कर्करोगावर १०० टक्के इलाज शक्य - इस्राईलच्या कंपनीने केला दावा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
कर्करोग असे नुसते म्हटले तरीही सामान्यांना धडकी भरते. मागील काही वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगांमध्येही वाढ झाली आहे. एकदा का हा आजार झाला की संपूर्ण कुटुंब बेजार होते. आपला व्यक्ती या आजारातून वाचावा यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. मग आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ओढाताण होत राहते. पण तरीही आपला माणूस वाचेल याची शाश्वती नसतेच. कारण या दुर्धर आजारावर अद्याप पूर्ण बरे करणारे उपचार जगात कुठेही नव्हते. मात्र एक दिलासादायक घटना नुकतीच घडली आहे. कर्करोग संपूर्णपणे बरा होईल असे एक औषध निर्माण केल्याचा दावा एका कंपनीने केला आहे.
 
 

 
 
या आजाराबाबत जगभरात संशोधन सुरु असून दिवसागणिक या शोधांमध्ये भर पडत आहे. असाच एक शोध इस्राईलच्या काही संशोधकांनी लावला असून त्यामध्ये एका वर्षात कर्करोग बरा होईल असे औषध त्यांनी तयार केले आहे. अॅक्सिलरेटेड इवॉल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड (AEBi) कंपनीने हा दावा केला आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आपण पूर्णपणे दूर करू शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे.
 
 
बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि पेप्टाइड्सच्या मदतीने कॅन्सरला नष्ट करणारं औषध तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेप्टाइट्सला अमीनो अ‍ॅसिडचं रूप मानलं जातं. या शोधामार्फत तयार करण्यात आलेले औषधाची अद्याप मनुष्यावर चाचणी करण्यात आलेली नाही. शोधादरम्यान या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यावरून हा दावा करण्यात येत आहे. या कंपनीने केलेल्या दाव्यावर संशोधकांनी मात्र मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.