सत्तातुराणां न भयं न लज्जा!

    दिनांक :08-Dec-2019
|
विलास पंढरी
9860613872
 
इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र, कहाण्या, देशोदेशीच्या लोककथा असे अनेक वाङ्‌मय प्रकार मनोरंजक पद्धतीने उपदेश करतात, मानवी जीवनाला उपयुक्त तत्त्वे शिकवतात. मूळ संस्कृत भाषेत असलेल्या पंचतंत्र या इ. स. पाचव्या शतकातील पुस्तकाचे लेखक पंडित विष्णू शर्मा आहेत, असे मानले जाते. याचे मित्रभेद, मित्रसम्प्राप्ति, काकोलूकीयम्‌, लब्धप्रणाश आणि अपरीक्षितकारकम्‌ असे पाच भाग असून त्यांत पशु-पक्षांच्या रूपकांतून माणसाला व्यवहारचातुर्य शिकवले आहे. अशाच एका रूपक कथेला चपखल बसेल असे कथानक महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडते आहे. या कथेतील तत्त्व जर समजून घेतले असते, तर महाराष्ट्रात गेले माहिना दीड महिना जे राजकीय नाट्य रंगले ते कदाचित रंगले नसते.
 
 
आटपाट नगर होतं. हे वाचलं की उपदेश देणारी, काहीतरी तत्त्व सांगणारी कथा असणार, हे लगेचच आपल्या ध्यानात येतं. पण, आटपाट जंगल होतं, अशी कथा कधी वाचलीये? नाही ना? वाचू या तर.
 

waghoba _1  H x 
 
 
एक फार मोठं आटपाट जंगल होतं. त्याचं नाव दंडकारण्य. तिथे वेगवेगळ्या जाती-धर्माचे प्राणी गुण्या गोिंवदाने नांदत होते. जंगलात हत्ती, हरीण, कोल्हे, लांडगे, कुत्री, रानमांजरं असे विविध प्राणी होते. जंगलात एक सिंह आणि एक वाघही होता. शक्तिमान सिंह अर्थातच या जंगलाचा राजा होता. सध्या आपलं राज्य असंच एक आटपाट जंगल बनलंय खरं. कसं ते पाहू या.
 
 
ही जंगलनगरी विविधतेनं नटलेली होती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने ओसंडून वाहात होती. या नगरीतील लोकशाहीप्रेमी जंगलवासीय दर पाच वर्षांनी ठरवून राजा बदलत असत. सर्व प्राणी त्या राजाची बहुमताने निवड करायचे. या राजाला थोडेफार विरोधक मात्र नेहमीच असायचे. कारण सगळ्यांनी एकमताने एखादा राजा निवडलाय, असं कधी झालं नव्हतं. लोकशाही होती ना!
 
 
पण, ज्याला त्यातल्या त्यात कमी विरोध तो राजा बनवला जायचा. तसा कायदाच होता दंडकारण्य नगरीचा. पूर्ण राज्यावर सिंहाची सत्ता होती. वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वाघांना वाटून दिले होते. तसाच जंगलातील एक अति समृद्ध भाग एका वाघाच्या ताब्यात देण्यात आला होता. पूर्ण राज्यात सिंह राजाचा खूप रुबाब होता. सत्तासुंदरी ही नावाप्रमाणेच अति सुंदर अशी महाराणी होती. राजा बदलला की ती त्याची होत असे. असाच राजा एकदा आजारी पडल्याने थोडासा अशक्त झाला. गंमत म्हणजे ज्यांना आपलं म्हणायचं, ते राजाचे आप्तस्वकीय राजाच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी बिघडेल कशी आणि कधी, याची वाट पाहात होते. राज्यातील समृद्ध भाग ताब्यात असलेल्या वाघोबांनाही सत्तासुंदरी आपल्याला मिळावी, अशी सुप्त असलेली इच्छा अचानक जागृत झाली. तशात वाघोबांचे मित्र आणि राजाच्या विरोधकांनी वाघोबांना भडकावले व तुम्हीही सत्तासुंदरी महाराणी मिळवू शकता, राजा होऊ शकता, असे म्हणत भरीस घातले. सत्तासुंदरीच्या वेडाने वाघोबा वेडे झाले. त्यांना शिकार सुचेना, की भूक लागेना. आपल्या रुबाबाचा त्यांना पूर्ण विसर पडला.
 
आपल्या वडलांवरची श्रद्धा आणि त्यांचा मार्ग यांना तिलांजली कशी देणार, हा प्रश्न सतावत होता. पण, म्हणतात ना- बुभुशिता: िंकम न करोती पापम्‌। झालंही तसंच. वाघोबांना सत्तासुंदरीच्या प्रेमाची प्रचंड भूक लागली होती. त्यांनी खास विश्वास असलेल्या आपल्या सहकार्‍याशी म्हणजे लांडगोबाशी सल्लामसलत केली. तेव्हा वाघोबांना कळले, की ते सत्तासुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. आता त्या महाराणीशी विवाह केल्याशिवाय आपल्या जीवनात सुखसमाधान नाही, असेच त्यांना वाटू लागले. लांडगोबांनी आपले एक जुने वयस्कर सहकारी, जे असे प्रश्न सोडवण्यात माहीर होते अशा कोल्होबांची मदत घ्यायचे ठरवले. कोल्होबांनी सत्तासुंदरीच्या वडिलांशी संपर्क साधून दिला.
 
 
महाराणीच्या वडिलांनी वाघोबांना आपल्या घरी मुलगी पाहण्यासाठी म्हणून येण्याची विनंती केली. पण वाघोबांना, आपण आपलं निवासस्थान सोडून कधीही कुणाच्या भेटीला जात नसल्याचा आपला वडिलोपार्जित रिवाज आठवला आणि त्यांनी कन्येला घेऊन येण्यास फर्मावले. राजकन्येचे वडील धूर्त होते. आम्हाला आपली आदरयुक्त भीती वाटत असल्याने आम्ही आपल्या निवासस्थानी येऊ शकत नसल्याचे कळवले. वाघोबांना काय करावे सुचेना. धूर्त कोल्होबांना त्यांनी सल्ला विचारला. कोल्होबा म्हणाले, महाराणींचे वडील म्हणतात ते खरे आहे. आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्यालाच त्यांच्याकडे जावे लागेल. सत्तासुंदरीच्या हव्यासापोटी लाचार झालेले वाघोबा महाराणीच्या महालात दाखल झाले व त्यांनी थेट राजकन्येला मागणी घातली. वडील सावध होते. त्यांनी वाघोबांची मागणी मान्य करीत काही अटींची पूर्तता करावी लागेल, असे नम्रपणे सुचवले. तुमच्या पंजाची नखं फार तीक्ष्ण आहेत. राजकन्येला त्यांचा त्रास होईल. तेवढी काढून टाका, वडील म्हणाले. वाघोबांना ते पटलं.
 
 
वाघोबा नदीकाठी येऊन एका खडकावर आपले पंजे आपटत नखे उपटू लागले. सिंहाने ते पाहिले व समजावण्याचा प्रयत्न केला. पण, सत्ताप्रेमात वेडे झालेल्या वाघोबांना सिंह त्याच्या स्वार्थासाठीच सांगत असणार, असे लक्षात घेऊन सिंहाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या नजरेसमोर फक्त त्या रूपमती महाराणीचे सौंदर्य दिसत होते.
 
 
वाघोबा महाराणीच्या वडिलांना भेटायला गेले. महाराणीचे वडील म्हणाले, जावईबापू, आणखी एक अट राहून गेली हो. तुमच्या प्रणयाराधनात तिची अडचण होऊ शकेल म्हणून सांगतो. तुमचे धारदार आणि तीष्ण दात ही मोठीच अडचण आहे. तेवढे रातोरात उपटून घ्या. हीही अट मान्य करून वाघ जंगलात परतला. रात्रभर दगड-धोंडे जोरजोरात चावून चावून आपले दात त्याने पाडून घेतले. सकाळी सकाळी वाघोबा महाराणीच्या घरी हजर झाले. महाराणीच्या वडिलांनी वाघोबांचे मनापासून स्वागत केले व बोलले, वनराज, दोनच दिवसांनंतरचा मुहूर्त काढला आहे. एक शेवटची अट राहून गेली आहे. तुमच्या जबरदस्त डरकाळीची राजकन्येसह आम्हा सर्वांनाच फार भीती वाटते. तेव्हा हा शेंदूर खाल्लात की तुमचा आवाज सुरेल होईल. बाकी आम्ही मंडप, वाजंत्री, घोडा अशी सगळी जय्यत तयारी केली आहे. तुमची वरात येण्याचीच प्रतीक्षा राहील.
 
 
गुडघ्याला बािंशग बांधून बसलेल्या वाघाने सासरेबुवांनी दिलेला शेंदूर, मागचापुढचा विचार न करता लगेच समोरच खाऊन, दोन दिवसांनी परत येत असल्याचे सांगून सर्वांचा निरोप घेतला.
 
 
दोन दिवसांनी सकाळी सकाळी सुजलेले दात नसलेले तोंड, रक्ताने माखलेले पंजे, गुरगुर बंद अशा अवस्थेतला दुबळा वाघ, मजा बघत असलेल्या वर्‍हाड्यांसह वाजतगाजत निघाला. त्याचं ते गबाळं रूप बघून कुत्रीदेखील भुंकत त्याच्या अंगावर धावून येत होती. त्या दयनीय अवस्थेत लग्नघरी आलेल्या या प्रेमवीराला पाहून राजकन्येसह सगळे कुत्सितपणे हसत होते. राजकन्येच्या वडिलांनी नवरदेवाचे तोंडभरून कौतुक करीत, खास बनवलेल्या स्टेजवर स्थानापन्न केले व स्वतःसह सगळे बाजूला झाले. इशारा करताच तयारीत असलेल्या सेवकांनी दुबळ्या झालेल्या नवरदेवाला पिंजर्‍यात ढकलले. प्रेमाच्या धुंदीत असलेल्या आणि पिंजर्‍यात अडकलेल्या त्या दुबळ्या, जखमी व शक्तिहीन हतबल वाघाला पाहून राजकन्येसह सगळेच हसत होते. वाघाची धुंदी उतरली. आपण पिंजर्‍यात अडकलो असल्याचे भान त्याला आले व तो संतापून ओरडला; तुम्ही सगळे दगाबाज, विश्वासघातकी आहात. तुम्ही मला फसवून दुबळा बनवले, बंदिस्त केले. एकालाही सोडणार नाही. पण, आता त्या आवाजात दम नव्हता. वाघोबांचा आवाज गेल्याने गोंधळात त्यांची गुरुगुर कुणालाही ऐकू जात नव्हती. पण, त्या वेळी सिंहाने वाघोबांना दिलेले उत्तर खुप मोलाचे होते.
 
 
तू तुझ्या बलस्थानाशी, तुझ्या वाघ असण्याशीच दगाबाजी केलीस. इतरांनी ढीग तुला अटी घातल्या, पण त्या मान्य करताना आपण आपलं वाघ असणंच गमावतोय, याचे भान तुला राहिले नाही. सत्तासुंदरीच्या प्रेमात तू आपलं वाघ असणंच पणाला लावलंस. सत्तासुंदरीच्या जुगारात सर्वस्व गमावून बसलास. आता कुणाला ऐकू न येणार्‍या नुसत्या मोठ्या गर्जना करून व डरकाळ्या फोडून काय उपयोग आहे? तुझी डरकाळी ही केवळ गुरगुरणं झालंय. तिथे तू पिंजर्‍यातच सुखरूप आहेस. बाहेर पडलास तर कोल्हे-कुत्रेही फाडून तुझीच शिकार करतील. कुणावर विश्वास ठेवायचा, याचंही भान तुला उरलं नाही. बिचार्‍या वाघाला जुन्या मित्राचे सावध करणारे शब्द कानात शिसं ओतल्यासरखे डसत होते. पण, वेळ निघून गेलेली होती. आता वाट पाहण्याशिवाय नामधारी वाघोबांच्या हातात काहीही नव्हतं...
 
 
••