निर्देशांकाची 213 अंकांची उसळी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
मुंबई :
आज सकाळी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असताना, मुंबई शेअर बाजारात कमालीचा चढ-उतार पाहायला मिळाला होता. दुपारपर्यंत मोठी उंची गाठल्यानंतर गुंतवणूकदारांची नफा कमावण्याची वृत्ती पुन्हा जागृत झाली आणि बहुतांश कमाई वाया गेली. दिवसअखेर निर्देशांकाला २१३ अंकांवरच समाधान मानावे लागले.
 
 
 
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी निर्देशांकाने १०० अंकांची कमाई केली होती. त्यानंतर जसजसा अर्थसंकल्प सादर केला जात होता, तसतशी कमाईत वाढ होत गेली. दुपारपर्यंत कमाईचा हा आकडा ५०० च्या घरात गेला होता. त्यानंतर मात्र काही कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली आणि गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यावर भर दिल्याने यातील बहुतांश कमाई पाण्यात गेली. दिवसअखेर २१२.७४ अंकांच्या कमाईसह निर्देशांक ३६,४६९.४३ या स्तरावर बंद झाला.
 
राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्‍या निफ्टीनेही दुपारपर्यंतची कमाई गमावली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर निफ्टी ६२.७० अंकांच्या कमाईसह १०,८९३.६५ या स्तरावर बंद झाला.