ढसाळांची भाषा स्त्रीसाठी मार्दवी होते तेव्हा...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
जगण्याच्या आदिम अस्तित्वातील पहिला शोषित कोण, असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर त्याचं एकच उत्तर माझ्याकडे असतं... जगण्याच्या अस्तित्वाला लाभलेला पहिला शोषित प्राणी म्हणजे स्त्री! जीवनाला जेव्हा आचार, विचार आणि उच्चारही नव्हता तेव्हाही स्त्री ही शोषितच होती, हे विदारक सत्य सर्वांना मान्य करावेच लागते. शोषित- मग ते कोणतेही असोत- त्यांच्यासाठी मराठीतील अग्रगण्य असे विद्रोही किंवा परिवर्तनवादी कवी असेही म्हणता येईल असे कविवर्य नामदेव ढसाळ यांची लेखणी नेहमीच तलवार झालेली मराठी साहित्याने पाहिलेली आहे. म्हणूनच नामदेव ढसाळ यांच्या कवितेमधील स्त्रीचे रूप शोधण्याचे धाडस करावे, म्हणून नामदेव ढसाळ यांचे मिळतील ते काव्यसंग्रह वाचून काढले. त्यांच्या कवितेमधून स्त्री-जाणिवांचा शोध घेताना नामदेव ढसाळ यांची एक वेगळीच कविता मला भेटली. साक्षात आपल्या आईचे वर्णन करताना नामदेव ढसाळ जे लिहितात ते जेवढे सुन्न करणारे असते, िंचतनीय आणि विश्वव्यापी सत्य असते, याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहात नाही. ‘आई गेली याचं दुःख नाही!’ या ओळीने सुरू होणार्‍या कवितेमधून ‘पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेर्‍याला थिगळ लावणार्‍या’ आईचे मोठेपण सांगण्यासाठी कवी म्हणतो,
बापाअगोदर मरून तिने असं अहेवपण िंजकलं
बाप अजूनही
खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आई अगोदर बाप मेला असता
तरी मला त्याचं काहीच वाटलं नसतं...
 
बापाच्या अस्तित्वापेक्षा आईचं अस्तित्व नसणे माणसाला जास्त बोचतं, यावरून त्याच्या जीवनातील आईचं महत्त्व तर अधोरेखित होतं, शिवाय स्त्री ही इतकी समर्थ ठरते की, तिचे केवळ अस्तित्वही तिच्या पुढील पिढीसाठी बाप नावाच्या पुरुषापेक्षा अधिक प्रेरक व मार्गदर्शक ठरते, याची जाणीव कवी करून देतात. आई या जातीचे जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडण्यासाठी कवीने जी स्त्रीप्रतिमा वापरली आहे ती जगद्गुरू तुकोबा यांच्या आईची... संत तुकारामाची आई तुकारामाच्या नावानं बोटं मोडते-
अंगावर चिमूटभर मास असावं लागतं गरिबाच्या
मग लागावं अभंग बिभंगाच्या नादा
नुसतं अभंग/टाळ कुटून काय साधले त्याला?
असा प्रश्न विचारून संसारओझे समर्थपणे पेलण्यापासून दूर पळणार्‍या तुकारामाची विश्विंचता समजून घेण्याची गरज तिला वाटत नाही, ती शेवटी म्हणते,
वय वाढतं तशा चामड्याला सुरकुत्या पडतात माह्या राजा, म्हणलं आता तुक्याची गोठ
टाकावी कानामागे आणि सांभाळावीत आपली नातवंडं/ पतवंडं दररोज तुक्याच्या नावानं टाळ तरी कवर कुटायचं
(संत फॉकलँड रोड)
पोटच्या मुलाचे जगणे-मरणे दृष्टिआड करून त्या मुलाचा संसाररथ पुढे ओढण्याच्या खंबीर इच्छाशक्तीला व्यक्त करण्याचे सामर्थ्यशाली शब्द नामदेव ढसाळ यांनी मराठी कवितेला बहाल केले, असेच त्यांची कविता वाचताना जाणवत राहते. स्त्रीला संपूर्ण समाज जननयंत्र म्हणून पाहत असतो, हे धाडस करणारे ढसाळ स्वत: मात्र स्त्रीच्या अस्तित्वाला वेगवेगळ्या इतिहासातील कर्तृत्ववान महिलांना समोर ठेवून सलाम देतात. माता रमाई आंबेडकर या बाबासाहेबांच्या अर्धांगिनीच्या नामशीर्षकाच्या कवितेमधून रमाईशी संवाद साधणारे ढसाळ, रमाबाईचे सोशीक आणि बाबासाहेबांना खंबीर साथ देणार्‍या सामर्थ्यशाली स्त्रीचे वर्णन एकत्रितपणे करतात. व्यभिचाराविषयी या कवितेमधून, ‘किती नाजूक वळणावर येऊन पोहोचलो आपण, की पाहता पाहता प्रेमाचं व्यभिचारात रूपांतर झालं.’ या एकाच ओळीतून स्त्रीला उपभोगाची वस्तू मानणार्‍या तमाम पुरुषप्रधान संस्कृतीचे वास्तवरूप दाखवण्याचे कार्य कवीने केले आहे. त्याच वेळी,
मला कुशीत घेणार हे काय आहे?
 
झाड फांद्यांनी भरगच्च असलेली बाई!
असे लिहिताना स्त्रीमध्ये झाडाची विशालता शोधण्याची ढसाळांची वृत्ती स्त्रीचे अस्तित्व अधिक उदात्त करणारी आहे, असे प्रकर्षाने जाणवते.
राहीबाई, तुमच्या देहाची कमाई खाऊन
बघ कसं ऊस पोसला आहे
तुझ्या भावाला आता तुझी आठवण होत नाही
तो शोधत िंहडतो ऊसतोड्या मजुरांना ऊसतोडणीसाठी... भाऊ बहिणीला विसरतो, इतकेच नव्हे, तिच्याच जिवावर पोसला जाऊन आता आयाबहिणीशी बेईमानी करून नव्याने गिर्‍हाईक शोधत फिरतो. हे विदारक सत्य देवदासीवरील कवितेमधून मांडताना कवी अस्वस्थपणे प्रकट करतो.
आता गावी गेलोच कधी तर
िंचचेची झाडे दिसत नाही रायरंद आणि रायदंडाचा उंटही वाटत, बहीण अजून मेलेलीच नाही
असे लिहिणारे ढसाळ स्वतः जगण्याशी प्रामाणिक राहून; खुपते त्यावर हल्ला करणारे होते, याची जाणीव होत राहते. ‘माझ्या जन्मगावच्या बायका’ या कवितेमधून एकमेकींना आपली कहाणी सांगणार्‍या बायका, डोक्यातील ऊ किंवा लिखू मारणार्‍या, प्रसंगी चावटपणा एकमेकींना सांगणार्‍या, बाई जातीचे दुःख मांडणार्‍या बायका नामदेव ढसाळांनी उभ्या केल्या आहेत. इंदिरा गांधी या वादळी व्यक्तिमत्त्वावर ‘प्रियदर्शनी’ या नावाने लिहिलेल्या कवितेला जी मान्यता मिळाली ती खरोखरच लाजवाब... त्यातही तिला उल्लेखून स्त्री जातीचे त्यातही राज्यकर्त्या स्त्रीविरोधी कारवाया सांगताना रजिया सुलतान ही चपखल प्रतिमा नामदेव ढसाळांनी वापरली आहे. ‘तुही इयत्ता कंची?’ या कवितेतही ‘इटाळात बाईला ...... का?’ इतपत भाषा वापरून पुरुषी वर्चस्व दाखवण्याचे धाडस ढसाळांनी केले आहे. एकंदरच स्वतःच्या शब्दसामर्थ्याने शोषित स्त्रीचे दुःख, वेदना आणि व्यथा मांडण्याचे कार्य नामदेव ढसाळ यांनी केले आहे. ते करत असताना त्यांनी स्वतःची प्रामाणिकता जपली आहे. ‘बायको, या सोंगा ढोंगाच्या दुनियेत मी माझ्या जवळ असो नसो तू माझ्या जवळ आहेस आणि मी एकुलता तुझा.’ या निर्मळ स्त्री भावनेसह नेहमीच आक्रस्ताळेपणासह स्त्री दुःखास आपले म्हणणार्‍या नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील स्त्री-जाणिवांना मानाचा मुजरा!