भस्मांचा बागुलबुवा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
‘‘मला पातळ औषधं घेता येणार नाहीत. त्यामुळे ती देऊ नका. काढे करायला मला जमणार नाही. म्हणजे वेळच नाही माझ्याकडे! चूर्ण मला आवडत नाहीत. फार कडू असतात. नकोच ती! आणि मेटल्स असलेली औषधं नको हं!’’ बी. टेक. झालेले श्रीयुत शार्दुल नेने अशाा थाटात बोलत होते की जणू त्यांनी मला युद्धात हरवलं आहे आणि तहाच्या अटी ते ठरवणार आहेत. त्यांच्या आजारावर ते आयुर्वेदाचे उपचार करून घेणार हे केवळ माझ्यावरच नाही तर समस्त आयुर्वेद शास्त्रावर जणू मोठ्ठे उपकारच होते.
 
‘‘एक मिनिट!’’ त्यांना मधेच तोडत मी म्हटलं. ‘‘उपचार काय असावेत, हे तुम्ही मला सांगायचं की मी तुम्हाला? तुम्ही एका आयुर्वेदीय सल्लागाराकडे आला आहात, मिठाईच्या दुकानात नाही.’’
‘‘माझ्या या कडक धोरणावर नेने थोडे चपापले. पण हार थोडीच मानणार होते. ‘‘बाकीचं एक वेळ ठीक आहे. पण भस्म नकोच. ती किडनी आणि लिव्हरमध्ये डिपॉझिट होतात ना?’’ तहातल्या काही अटी मागे घेण्यात आल्या होत्या.
‘‘हे तुम्हाला कुणी सांगितलं? आयुर्वेदातल्या कुठल्या व्यक्तीला विचारून खात्री करून घेतलीत का ? तुम्ही म्हणताय्‌ की तुम्हाला यापूर्वी कावीळ, टायफॉईड, मलेरिया झाला होता. त्या प्रेत्येक वेळी रुग्णालयात प्रविष्ट व्हावं लागलं होतं. शिवाय हर्निया, पायातलं हाड मोडलं म्हणून त्यात टाकलेली सळई अशी एकूण सहा शस्त्रकर्म झाली आहेत तुमच्यावर. शिवाय आयुर्वेदाचं औषध तुम्ही यापूर्वी कधीच घेतलेलं नाही. तुम्ही यापूर्वी खाल्लेली औषधं साठवून तुमची किडनी आणि लिव्हर आधीच खूप श्रीमंत झालेलं आहे. तुम्ही नेटवर वाचत नाही का या औषधांविषयी?’’ मी विचारलं.
 
बाहेर रुग्ण थांबले होते म्हणून मी थेट विषयाला हात घातला. आयुर्वेदात खनिजांची भस्मं औषधात वापरली जातात, खनिज आहे, त्या स्वरूपात वापरत नाहीत. भस्म बनवणं ही खूप लांबलचक प्रक्रिया आहे. आधी शोधन- त्यासाठी धातू तापवून लगेच गार द्रवात विझवतात. तीळ तेल, ताक, गोमूत्र असे आठ वेगवेगळे द्रव त्यासाठी वापरतात. प्रत्येक द्रवात धातू सात वेळा विझवायचा असतो. हे झालं सामान्य शोधन- म्हणजे सगळ्यांचं सारखं. याशिवाय प्रत्येक धातूचं विशेष शोधन सांगितलं आहे. त्यानंतर मारण. सात- सात वेळा औषधात घोटून मग भट्टीतून काढतात. पुढे अमृतीकरण सांगितलं असेल तर ते! सगळ्यात ठिसूळ धातूचं भस्म व्हायला देखील कमीतकमी दीड महिना तरी लागतो. हे भस्म रुग्णाला देण्यायोग्य झालं आहे की नाही, याच्या आयुर्वेदाच्या स्वतःच्या काही परीक्षा आहेत. इतके व्याप केल्यावर जे भस्म होतं, त्यातून कुठल्याही पद्धतीनं तो धातू त्याच्या मूळ स्वरूपात मिळतच नाही. डिपॉझिट होणं ही खूप लांबची गोष्ट. आयुर्वेद हे एक शास्त्र आहे हो! आपले शास्त्रज्ञ खूप द्रष्टे होते आणि मुख्य म्हणजे मनुष्याच्या कल्याणाचाच विचार करणारे होते. या लोकांनी धन, कीर्ती, सन्मान, पुरस्कार यांच्या लालसेनं नाहीत काही शोध लावलेले.’’ माझा भाऊ म्हणतो की अशा वेळी तुझ्या हातात दांडपट्टा असेल तर तू एखादी पलट देखील मारशील.
 
‘‘पण मग असं का म्हटलं जातं भस्मांविषयी?’’ नक्की कुणाचं खरं या सामान्य माणसाच्या नेहमीच्या बुचकळ्यात नेने पडले.
‘‘माझ्या एका मित्रानं एक महिना आयुर्वेदाचे काढे घेतले होते. घरी बनवायचा तो काढा. तर त्याच्या कीडनीत अर्सेनिक सापडलं. हे कसं?’’
‘‘काढा हे पूर्ण वनस्पतीज औषध असतं. त्यात भस्म असतातच कुठं? लेड, अर्सेनिक, पारा या हेव्ही मेटल्सचं आपण इतकं प्रदूषण करून ठेवलं आहे ना, की आपल्या अन्नातून आणि पाण्यातून सुद्धा ती आपल्या नकळत आपल्या पोटात जात असतात. रासायनिक खतं, कीटकनाशकं, पॅक्ड फूड, रिफाईन्ड फूड, अन्नातले प्रिझर्व्हेटिव्हज, काही रासायनिक औषधं, इतकंच काय तर काही लसी यात देखील ही मेटल्स धोकादायक मात्रेत असू शकतात. कळस म्हणजे, वायुप्रदूषणामुळे पावसाच्या थेट साठवलेल्या पाण्यात देखील ही विषारी मेटल्स आढळतात. लोकांनी संशोधन न करताच, धातूंच्या दोषांचा आरोप भस्मांवर लावला. आता एकदा तुमच्या माहितीजालात जाऊन, भस्मांविषयी नवीन संशोधन काय सांगतं ते बघा.’’ असं म्हणून मी औषधं लिहायच्या कामाला लागले.
आयुर्वेद आहे आप्तोपादेश।
आप्त म्हणजे ऋषी खास।।
ज्यांसी लोभाचा नसे लवलेश।
केवळ भूतहिताचा ध्यास।।