ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
वाशीम,
तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणार्‍या एका चोराला गावकर्‍यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली.
 
 

 
 
 
 
 
वाशीम येथील सामान्य रूग्णालयाच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी विशाल कालबाल्या चव्हाण याच्यासह अन्य तीन ते चार अज्ञात चोरांनी 1 फेब्रुवारी रोजी रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास काटा गावात चांगलाच धुमाकुळ घातला. या चोरांनी गावातील घनश्याम पोरवाल, वसंतकुमार बांडे, शिवाजी इंद्रभान कंकणे यांचे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, पोरवाल यांच्या घराचे कुलूप तोडत असताना शेजारीच वास्तव्यास असलेले नितीन खडसे व त्यांच्या पत्नी हर्षा यांना चाहुल लागली. त्यांनी घरातून बाहेर येऊन पाहले असता समोरच्या घरामध्ये चोर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच खडसे पती पत्नीने वेळीच प्रसंगावधान राखून टोळीलतील विशाल चव्हाण या चोरास पाठलाग करुन पकडले. यावेळी विशाल चव्हाणने नितिन खडसे यांच्यावर हल्ला चढविला मात्र, नितीन खडसे यांनी न घाबरता त्या चोराचा सामना करुन त्याला पकडून ठेवले. त्यानंतर त्यांनी शेजारील लोकांना आवाज देऊन जागे केले. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामीण पोलि स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी चोराला अटक करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय नरडे करीत आहेत.