तीन ट्रॅकटर कांदा रस्त्यावर फेकला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
साक्री तालुक्यातील कसारे येथे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी  बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर तीन ट्रॅक्टर कांदा फेकला. कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर फेकला असे शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत रस्त्यावर कांदा दिसत असल्यामुळे काहीवेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
 
 
 
साक्रीपासून दहा किलोमीटरवर असलेल्या कसारे गावातील शेतकऱ्यांच्या कांद्याला गुरुवारी बाजारपेठेत प्रतिक्विंटलला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी संप्तत होत गावातील मुख्य रस्त्यावर कांदा फेकल्याची घटना घडली. दुसरीकडे नंदुरबार गावात खासदार हिना गावित व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत ग्रामस्वराज्य मेळाव्याचे आयोजन केले होते. सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. कार्यक्रमासाठी बाजारपेठेजवळ  मंडपही टाकण्यात आले होते. याची माहिती शेतकऱ्यांना समजताच त्यांनी घोषणा करीत या कार्यक्रमाला आपला विरोध दर्शविला.  गेल्या साडेचार वर्षांत खासदार या मतदारसंघात आल्याच नाही. मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. मग, त्यांना गावात येण्याचा काहीही अधिकारी नसल्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी एकत्र येत अखेर लोकप्रतिनिधींना विरोध दर्शविला. मात्र, दुपारी उशिरा लोकप्रतिनिधींनी गावात येऊन कार्यक्रम आटोपून माघारी परतलेत.
 
 
या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, उपपोलिस अधीक्षक श्रीकांत घुमरे, साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास यांनी तातडीने पोलिसांच्या फौजफाट्यासह कसारे गावात दाखल होऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. या वेळी राज्य राखीव जवानांची एक तुकडीदेखील घटनास्थळी दाखल झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी रस्त्यावरचा कांदा एकत्र केला.