हळदी-कुंकवाचे दिवस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
...तसे आपल्या संस्कृतीत आणि संस्कारांतही हळद- कुंकू यांची जोडी अत्यंत महत्त्वाची आहे. आता हळदी- कुंकवाचे असे खास राखीव दिवस नसतात. म्हणजे संक्रांत, गौरीपूजन आणि चैत्रातले हळदी-कुंकवाचे कार्यक्रम असतात अगदी राखीव. म्हणजे ज्याला आपण परीटघडीचे म्हणू शकतो, मात्र इतरही दिवसांत ते सुरूच असते. आता बायका एकमेकींच्या घरी खास अशा बसायला जात नाही. आधीच्या काळी दोन बायका भेटल्या की त्या एकमेकींना, ‘‘इतक्यात आल्याच नाही तुम्ही बसायला आमच्या घरी... त्यामुळे गप्पाच नाही झाल्या.’’ असे म्हणत रस्त्यातच किमान दोन तास तरी गप्पा मारत उभ्या रहायच्या अन्‌ अशा वेळी त्यांचे पतिदेव सोबत असतील तर मग ते बिचारे भाजीची िंकवा वाणसामानाची पिशवी तोलत बाजूला उभे राहायचे. निघताना पुन्हा त्या बायकांची खंत असायचीच की, नेमके काही बोलताच आले नाही... सोबतच्या पतिदेवांबद्दल फारच सहानुभूती दाखवायची असेल तर मग,
‘‘ह्यांना उगाच उभे राहावे लागले आपल्यासाठी...’’ असे म्हटले जायचे.
 विषय तो नाही, पण दुपारच्या वेळी बायका एकमेकींकडे जायच्या. चहा व्हायचा. सोबत चविष्ट अशा चुगल्या िंकवा तक्रारीही असायच्या अन्‌ निघताना, ‘‘येते बाई!’’ असे येणारीने म्हटले की, ‘‘थांबा ना... कुंकू लावते ना.’’ असे म्हणत आतून करंडा आणला जायचा अन्‌ मग हळद-कुंकू लावताना पुन्हा किमान अर्धा तास तरी दारातच गप्पा रंगायच्या. त्या गप्पांना खास असा हळदीचा अन्‌ कुंकवाचा रंग असायचा. कधीमधी त्या गप्पा मग या दोघांच्या मिसळीने मत्त केशरी व्हायच्या. एकुणात काय की, सारेच दिवस कसे हळदी- कुंकवाचेच असायचे. आताही एकदम दोन बायकांतले हे हळद- कुंकवाचे रंग संपलेले नाहीत. आता बाईच्या जगण्याची शैली बदलली आहे, हे खरंच आहे, मात्र तरीही हळद- कुंकू काही पुसलं गेलेलं नाही. थोडं पुसट झालंय, हे खरं आहे. आधीच्या काळी त्या निव्वळ गृहिणी असायच्या. त्यात टीव्ही नव्हता, व्हॉटस्‌अॅप वगैरे नव्हते. त्यामुळे सकाळची कामं झाली अन्‌ दुपारची अंमळ वामकुक्षी झाली की मग वेळ असायचा. त्यामुळे सांजेला चार नंतर दिवेलागण होतपर्यंत एकमेकींच्या घरी जाऊन गप्पा व्हायच्या. उंबर्‍याशी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने थांबले असताना मग निरोपाच्या गप्पा किमान तासभर तरी असायच्या. त्यातही, ‘‘हे यायची वेळ झाली, पोरंही आली असतील... संध्याकाळचा स्वयंपाक राहूनच गेला ना.’’ असे पहिली म्हणायची तेव्हा, ‘‘का? जाऊबाई आहेत ना...’’ असा खास फुलटॉस दुसरी टाकायची अन्‌ त्यावर मग किमान अर्धा तास तरी जाऊपुराण रंगायचे... ‘‘ती कसली कामे करते? तिचा नवराही तिच्या बाजूने असतो ना. आमचे हे म्हणजे एकदम हरिश्चंद्रच...’’ असं म्हणत बाई हळूच डोळ्याला पदर लावायची अन्‌ दोन भुवयांच्या मध्ये कोरली गेलेली हळदीचे रेषा अलगद हमखास आलेल्या अश्रूंना पिवळे करून जायची.
हे हळदी-कुंकू भारतीय बायकांच्या सोबत असे नेहमीच राहात आलेले आहे. मग त्यांच्या वाट्याला वैधव्य आले की, त्यातली रंगत निघून जायची. म्हणून बहिणाबाई म्हणतात-
माह्या करमाची रेषा माह्या कुंकवाच्या खाली
कुकू पुसूनशा गेलं, रेषा उघळी पडली...
 
एकदम हे हळदी-कुंकू आयुष्यातून गेलं की बायका कशा संसारातून उसवून गेल्यागत व्हायच्या. त्यांच्या आयुष्यातले सारेच रंग कसे निसटून जायचे. हे दोन्ही रंग उष्ण प्रकारातले. त्यामुळे ते गेले की मग आयुष्यातला ओजच हरवून गेल्यागत अजूनही होते. रेषा उघडीच पडते. कर्मच राहात नाही. आयुष्याचं व्याकरणच बिघडून जाते. मग त्या बायकांना मंगलकार्यापासूनही दूर राहावं लागतं. अगदी मधुमेह झालेल्याला पंगतीत मांडलेल्या गोड पदार्थांशी नातं तोडावं लागतं, मनात असूनही दूरच राहावं लागतं तसं वैधव्य आलेलीला हळदी-कुंकवाशी नातं तोडावंच लागतं. त्यात मग संक्रांत, चैत्र आणि गौरीपूजनासारख्या दिवसांत तर त्यांना जरा जास्तच जाणवत राहतं आपलं गमावलेलं अहेवपण.
इंग्रजी नववर्ष कितीही नाकारलं तरीही नव्या वर्षाची सुरुवात असते. तसं चैत्रात आपलं नववर्ष सुरू होतं अन्‌ तेही पन्हं, आंब्याची डाळ अन्‌ हळदी-कुंकवानंच सुरू होतं. तसंच हेही... तसे हे सारेच सण आपल्या कृषिसंस्कृतीशी बांधलेले. जानेवारीत तशी खरिपाची सुगी ओसरलेली नसते, त्याची श्रीमंती कायमच असते अन्‌ रबीच्या धनाचा सुगंध पसरू लागलेला असतो अन्‌ मग दोन्ही हंगामांच्या नव्हाळीच्या पदार्थांच्या स्वागताला हळदी-कुंकू घेऊन बायका उभ्या असतात. अगदी नवे कपडे, दागिनेही येतात अन्‌ ते वापरात येण्याआधी त्यांना हळद- कुंकवाचं बोट लावण्याची आपल्याकडे पद्धत आहेच. त्यात जानेवारी महिन्यात पहिला सण येतो तो म्हणजे मकरसंक्रांत... महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण भोगी, संक्रात आणि क्रिकांत अशा तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो. यंदा लीप वर्ष नसूनही मकरसंक्रांत 15 जानेवारी या दिवशी आली आहे. आता हे दिवस हळद-कुंकवाच्या खास हक्काचे. सवाष्ण महिला मकरसंक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू हा कार्यक्रम करतात. आता सवाष्ण असणे म्हणजे हळद- कुंकवावर हक्क असणे. त्यांच्याशी स्त्रीचे नाते घट्‌ट असणे... मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत खास दिवशी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचा रतीबच सुरू असतो. आता मग इतर रंगांनाही त्यात मिसळून घेतलं जातं. तसं नवरात्रीचे दिवसही हळद-कुंकवाचेच असतात. देवीमायची अन्‌ एकमेकींची ओटी भरताना त्यात हळद-कुंकवाच्या पुड्या असतातच. नवरात्रीच्या दिवसांत मग नऊ रंगांच्या साड्या/वस्त्र घातली जातात. प्रत्येक दिवसाचे रंग ठरलेले असतात. वारीला जातात बायका तेव्हाही रंगांची सोबत असतेच. आता मकरसंक्रांतच्या दिवशी काळे कपडे घालले जातात.
मकरसंक्रांत हा उत्तरायणामध्ये येणारा एक सण आहे. या काळात वातावरणातील लहरी साधना करणार्‍यांसाठी फलदायी असतात, असा समज आहे. त्यामुळे अशा दिवसात महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात. एकमेकींना हळदी-कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असते. वाण म्हणजेच भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो. म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी-कुंकू लावतात, तिळगूळ, फुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात. सोबत एखादी लहानशी भेटवस्तू देऊन आनंद वृिंद्धगत करतात.
 
मकरसंक्रांतीमधील हळदी-कुंकू हे रथसप्तमीपर्यंत चालू असते. त्यामुळे यंदा 15 जानेवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या सोयीने हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले जाऊ शकतात.
हळदी-कुंकवाप्रमाणेच, नवदाम्पत्यासाठी मकरसंक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी जावयाला आणि सुनेला खास भेट दिली जाते, लहान मुलांचे बोर न्हाणदेखील याच दिवसांमध्ये केले जाते.
मराठी महिन्यांनुसार पौष महिन्यात येणारा; पण इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत! या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. मकरसंक्रांतीला स्त्रियांमध्ये हळदी-कुंकवाची उत्सुकता असते. आपापसातील कलह, हेवेदावे विसरून तिळगूळ देऊन नात्यातील गोडवा वाढवला जातो. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन केले जाते.
 
‘सुगड’ हा शब्द ‘सुघट’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘सुघट’ म्हणजे सुघटित असा घडा. या घड्यात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवायचं असतं. त्याची पूजा करायची असते आणि नमस्कार करून दरवर्षी शेतं असंच फुलू दे, धनधान्यांनी बहरून जाऊ दे, अशी प्रार्थना करायची असते.
पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडायची असल्याने साधारणपणे त्या आकाराची रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद-कुंकू घालून पाट किंवा चौरंग मांडा.
 
हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगूळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य दोन्ही सुगडांमध्ये घाला. सुगडांवर हळदी-कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा. पाट/चौरंगावर लाल वस्त्र घाला. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर भरलेलं सुगडं मांडा. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगडं. त्यानंतर दिवा लावा. सुगडावर हळद-कुंकू वाहा. अक्षता, फुलं वाहून नमस्कार करा. तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा. अगरबत्ती लावून नमस्कार करा.
काही ठिकाणी पाच सुगडांची पूजा करण्याची पद्धत आहे. पाच सुगडांची पूजादेखील अशीच केली जाते. पूजा झाल्यानंतर तीन सुगडं सवाष्णींना दिली जातात, तर एक स्वत:साठी ठेवले जाते आणि एक तुळशीला वाहिले जाते. आपल्याप्रमाणे आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचे, आप्तेष्टांचेही घर धनधान्यांनी समृद्ध व्हावे, अशी सुगडं देण्यामागे कल्पना आहे.
 
या सार्‍यांत आपली माती, शेती आणि गावगाडा, निसर्ग, पर्यावरणच असतं. त्या दिवसांत आलेली पिकं अन्‌ त्यांचे पदार्थ यांचीच रेलचेल असते. तिळाच्या पोळ्या, गूळ, साखर हे सारेच या दिवसांतले. अगदी ऊस, बोर, गहू, मटर, हरबरा... असे या दिवसांत आलेले कृषी उत्पादन त्यात असते. अगदी बायकांच्या प्रत्येकच सणांत बेलापासून अनेक वृक्षांचा अन्‌ निसर्गातील घटकांचा अंतर्भाव असतो. त्यातून जैवविविधता राखली जाते. आंब्याच्या पानांपासून तर अगदी बोरीच्या झाडाचेही महत्त्व आहे. आवळी पौर्णिमा ते कांदेनवमीपर्यंत सारेच निसर्ग अन्‌ पर्यावरणाशी नाते जोडून ठेवणारेच आहे. अगदी कोकिळा व्रत असते. गोपूजन असते... म्हणजे पशू, पक्षी, प्राणी यांच्याशीही या हळद- कुंकवाचे नाते आहे. निसर्ग अन्‌ पर्यावरण राखले गेले तरच सगळीकडे मंगल असू शकते, हीच यामागची मानसिकता आहे. त्यामुळे हळदी-कुंकवाचे दिवस म्हणजे सुखाचे, संपन्नतेचे दिवस असतात अन्‌ बायकांच्या रूपात ते सृष्टिचक्रामध्ये पेरलेले असतात.