मालिका जिंकली, पण अखेरचा सामना गमावला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
हॅमिल्टन :
मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका आधीच जिंकली, परंतु तिसर्‍या व अखेरच्या सामन्यात यमजान संघाने जोरदार मुसंडी मारत 8 गड्यांनी विजय नोंदविला.
 
शुक्रवारी कर्णधार मिताली राज आपला 200 वा सामना खेळताना आम्ही न्यूझीलंडला मालिकेत क्लीन स्विप करू असे म्हटले होते, परंतु तिच्या संघाला केवळ 149 धावाच काढता आल्या. यजमान न्यूझीलंडने 29.2 षटकात विजयाचे लक्ष्य गाठले.
 
 
 
विजयासाठी 150 धावांचा पाठलाग करताना बेट्‌सने 64 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर कर्णधार एमी सत्तेरवेटनेही लागोपाठ दुसरे अर्धशतक ठोकले. एमीने 74 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने हा सामना गमावला असला तरी त्यांनी पहिले दोन सेसमने जिंकून मालिका खिशात घातली.
 
दहा षटकात 28 धावात 4 बळी टिपणारी पीटरसन सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तिने स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा व हरमनप्रीत कौर यांना बाद केले.
 
आम्ही न्यूझीलंडमध्ये पहिली मालिका जिंकली याचा अतिशय आनंद वाटतो. दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्जसारख्या युवा खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी केली. काही गोष्टी साध्य करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न केले. मालिकेदरम्यान गोलंदाजांनीसुद्धा उत्तम प्रदेर्शन केले, परंतु आज आम्हाला पुरेशा धावा काढता आल्या नाही, असे मिताली राज या सामन्यानंतर म्हणाली.