#Budget2019: क्रीडा अर्थसंकल्पात २०० कोटींनी वाढ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
नवी दिल्ली :
मोदी सरकारने आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राच्या अंदाजपत्रकात २१४.२० कोटी रूपयांनी वाढ केलेली आहे. यात भारतीय क्रीडा प्राधिकरण व खेळाडूंच्या भत्यासाठीचा निधीचा समावेश आहे.
 
संसदेत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात एकंदरीत क्रीडा अंदाजपत्रकात २०१९-२० या वर्षीसाठी २००२.७२ (२०१८-१९) कोटीहून २२१६.९२ कोटी रूपयांची तरतूद केलेली आहे. या अंतरिम क्रीडा अर्थसंकल्पात उल्लेखनीय लाभ म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एनएसडीएफ) व खेळाडूंना प्रोत्सान देण्यासाठी अर्थसहाय्य होईल.
 

 
साईसाठीचा निधी ५५ कोटींनी वाढविला असून नवीन प्रस्तावानुसार हा निधी ३९५ कोटी रूपयांहून ४५० कोटी इतका वाढविला आहे. एनएसडीएफचा निधी २ कोटीहून ७० कोटी रूपये इतका वाढविला आहे. खेळाडूंना देण्यात येणार्‍या भत्यासाठीच्या निधीतसुद्धा वाढ केलेली असून ही ६३ कोटीहून ८९ कोटी रूपयांपर्यंत केली आहे.
 
क्रीडा विकासासाठी खेलो इंडिया राष्ट्रीय उपक्रमासाठीसुद्धा ५०.३१ कोटी रूपयांनी वाढ केली आहे. पूर्वी खेलो इंडियासाठी ५५०.६९ कोटी रूपयांची तरतूद होती व ती आता ६०१ कोटी रूपये इतकी करण्यात आलेली आहे.