नवे तंत्रज्ञान, नवे प्रश्न...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
विसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या ज्या अनेक क्षेत्रात विकास झाला त्यात संपर्कक्षेत्राचा प्रामुख्याने समावेश होतो. रेडिओ, टेलिव्हिजनबरोबरच मोबाईल आणि इंटरनेटच्या आगमनाने या क्षेत्रात क्रांती झाली. माहितीची देवाणघेवाण आणि उपलब्धता प्रचंड प्रमाणात वाढली. विशेषतः इंटरनेटमुळे माहितीच्या निर्मिती आणि वितरणात वैयक्तिक सहभाग वाढला. यातूनच सामाजिक प्रसारमाध्यमाची सोशल मीडिया कल्पना साकार झाली. सुरवातीच्या काळात इंटरनेट फक्त संगणक आणि लॅपटॉपशी संलग्न होते. त्यानंतरच्या काळात ते मोबाईलमध्ये उपलब्ध झाले. आता ते दैनंदिन जीवनातील वस्तूंना जोडले जात आहे. यात शेती, आरोग्य, उद्योग, दळणवळण, अवकाशयात्रा, कपडे, चष्मे आणि गॉगल यांचा समावेश आहे. पुढील काही दशकात याची व्याप्ती वाढणार असून, जीवनाची सर्व अंगे या इंटरनेट असणार्‍या वस्तू व्यापून टाकणार आहेत. या वस्तूंमध्ये माहिती गोळा करण्याची, माहितीची देवाणघेवाण करण्याची आणि माहितीच्या आधारे कार्य घडवून आणण्याची क्षमता असणार आहे. याचाच अर्थ, या वस्तू चलाख असणार आहेत. यालाच आयओटी- इंटरनेट ऑम िंथग्ज म्हणतात.
ही संकल्पना नीटपणे समजावून घेण्यासाठी काही उदाहरणांची चर्चा करू. सध्या हाताला बांधता येईल असे घड्याळासारखे एक सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर लांब असे मीटबीट नावाचे उपकरण बाजा
रात उपलब्ध आहे. हे उपकरण मनगटावर बांधता येते. ते व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मोजते. हे उपकरण आयमोनला जोडता येते. या उपकरणामध्ये आपण किती पावले चाललो, त्याचे किलोमीटरमध्ये अंतर किती, त्या घडीला हृदयाची गती काय होती आणि किती कॅलरी ऊर्जा खर्च झाली ही माहिती तत्काळ उपलब्ध होते. एवढेच नव्हे, तर हृदयाच्या गतीत दिवसभरात झालेल्या बदलाचा आलेख आयमोनवर उपलब्ध होतो. प्रत्येक व्यक्तीला ठरावीक काळ झोप आवश्यक असते. मात्र, ही झोप योग्य प्रकारे घेतली गेली पाहिजे. त्यासाठी काही निकष आहेत. आठ तासांच्या झोपेत झोपेची चार आवर्तने व्हायला हवीत. यात जागृत अवस्था, हलकी झोप, गाढ झोप आणि स्वप्नावस्था यांचा समावेश असतो. प्रत्येक रात्रीच्या झोपेचा आलेख हे उपकरण आयमोनच्या साहाय्याने आपल्याला उपलब्ध करून देते.
 
श्वासाद्वारे आपण जो ऑक्सीजन घेतो त्याचा आपले शरीर किती कार्यक्षमतेने उपयोग करून घेते, हेही या उपकरणाद्वारे कळते. याचा उपयोग वयोमानाप्रमाणे आपले हृदय किती कार्यक्षम आहे, त्यानुसार आपण आपला आहार, व्यायाम, काम आणि झोप यांचे नियोजन करू शकतो. शरीरात काही बिघाड दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीचे नियंत्रण आणि धोक्याची सूचना याद्वारे मिळू शकते.
 
नोकरी आणि घर सांभाळताना गृहिणींची ओढाताण होते. वेळेशी शर्यत करताना वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, फ्रीज या आणि अशा इतर उपकरणांची मदत अपरिहार्य ठरते. ही उपकरणे वापरण्यासाठी करावी लागणारी देखरेखदेखील वेळखाऊ असते. अशी उपकरणे इंटरनेटला जोडता आली तर? ही उपकरणे हव्या त्या वेळी आणि हव्या त्या ठिकाणाहून वापरता येतील. त्यामुळे वेळेचे नियोजन सोपे होईल. घरातील दिव्यांचे अपोआप नियंत्रण होईल. वैयक्तिक वापरातील कपडे आणि गॉगल यांसारख्या वस्तू यामुळे चलाख स्मार्ट होतील. कपडे वातावरणाप्रमाणे रंग आणि तपमान बदलतील, तर गॉगलच्या काचेचा गडदपणा प्रकाशाच्या तीव्रतेप्रमाणे बदलेल.
 
शेती, उद्योग आणि दळणवळणाच्या क्षेत्रात अनेक प्रकारे या चलाख वस्तूंचे उपयोजन होईल. शेतातील पंप जमिनीतील ओल कमी झाली की सुरू होईल. आवश्यक त्या प्रमाणात जमिनीत पाणी उपलब्ध झाले की तो बंद होईल. खते आणि कीटकनाशकांची मात्रा हव्या त्या प्रमाणात हव्या त्या वेळी देण्याची योजना करता येईल. उत्पादनक्षेत्रात ही उपकरणे लहान यंत्रमानवाप्रमाणे काम करतील. युद्धक्षेत्रात यामुळे आमूलाग्र बदल होतील. सध्या ड्रोनचा वापर करून शत्रुप्रदेशात टेहळणी त्याचप्रमाणे हल्ले केले जातात. या नवीन तंत्रज्ञानामुळे ड्रोनचा आकार मधमाशीएवढा लहान होऊ शकतो. अशा ड्रोनचे थवे शत्रुपक्षाच्या सैनिकांवर हल्ले करून त्यांना नेस्तनाबूत करू शकतात.
 
एकाविसाव्या शतकात अवकाश उड्डाणात वाढ होणार, हे निश्चित. भारतही या स्पर्धेत सामील असणार आहे. ही उड्डाणे मानवासहित आणि मानवविरहित अशा दोन्ही प्रकारची असणार आहेत. अवकाशात असताना अवकाशयात्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, हे दिसून आले आहे. त्यात हाडांची झीज, प्रतिकारशक्ती कमी होणे, लाल रक्त पेशींवर परिणाम, रक्तदाबात बदल यांचा समावेश आहे. ही उपकरणे या बदलांचे मापन करून त्यांची माहिती अवकाशयात्रींना उपलब्ध करून देतील. शिवाय पृथ्वीवरील केंद्राशी संपर्क साधून त्यावर योग्य त्या उपाययोजनेची माहिती मिळवून ती उपलब्ध करून देतील. मानवविरहित अवकाशयानात यानाच्या कार्याचे नियंत्रण, माहितीचे संकलन, साठवण आणि वितरण ही उपकरणे करतील. यासाठी यानातील इतर उपकरणांशी संपर्क ठेवून त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून निर्णय घेतील. मानवाशिवाय ही उपकरणे अपेक्षित काम तितक्याच िंकवा काही बाबतीत त्याहून अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करतील.
सध्या कार आणि विमानात क्वचितच इंटरनेट उपलब्ध असते. पुढील काही वर्षांत ऐंशी टक्के मोटरीमध्ये इंटरनेट असेल. मालवाहू ट्रक, रेल्वे आणि इतर वाहनेही अपवाद नसतील. त्यामुळे अशा वाहनात प्रवाशांच्या सेायीसाठी अनेक चलाख उपकरणे उपलब्ध होऊ शकतील.
 
अशाप्रकारे जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकण्याची क्षमता असणार्‍या या चलाख वस्तूंनी व्यापार संशोधन आणि उत्पादनात अनेक शक्यता निर्माण केल्या आहेत. या वस्तूंच्या वापरात काही वर्षांतच लक्षणीय वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, दोन हजार सतरामध्ये अशा उपकरणांची झालेली विक्री ही 14.1 अब्ज एवढी होती. हीच विक्री 2021 सालात 25 अब्जापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सध्या 5.2 अब्ज डॉलर असणारा व्यापार 2025 मध्ये 6.2 हजार अब्ज इतका वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी या उपकरणांच्या निर्मिती, क्षमता आणि उपयोग यामध्ये खूप सुधारणा होण्याची गरज आहे. अशी उपकरणे आकाराने लहान, वजनाने कमी आणि क्षमतेने अधिक असणे अपेक्षित आहे. या उपकरणांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत पदार्थविज्ञान क्षेत्रात होणारे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही अब्जांशी तंत्रज्ञानाचा उपयोग यासाठी अधिक प्रमाणात होईल. या उपकरणांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या साठवण क्षमतेबरोबरच, निरनिराळ्या संवेदकांची निर्मिती, माहितीच्या देवाणघेवणीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. या उपकरणांसाठी लागणार्‍या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संशोधनाला भरपूर वाव आहे.
 
सद्य:स्थितीत वापरल्या जाणार्‍या उपकरणांची संख्या अब्जावधी असली, तरी एकूण प्रणाली प्राथमिक अवस्थेत आहे. निरनिराळ्या उपयोजनासाठी काही उद्योग आपापली उपकरणे विकत आहे. मात्र, त्यांच्या वापरासाठी विशिष्ट मोबाईल आणि संगणक प्रणालीची गरज भासते. कोणतेही उपकरण उपलब्ध सुविधेप्रमाणे वापरता यायला हवे. मात्र, अशी व्यवस्था निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागेल. अशा उपकरणांच्या वापरामुळे सामाजिक, कायदेविषयक आणि नैतिक प्रश्न निर्माण होऊ पाहात आहेत. यात मानसिक आणि वर्तणुकीविषयक प्रश्नांची भर पडेल. या उपकरणांच्या वापरातून निर्माण होणार्‍या माहितीचा उपयोग हा कळीचा प्रश्न आहे. ही माहिती सुरक्षित नसल्याने ती सहज कोणालाही उपलब्ध होऊ शकते. कंपन्या अशा माहितीचा उपयोग निरनिराळ्या कारणांसाठी करतात, हे आपल्याला माहीत आहेच. आरोग्यविषयक माहिती इतरत्र गेल्यास खाजगी हक्काचा भंग होण्याची शक्यता आहे. लोकांचे खाणे, मनोरंजन, इतर आवडी, राजकीय कल याविषयी असणारी माहिती व्यापार, राजकारण, चित्रपटनिर्मिती यासाठी नियोजन करण्यासाठी उपयोगी पडते. यासाठी एकविसाव्या शतकात माहितीच्या साठ्यांना खूप महत्त्व येणार आहे. याविषयक कायदेशीर प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या संबंधातील माहितीचा अनाधिकृत वापर हा जसा बेकायदेशीर आहे तसा अनैतिकपण आहे. एखाद्या व्यक्तीच्या व्याधीची माहिती त्या व्यक्ती, त्या व्यक्तीचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन उद्‌ध्वस्त करू शकते.
 
 
उपकरणांच्या अतिवापरामुळे होणार्‍या मानसिक आणि शारीरिक परिणामांची िंचता दिवसेंदिवस वाढत आहे. उपकरणांच्या वाढीव उपलब्धतेमुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे. आजच मोबाईलच्या आभासी जगात वावरण्याची सवय लागल्यामुळे वास्तव जगाचा विसर पडत चालला आहे. आभासी जगात रमताना विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आणि प्रौढांना झोपेचा विसर पडत चालला आहे. त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. चलाख उपकरणांच्या अतिवापरामुळे व्यक्तीच्या वर्तनाचे नियंत्रण उपकरणांंच्या, पर्यायाने कंपन्यांच्या हातामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपकरणांचा वापर कशासाठी? हा खरा प्रश्न आहे. मानवाची कार्यक्षमता वाढावी त्याचप्रमाणे त्याचे जीवन सुखी व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे, असे सांगितले जाते. मात्र, उपकरणांच्या अतिवापरामुळे माणूस अधिकाधिक उपकरणावलंबी आणि आळशी बनण्याची शक्यता आहे. हे टाळायचे असेल, तर तंत्रज्ञानाच्या वापरावर माणसाचे पूर्ण नियंत्रण असायला हवे. यासाठी तंत्रज्ञानाविषयक आकलन प्रगल्भ हवे. यातूनच आपण तंत्रज्ञान वापरतो, की तंत्रज्ञान आपल्याला वापरते, याचा गांभीयपूर्वक विचार करायला हवा.
- डॉ. पंडित विद्यासागर