जन्मजन्मांतराची साधना म्हणजे तीजनबाई!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
जन्मजन्मांतराची साधना म्हणजे तीजनबाई! आजपासून ३५ वर्षांपूर्वी पंडवानी गायिका डॉ. तीजनबाई यांनी भिलाई स्टील प्लॅण्टमध्ये नोकरी मिळविण्यासाठी रोजगार कार्यालयात आपले नाव नोंदविले होते. तेव्हा तिथल्या अधिकार्‍यांनी तिची थट्‌टा उडविली होती. ‘‘आंगठाछाप आहेस. भिलाई स्टीलमध्ये काय करशील तीजन?’’ हे त्या अधिकार्‍याचे शब्द होते. परंतु, त्या वेळी कदाचित कुणाला अंदाज नसेल की, आंगठाछाप तीजनबाईचा प्रवास ‘पद्मश्री’पासून सुरू होऊन या वर्षीच्या गणतंत्र दिनी ‘पद्मविभूषण’पर्यंत जाऊन पोहोचेल!
 
भारत सरकारने, छत्तीसगडच्या पंडवानी गायिकेला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करून मातीचे ऋण फेडले आहे. आज याच आंगठाछाप तीजनबाईच्या नावावर डॉक्टरेटच्या मानद पदवीपासून देश-विदेशातील अनेक सन्मान जमा झाले आहेत. केवळ छत्तीसगडच नाही, तर जगात ती आज भारताचा गौरव आहे. तंत्रज्ञानाच्या जगात दबदबा असलेले जपानवाले तर डॉ. तीजनबाईंना म्हणतात की, ‘‘दाई, तुम्ही इथेच राहा!’’ अशी आहे आमची तीजनबाई!
 
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडचा एक आंगठाछाप राजकीय नेता मंत्री झाल्यामुळे कल्लोळ झाला होता. एका व्हॉटस्‌ॲप ग्रुपमध्ये तर कमालच झाली. शब्दांची मर्यादा ओलांडत नैतिकतादेखील ठेवली नाही. अशा सर्वांना माझा फक्त एकच प्रश्न आहे, कुणाची देवदत्त प्रतिभा अक्षरज्ञानासाठी लाचार असते का? वाचन, लिखाण आणि पदवीच्या आधारावर कुणाची योग्यता-अयोग्यता निश्चित करणे, कदाचित आमची-तुमची दुर्बलता असू शकते. आम्हा सर्वांना हे समजायला हवे की, पदवी नाही म्हणून ज्ञान अर्थहीन, निर्धन होत नाही. परिश्रम, सातत्य, अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान, पदव्यांपेक्षा फार वरचे आहे. म्हणून माझ्या भावांनो-भगिनींनो-मित्रांनो आणि आदरणीयांनो! गावंढळ, अशिक्षित आणि आंगठाछाप या शब्दांनी कुणाची टर उडविण्याआधी एकदा डॉ. तीजनबाईंचे अवश्य स्मरण करा. आपले तोंड आपोआपच बंद होईल!
 
 
देशाचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यावरदेखील तीजनबाई इतकी साधी-सरळ आणि विनम्र आहे की, त्याचा तुम्ही अंदाजच लावू शकत नाही. ती म्हणते- ‘‘मला सन्मान मिळाला म्हणून तुम्हा लोकांना इतका आनंद होत आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. माझ्यासारख्या तीजनची काय बिशाद... ती तर कला आहे. पंडवानीसारख्या कलेला हा सन्मान मिळत आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, माझ्यानंतरदेखील पंडवानी कला अशाच उंचीला स्पर्श करीत राहावी.’’
जेव्हा त्यांनी म्हटले की, तीजनची काय बिशाद, ती तर कला आहे... खरं सांगू, मी तर आतून शहारून उठली. शरीराला एक वेगळाच कंप सुटला. एखादी व्यक्ती इतकी सरळ, साधी कशी काय असू शकते? एवढे नाव, सन्मान आणि प्रसिद्धी मिळाल्यावरही इतका साधेपणा... जणूकाही परमेश्वराचे साक्षात दर्शनच घडवितो.
 
आम्ही जेव्हा गाण्याचे रिॲलिटी कार्यक्रम बघतो, तेव्हा काही काही गायकांचा आवाज ऐकून माझे वडील म्हणतात की, अनेक जन्मांची साधना, परिश्रम असले की मग परमेश्वर त्याला कलेची देणगी देतो. म्हणून ऐकणारा, बघणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. आज हाच अनुभव, पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यावर या ६२ वर्षीय लोकगायिकेची मुलाखत बघितल्यावर घेतला. माहीत नाही किती जन्मांच्या साधनेनंतर, परिश्रमांनंतर तिला ही प्रसिद्धी मिळाली असेल! लोक तर एखादी लहानशी बढती मिळाली तरी, हावभावच नाही तर सर्वकाही बदलून टाकतात. परंतु, ही महिला तर आजदेखील छत्तीसगडी लुगरा (साडी) नेसून सात समुद्र फिरून येते. गंमत म्हणजे, ती छत्तीसगडीच भाषा बोलते. हिंदीदेखील तिला नीट येत नाही. इंग्रजीची तर बातच नको. परंतु, सारे इंग्रज तिला ऐकण्यास आतुर असतात.
अशी असते कला आणि असे असतात कलाकार!