3 सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा चंद्रपुरात थांबा - 4 व 5 फेब्रुवारीला हंसराज अहिर दाखविणार हिरवा झेंडा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
चंद्रपूर,
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर मुन्नारगुडी ते भगत की कोठी, गांधीधाम ते विशाखापट्टनम्‌ तसेच तिरुवेनपल्ली ते बिलासपूर या तीन सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा मंजूर झाला असून, 4 व 5 फेब्रुवारी रोजी हंसराज अहिर या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविणार आहे.
 
 

 
 
 
गांधीधाम-विशाखापट्टनम्‌ (क्रमांक 18502) ही गाडी सोमवारला रात्री 10.45 वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार असून, तिरुनेलवेली-बिलासपूर (क्रमांक 22620) ही साप्ताहिक गाडी सोमवारी दुपारी 12.2 वाजता चंद्रपूर स्थानकावर पोहचेल तसेच बिलासपूर-तिरुनेलवेली (क्रमांक 22619) ही गाडी मंगळवार, 5 फेब्रुवारी रोजी 5.52 वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या बरोबरच मुन्नारगुडी ते भगत की कोठी (क्रमांक 16864) ही गाडी मंगळवारी दुपारी 12.2 वाजता चंद्रपूर स्थानकावर पोहचेल. विशाखापट्टनम्‌-गांधीधाम (क्रमांक 18501) ही गाडी शुक्रवारी सकाळी 8.40 वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचेल तसेच भगत की कोठी (जोधपूर) ते मुन्नारगुडी (क्रमांक 16863) ही गाडी शुक्रवारी सायंकाळी 7.18 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल.
 
 
 
 
4 फेब्रुवारी रोजी गांधीधाम-विशाखापट्टनम्‌ व तिरुनेलवेली-बिलासपूर या गाड्या चंद्रपूर स्थानकावर थांबेल तसेच 5 फेब्रुवारी रोजी मुन्नारगुडी ते भगत की कोठी व बिलासपूर-तिरुनेलवेली या गाड्यांना हंसराज अहिर हिरवा झेंडा दाखविणार असून, या गाड्यांच्या स्वागतासाठी महानगरातील नागरिकांनी, रेल्वे प्रवाशांनी तसेच रेल्वे प्रवासी सुविधा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी गाड्यांच्या निर्धारित वेळेत उपस्थित राहून या गाड्यांचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
 
हंसराज अहिर या गाड्यांच्या थांब्यांबाबत आग्रही होते. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या या मागणीची त्वरित दखल घेत या जिल्ह्यातील दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय बांधव तसेच व्यापारी, व्यवसायी, नोकरपेशा वर्ग तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येतील प्रवाशांकरिता या तिन्ही गाड्या अत्यंत सुविधाकारक ठरणार आहेत. विशाखापट्टनम्‌ ते गांधीधाम या गाडीमुळे गुजरातेतील गांधीधाम व गीर राष्ट्रीय अभयारण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना मोठी सुविधा होणार आहे. तामिळनाडू (हिल्सस्टेशन) मुन्नारगुडी येथून सुटणार्‍या गाडीमुळे दक्षिण भारतीय प्रवाशांचीही फार मोठी सोय होणार आहे.