अमेरिकेत व्हिसा रॅकेट उद्ध्वस्त
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
वॉशिंग्टन
 
 
अमेरिकेत अनधिकृतपणे राहणाऱ्या शेकडो विदेशी नागरिकांना मदत करण्याच्या नावाखाली ‘पे टू स्टे’ व्हिसाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आठ जणांना अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन येथील ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (आयसीई) आणि ‘होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स’ने (एचआयएस) हे मोठे व्हिसा रॅकेट उद्ध्वस्त केले. आरोपी भारतीय किंवा भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. हे रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर शेकडो विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवले जाणार आहे. यामध्ये बहुसंख्य भारतीयांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
व्हिसा रॅकेटची माहिती मिळताच ‘आयसीई’च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस छापे टाकले.  डेट्रॉइट येथून सहाजणांना अटक करण्यात आले असून अन्य दोघांना व्हर्जिनिया आणि फ्लोरिडा येथून अटक करण्यात आले. हे आठही जण २५ ते ३० वयोगटातील असून त्यांची नावे भारत काकीरेड्डी, सुरेश कंडाला, पाणीदीप कर्नाटी, प्रेम रामपीसा, संतोष सामा, अविनाश थक्कलापल्ली, अश्वंत नुणे आणि नवीन प्रतिपति अशी आहेत. या सर्वांची नागरिकता मात्र ‘आयसीई’ने उघड केलेली नाही. विदेशी नागरिकांना विद्यापीठाचे विद्यार्थी दाखवून त्यांची ‘पे टू स्टे’ व्हिसाच्या माध्यमातून हे आरोपी फसवणूक करीत होते.  अशाप्रकारे अमेरिकेमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या सुमारे ६०० विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे रॅकेट देशभर चालवले जात होते, असे विशेष एजंट चार्ज फ्रान्सिस यांनी सांगितले.
 
 
 
एकीकडे ‘आयसीई’चे अधिकारी या रॅकेटचा माग काढत असतानाच ‘एचआयएस’ने व्हिसा रॅकेट चालवणाऱ्यांसाठी बोगस विद्यापीठाचा सापळा लावला होता. गोपनीय मोहिमेचा भाग म्हणून ‘एचआयएस’चे काही विशेष एजंट डेट्रॉइट शहरातील फार्मिंग्टन हिल्स भागातील एका छोट्या इमारतीमध्ये बोगस विद्यापीठ चालवत होते. या विद्यापीठाच्या माध्यमातूनच या रॅकेटचा शोध लागल्याचे सूत्रांनी सांगितले.