यथोचित खरडपट्‌टी...!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘क्लीन चिट’ दिल्यानंतरही पुन:पुन्हा घासून गुळगुळीत झालेल्या मुद्याला चकाकी आणण्याचे, देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रयत्न सुरू आहेत. राफेलवरून पुन्हा एकदा त्यांनी आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवला आहे. यावेळी त्यांनी वेळ साधली ती माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आजारपणात भेट घेतल्यानंतरची. राहुल गांधी दोन दिवसांच्या गोव्याच्या भेटीवर अर्थात विश्रांतीसाठी आले होते. यादरम्यान त्यांनी मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीनंतर त्यांनी, मनोहर पर्रीकरांजवळ राफेल सौद्याची अधिकृत कागदपत्रे असून, त्या कागदपत्रांचा उपयोग करून ते स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्याची पराकाष्ठा करीत असल्याचा आरोप केला.
 
या कागदपत्रांमुळे मोदी त्यांच्याबाबत निर्णय घेताना हतबल होत आहेत, असा यामागचा राहुल गांधींचा मथितार्थ आहे. राफेलबाबतची गोवा ऑडिओ टेप जाहीर होऊन ३० दिवस झालेत, पण अजूनपर्यंत साधा एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, अशी राहुल गांधी यांची तक्रार आहे. ही ऑडिओ टेप अतिशय ज्वालाग्रही असून, त्यामुळे मनोहर पर्रीकर यांच्या हाती मोदींविरुद्ध वरचढ होण्याचे अस्त्र गवसले असल्याचा जावईशोधही राहुल यांनी लावला आहे. पण, एखाद्या व्यक्तीची सदिच्छा भेट घ्यायची आणि त्या व्यक्तीच्या आजारपणाचा फायदा घेऊन तिच्याबद्दल नको ते बोलायचे, यात काय हशील आहे? पंतप्रधानपदासारख्या पदाची आस बांधून असलेल्या नेत्याकडून असे वर्तन मुळीच अपेक्षित नाही.
 
राजकारणात ज्या बाबींचा विधिनिषेध बाळगायला हवा, त्याबाबतचे वर्तन जाहीरपणे करून राहुल यांनी आपण किती कोत्या बुद्धीचे आहोत, हेच जगाला दाखवून दिले आहे. राहुल यांनी आपली बदनामी चालवली असल्याचे कळताच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी त्यांचा दावा खोटा असल्याचे सांगून त्यांची अक्षरशः खरडपट्‌टी काढली. त्यामुळे राफेल कराराबाबत तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना काहीच माहिती नव्हती, असा दावा करणे त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पर्रीकर आणि राहुल गांधी यांच्यात फक्त पाच मिनिटांची चर्चा झाली. या चर्चेत राहुल यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून, सारा हालहवाल जाणून घेतला. पर्रीकरांनीही आपल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल राहुल यांचे आभार मानले. या पाच मिनिटांच्या काळात राजकारणावर चर्चा आणि भाष्य करण्याला सवडच नव्हती. ओठात एक आणि पोटात एक, हे सिद्ध करणाराच हा प्रसंग असल्याचे राहुल-पर्रीकर भेटीचे वर्णन करायला हवे. म्हणे मोदींनी राफेल कराराची माहिती पर्रीकरांना दिलीच नाही. ही बाब स्वतः पर्रीकरांनी मला सांगितली, असा राहुल यांचा दावा अपरिपक्वता दर्शविणाराच म्हणावा लागेल. मोदी आणि त्यांच्या वैयक्तिक हितगुजाबद्दल पर्रीकर जाहीरपणे आणि तेही विरोधी पक्षनेत्याशी बोलतील, अशी कल्पना तरी करता येऊ शकेल का? पण, राहुल यांनी त्याहीपलीकडची झेप घेऊन स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी पर्रीकरांनाच खोटे ठरविण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्हच म्हणायला हवा.
 
 
 
राहुलना लिहिलेल्या पत्रात पर्रीकरांनी, या भेटीत राफेलची चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करून राहुल यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली. खरेतर राहुल गांधी गोव्यात विश्रांतीसाठी आले असता, त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता पर्रीकरांची भेट मागितली. आजारपणात बाहेरच्या व्यक्तींच्या भेटी टाळाव्यात, अशी सूचना असतानाही केवळ मनभेद विसरून भेटीला आले म्हणून पर्रीकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून राहुलची भेट घेतली. पण, यानंतर राहुल गांधी यांनी कोलांटउडीच मारली. राफेलबाबत आमच्यात चर्चा झाल्याची बोंब राहुल ठोकू लागले. त्यामुळेच पर्रीकरांना तिसरा डोळा उघडावा लागला. त्यांची भेट घेण्यामागचा राहुल यांचा इरादा स्वच्छ नव्हता, त्यांना राजकारण करायचे होते, त्यांची बदनामी करायची होती, मोदी सरकारमध्ये कसे मनभेद आहेत, हे जगाला सांगायचे होते, हेच आता आम्ही गृहीत धरीत आहोत असे नव्हे, तर त्याची प्रचीतीच आम्हाला आलेली आहे, असे पर्रीकरांनी पत्र पाठवून खडसावले आहे. पर्रीकर सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. जीवन-मृत्यूच्या संघर्षात त्यांना हितैषींच्या शुभेच्छांची गरज आहे.
 
राहुल गांधींच्या भेटीतून जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मकता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण, त्यांच्या वर्तनाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. पत्राची अखेर त्यांनी ‘आता तर सत्य स्वीकारा’ या शब्दांत केली आहे. उगाच आजारी व्यक्तीची भेट घेऊन तिला संकटात टाकू नका, ही विनवणी राहुल यांनी ऐकावी, अशी अपेक्षा आहे. खरेतर पर्रीकर यांच्याबाबत अशी आवई उठवून राहुल यांनी ते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांमध्येही विसंवादाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्याचे मंत्री विश्वजित राणे यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. कारण पर्रीकर यांची जी ऑडिओ टेप ऐकविली जात आहे, ती तद्दन खोटी आणि बनावट आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी होण्याची किंवा फौजदारी खटला दाखल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. राहुल यांच्या मते, ५९ हजार कोटींच्या व्यवहाराची फाईल पर्रीकरांनी त्यांच्या बाथरूममध्ये लपवून ठेवली आहे. राहुल गांधी यांनी हाच मुद्दा संसदेतही उचलून धरला होता.त्यांनी तर सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे ही ध्वनिफीत सर्वांना ऐकविण्याची विनंती केली होती. पण, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या ध्वनिफितीची प्रामाणिकता सिद्ध केल्याशिवाय ती ऐकविता येणार नाही, असा युक्तिवाद केल्यानंतर त्याबाबतचा राहुल यांचा आग्रह मावळला.
 
सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करणारी याचिका फेटाळून लावल्यानंतरही, हा मुद्दा जिवंत ठेवण्यामागे लोकसभेच्या आगामी निवडणुका हेच एकमेव कारण आहे. कदाचित लोकसभेच्या निवडणुकांनंतर हा मुद्दा चर्चेलाही येणार नाही. निवडणुका जशा जवळ येताहेत तशी टीकेची धार तीव्र होताना दिसत आहे. विशेषतः वैयक्तिक टीका अहमहमिकेने होऊ लागल्या आहेत. ‘चौकीदार चौर हैं’ अशा प्रकारची टीका राहुलकडून होतच आहे. राहुल गांधींनी पर्रीकरांना लक्ष्य केले असले, तरी त्यांचा सारा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आहे, ही बाब ध्यानात घेतली जायला हवी. कसेही करून सत्ताधारी पक्षाचा मुखिया कसा अडचणीत येईल, यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने राफेलबाबतची याचिका निकाली काढताना म्हटले होते की, देशाची सुरक्षा व लष्कराचे सक्षमीकरण या बाबींना महत्त्व दिले जायला हवे.
 
त्यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकताच पडायला नको. हा सर्वस्वी केंद्र सरकारचा विषय आहे. मात्र, देशामध्ये ज्या प्रकारे आरोप-प्रत्योरापांचा धुराळा उडाला आहे, त्यामुळे सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच हे प्रकरण कोर्टाकडून हाताळले होते. सार्‍या बाबी तपासल्यानंतर कोर्टाने ‘क्लीन चिट’ दिलेली आहे. पण, तरीदेखील कॉंग्रेसला त्यावर विश्वास नाही. या ना त्या कारणाने कॉंग्रेस हा मुद्दा जिवंत ठेवू इच्छिते. पर्रीकर प्रकरणीही कॉंग्रेसची भूमिका संशयाची आहे. त्यामुळे पर्रीकरांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून काढलेली राहुलची खरडपट्‌टी यथोचित म्हणायला हवी!