर चाणक्यीय मात करूनही पुतण्याला माघार घ्यावी लागली. पुतण्या तडक उठला अन्‌ ज्याला शब्द दिला होता, विश्वास दिला होता त्याला, बदललेल्या परिस्थितीची जाणीव देण्यासाठी आणि आपली व्यथा आणि असमर्थता व्यक्त करण्यासाठी, त्याच्या घरी पोहोचला. पहिला एपिसोड इथे संपला.
 
 
दुखावलेला पुतण्या
या सार्‍या प्रकाराने पुतण्या अत्यंत दुखावला गेला. पुतण्याच्या देहबोलीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना करता येते. तो करारी, आक्रमक आणि सडेतोड आहे. शब्दाचा पक्का आहे. गंभीर आणि रागीट आहे, असे त्यावरून जाणवते. दगाबाज निश्चितच नाही. या घटनेनंतर पुतण्याचा टी. व्ही.वरील संचार बरेच काही सांगून जातो. विधानसभेत शिरताना बहिणीने केलेल्या स्वागताने हा पुतण्या किंचितही सुखावला नसल्याचे स्पष्टपणे लक्षात आले. मुख्यमंत्र्यांच्या, शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्यातील त्याचा वावर, तो कुठेतरी धुमसत असल्याचे दर्शवीत होता. पुतण्याजींच्या मनात काही शिजत आहे नक्की!
 
 
दि. 28 रोजी मुख्यमंत्री आणि सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला. दि. 30 रोजी तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. उशिरा का होईना, राज्यात सरकार स्थापन झाले. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे महाआघाडीचे नेते, संधी मिळेल तेव्हा, आवर्जून सांगत आहेत. तसे सांगण्याची त्यांना गरज का भासावी? एखादा सायकॉलॉजिस्ट त्याचे उत्तर देऊ शकेल. या नेत्यांनी, सरकारच्या स्थैर्याबाबत धास्ती तर घेतली नाही ना? त्यांना एकमेकांची शंका तर नाही ना? कोण कोणाचे केव्हा पाय ओढतील, या भीतीने तर ते ग्रस्त नाहीत ना? वारंवार स्थैर्याची ग्वाही देण्याचे कारण काय?
 
 
‘स्टेबल’ आहे!
कारण आहे. आघाडीतील एका पक्षाच्या हातात डफले आहे. हा डफलजी (तबलजीच्या धर्तीवर डफलजी) मोठा कसबी आहे. तो केव्हा ठेका बदलेल सांगता येत नाही. दुसरा पक्ष डफलीच्या तालावर नाचणार, आळवत राहणार- डफलजीऽऽवाले, डफली बजा... मैं नाचूँ तू नचा...! तिसरा पक्ष, ज्या रिंगणात हा ‘शो’ सुरू आहे, त्या रिंगणाच्या काठावर बसून दोघांनाही डायरेक्शन देणार! कधी ‘कन्टिन्यू’ म्हणणार, तर कधी ‘कट’ म्हणणार! बदलत्या ठेक्यांवर नाचण्याची तालीम निष्ठेचे ठेके बदलण्याइतकी सहज आणि सोपी नाही. त्यामुळे ‘नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला,’ असे म्हणण्याची पाळी नाचणार्‍या पक्षावर येऊ शकते! या सार्‍या शक्यतांची कल्पना आघाडीला आहे. व्हेंटिलेटर केव्हाही काढले जाऊ शकते. याचीही जाणीव त्यातील घटकांना आहे. त्यामुळेच स्थैर्याचे तुणतुणे वाजविणे सुरू आहे. प्रकृती ‘स्टेबल’ आहे सांगणे सुरू आहे!
 
 
पुतण्याच केंद्रिंबदू
पुतण्याची भूमिका यापुढे फार महत्त्वाची आणि निर्णायक राहणार आहे. पुतण्या डिवचला गेला आहे. भावनिक शोषित आहे; आपल्या योजनेला भावनिक सुरुंग लावणार्‍यांना, त्याच पद्धतीने उत्तर द्यायचे, की शांत राहून ‘वेट अँड वॉच’चे धोरण स्वीकारायचे, याचे द्वंद्व तर त्याच्या मनात सुरू नाही? वचनपूर्ती करू न शकल्याचे शल्य त्याच्या मनात निश्चितच असणार, असे अनुमान त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वावरून काढता येते. त्याच्यावर दगाबाजीचा आरोप करणार्‍यांना बहुधा या घटनेचे योग्य आकलन झालेले नाही. तशी आपली संभावना होणार आणि होत आहे, हे लक्षात न येण्याइतका हा पुतण्या दूधखुळा नाही.
वेगवेगळ्या लांबीचे आरे असणार्‍या तीन चाकांचे हे सरकार खडखडाटाशिवाय चालू शकणार नाही, हे सांगण्यासाठी कोण्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही. त्यातल्या कोणत्या चाकाची वाट (धाव) आधी सटकणार याची वाट पाहायची, की त्याआधीच त्याला असलेली खिळी काढायची अन्‌ ती, त्या ‘चक्रधरा’च्या संमतीने काढायची की कसे, याचा विचार त्या त्या पक्षांतील असंतुष्टांमध्ये सुरू झाला असेल, तर ती गोष्ट अस्वाभाविक म्हणता येणार नाही.
 
 
उट किस करवट बैठेगा!
हातून झालेले नुकसान हेतुपूर्वक झालेले असो वा अपरिहार्यतेतून झालेले असो, विवेक शाबूत असलेल्या व्यक्तीला प्रायश्चित्त घेतल्याशिवाय चैन पडत नाही. नुकसानभरपाई करून दिल्याशिवाय तो समाधानाची झोप घेऊ शकत नाही. आपल्या प्रतिमेला आच बसणार नाही, याची दक्षता हीच त्याची प्राथमिकता असते, हेच त्याचे प्राधान्य असते, आपण आणि आपल्या ‘कॉज’चं ‘अराईट’ ‘रिपोर्टिंग’ व्हावं यासाठी तो सजग असतो, नुकसानाची भरपाई करून देण्यासाठी ‘चाकोरी’ सोडून देण्याचीही त्याची तयारी असते; प्रसंगी ‘काळोखा’चा आधार घ्यावा लागला, तरी तो त्याला निषिद्ध नसतो.
 
 
1 डिसेंबर रोजी विरोधी पक्षनेता या नात्याने विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठामपणे परत येण्याचा विश्वास दिला. म्हणाले, मी पुन्हा येईल असे म्हणालो होतो; येण्याचा टाईम-टेबल दिला नव्हता. समुद्राचा दाखला देऊन पुढे म्हणाले, भुजबळसाहेब! तुमच्या सकट येईन.
 
 
विधानसभेचे, फक्त सहा दिवसांचे नागपूर अधिवेशन दाढ्ढ्यात उभे आहे. अभेद्य समजल्या जाणार्‍या शिवसेनेच्या किल्ल्याला काही वर्षांपूर्वी नागपुरातच मोठे खिंडार पाडण्यात आले होते. म्हणतात की, इतिहासाच्या घटनांची पुनरावृत्ती होत राहते. फक्त खिंडार पाडणारे पात्र बदलतात, किल्ले बदलतात, पद्धती बदलतात; पुष्कळदा जर्जर किल्ले आपसूकच ढासळतात किंवा थोडासा धक्का देताच कोसळतात. हा धक्का किल्लेदाराचे विश्वासू साथीदारही देऊ शकतात!
 
 
तेव्हा दिल थाम के बैठो और देखो उट किस करवट बैठता है!
(संदर्भ टीप : शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकातला हॅम्लेट आपल्या मित्राला म्हणतो : ‘‘रिपोर्ट मी अँड माय कॉज अराईट.’’)