भास्वती सरस्वती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दीडशेे वर्षांच्या गुलामीला झुगारून देत, इथल्या पुरातत्त्वशास्त्री विद्वानांनी कंबर कसली आणि एकाहून एक उत्खनन करत या देशाच्या प्राचीनत्वाचे, प्रथमत्वाचे आणि प्रगल्भतेचे एकाहून एक भक्कम पुरावे सादर केलेत. सरस्वती-िंसधू नद्यांच्या खोर्‍यांत एक संपन्न संस्कृती अंकुरली, रुजली आणि नांदली, हे हरप्पा आणि मोहेंजोदारोमुळे समोर आलं असलं, तरी पाश्चात्त्य त्याला एक फ्लूक म्हणजे केवळ दैवयोग असल्याचं मानत. या सगळ्यांचं आणखी एक लाडकं मत होतं, ‘वेदांत जिचं वर्णन केलं आहे ती सरस्वती नावाची नदी काल्पनिक आहे. कारण तिचा मागमूस कुठेही लागत नाही. त्यामुळे वेदांची रचना भारतात झाली, याला काहीच भक्कम पुरावा नाही.’
या सगळ्या मतांना सुरुंग लावला तो कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांनी. सरस्वती नदी होती आणि वेदांत वर्णन केल्याप्रमाणेच तिचं पात्र विस्तीर्ण होतं आणि यमुना आणि शतद्रू म्हणजे सतलजसह दृषद्वतीसारख्या इतर नद्या तिच्या उपनद्या होत्या, हे यातून स्पष्ट झालं.
 
‘सरस्वती’ म्हणजे सरोवरांनी परिपूर्ण असलेली, म्हणजेच भरपूर पाणी असलेली. ती ज्या सागराला जाऊन मिळते तो ‘सरस्वान.’ तिची जे आराधना करतात ते ‘सारस्वत.’
या नदीवर वैदिक लोकांनी भारी प्रेम केलं. ती त्यांना बारमाही गोड पाणी द्यायची, तिच्या सुपीक गाळामुळे भरभरून पिकं यायची. तिच्या अविरल प्रवाहाच्या काठी बसून त्यांना विविध कोडी सुटायची, काव्यप्रतिभा प्रस्फुटित व्हायची, ज्ञानसाधनेला प्रेरणा मिळायची. नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा जागृत होत ऋग्वेदासारख्या एकमेवाद्वितीय साहित्याची निर्मिती करण्याला प्रोत्साहन मिळायचं. गणराज्य शासन प्रणालीनं सामाजिक सुव्यवस्था, सुनियोजित स्थापत्यानं परिपूर्ण जीवनमान यांचा समन्वय असणारं संपन्न भौतिक आणि सामाजिक जीवन हे याच नदीचं वरदान आहे, यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती.
ऋग्वेदाचं चौथं मंडल (अध्याय) सोडला, तर इतर नऊ मंडलांत सरस्वती नदीचा उल्लेख वारंवार आला आहे. या नदीचं स्तवन करणारी 3 सूक्तं (6 मंडलात 61 वं सूक्त आणि 7 व्या मंडलात 95 व 96 क्रमांकाची सूक्तं) आहेत. ‘अम्बेतमे देवीतमे नदीतमे सरस्वति। अप्रशस्ता इव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि।। त्वे विश्वा सरस्वति श्रितायून्षि देव्याम्‌ शुनहोत्रेषु मत्स्व प्रजां देवि दिदिड्‌ढि न:।।’ (हे श्रेष्ठ माते, श्रेष्ठ नदी, श्रेष्ठ देवी, सरस्वती, आम्ही अज्ञात आहोत, आम्हांला तू सुविख्यात कर. हे सरस्वती देवी, तुझ्यावर आमची आयुष्यं अवलंबून आहेत. आम्हा शूनहोत्रांच्या घरी तू संतुष्ट हो आणि आम्हाला विपुल प्रजा लाभू दे.)
या ऋचा सरस्वतीचं वैदिकांच्या आयुष्यातलं महत्त्व स्पष्ट करतात. सरस्वती ही त्यांची सर्वात आवडती नदी होती. त्यांचं बरोबरही आहे. कारण ज्या कोणत्या कालखंडात वेद निर्माण झाले त्या काळात जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही नदीच्या काठावर वसलेल्या संस्कृतींत वेदवाङ्मयाइतकी समृद्ध साहित्यकृती निर्माण झालेली नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे.
सरस्वतीनं वैदिकांच्या आयुष्यात काय परिवर्तन घडवून आणलं, याविषयीच्या या तीन ऋचा आहेत.

 
 
‘पावका नः सरस्वती वाजेभिर्वा जिनीवती। यज्ञं वष्टु धियासुः ।।10।।
चोदयित्री सनृतानां चेतन्ती सुमतीनाम्‌। यज्ञं दधे सरस्वती ।।11।।
महो अर्णः सरस्वती प्रचेतयति केवुना। धियो विश्वा वि राजति ।।12।।’
सरस्वती, अन्त:प्रेरणा, प्रकाशमय समृद्धीने भरपूर आहे ( वाजेभि: वार्जिनिवती), वैचारिक संपत्तीनं ऐश्वर्यवती (धियावसु:) आहे. ती यज्ञाला धारण करते, मर्त्य मानवानं (आवाहन केलेल्या) देवाला दिलेल्या आहुतींना धारण करत, मनुष्याच्या चेतनेला जागृत करते. सरस्वती अन्त:प्रेरणेच्या सतत क्रियेद्वारे सत्य आमच्या विचारांत आणि चेतनेत जागृत करते (चेतन्ती सुमतीनाम्‌). दुसर्‍या शब्दांत सत्याच्या अनुरूप भावनांना यथायोग्य अवस्था आणि विचारांना समुचित गती प्राप्त झाली की, सरस्वती त्यात सत्याचा उदय घडवून आणते (चोदीयत्री सूनृतानांम्‌). म्हणजेच सरस्वती सत्याची ती शक्ती आहे जिला अंत:प्रेरणा म्हणतात. हीच अंत:प्रेरणा आपल्याला सर्वप्रकारच्या मिथ्यापासून सोडवते आणि पवित्र करते. म्हणून तिचं एक विशेषण पावका असं आहे.
 
ही सत्य जागवणारी अंत:प्रेरणा आपलं मन त्या सत्याच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशानं उजळून टाकते, विवेकी करते आणि आपल्या जिभेवर वाणीच्या रूपानं प्रकटते. वैदिकांनी देवता सत्याच्या शक्तीने म्हणजे ‘ऋतेन’ कार्य करतात असं पुनःपुन्हा म्हटलं आहे आणि ‘महोअर्ण:’ म्हणजे खूप पाणी असलेली ती सरस्वती हे ते सत्य आहे.
उपनिषदांत सरस्वतीची वाणीशी एकरूपता दाखवली आहे. प्रज्ञावृद्धी आणि वाणीत गोडवा यावा म्हणून भास्वती (प्रकाशानं ओसंडून वाहणारी) म्हणून तिची प्रार्थना करण्यात आली आहे.
ब्राह्मण ग्रंथात कुरुक्षेत्रात विनशनमध्ये सरस्वतीचा लोप होतो, असा उल्लेख येतो. वाल्मिकी रामायणात, अयोध्येहून आपल्या आजोळी केकेय देशी जाताना आणि अयोध्येला परत येताना भरत, शत्रुघ्न आणि त्यांच्यासोबत असलेल्या लवाजम्यानं सरस्वती नदी ओलांडल्याचं नमूद केलं आहे. महाभारतात तिचा उगम हिमालयात प्लक्षप्रस्रवण या ठिकाणी झाला, ती विनशन या जागी लुप्त झाली आणि हे अंतर घोड्यावरून पार करण्यासाठी किमान चाळीस दिवस लागतात, असं म्हटलं आहे.
 
भूगर्भात झालेल्या विविध बदलांचा परिणाम म्हणून यमुना आणि सतलज नद्यांची पात्रं बदलली, सरस्वती नदीला मिळणारं पाणी कमी झालं. काही शतकांनंतर सरस्वती नदी आटली आणि लुप्त झाली. तिच्या काठी वसलेली समृद्ध नगरं हळूहळू ओस पडून लयाला गेली. त्यात वास्तव्य करणारी मंडळी स्थलांतर करून गंगा-यमुनेच्या खोर्‍यात येऊन वसली आणि त्यांनी आपल्या सोबत आणली होती- त्यांच्या पूर्वजांच्या बौद्धिक आणि भौतिक विकासाला कारणीभूत असणार्‍या सरस्वती नदीची स्मृती.
तिच्या परीसस्पर्शानं वैदिक संस्कृतीच्या लोकांचं जीवन अंतर्बाह्य उजळून निघालं, याची जाणीव निरंतर राहावी म्हणून ब्राह्मण ग्रंथातून तिचा उल्लेख वाणीची देवी ‘वाक्‌’ या रूपात प्रस्तुत करण्यात आली. वाणीच्या माध्यमातूनच ज्ञान एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे प्रवाहित होतं, त्याचं आयुष्य व्यापतं आणि समृद्ध करतं. हे सारं सरस्वती नदीच्या प्रवाहासारखं जीवनमान प्रकाशवान करणारं असतं, याची खात्रीच प्राचीन भारतीयांना पटली आणि त्यांनी सरस्वती नदीलाच विद्या आणि कलेची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रस्तुत केलं.
 
पारशी, जैनमत आणि बौद्धमताचे अनुयायीदेखील या संकल्पनेशी सहमत होते. बौद्धांनी भारहुतच्या स्तूपाच्या कठड्यावर कोरलेली तिची मूर्ती ही सर्वात जुनी सरस्वतीची मूर्ती म्हणता येईल. पुढच्या काळात निर्माण झालेल्या बौद्ध ग्रंथांत या संकल्पनेचा विस्तार होऊन एकूण पाच प्रकारच्या सरस्वतींचं वर्णन केल्याचं दिसतं- 1) महासरस्वती, 2) वज्रवीणा सरस्वती, 3) वज्रशारदा, 4) आर्यसरस्वती, 5) वज्रसरस्वती. या वज्रसरस्वतीच्या हाती असलेल्या कमळावर प्रज्ञापारमितेची पोथी असते.
जैनांनी तिला श्रुतदेवी म्हटलं आहे. तिचं वर्णनही ‘या कुन्देन्दु तुषार हार धवला’ असंच करण्यात आलं आहे. प्राचीन पारशी ग्रंथांत जिचा उल्लेख अनाहिता म्हणून करण्यात आला आहे आणि जिचं वर्णन प्रथम दैवी, स्वर्गीय जलदेवता, नदी आणि नंतर विद्या देणारी असं केलं आहे ती सरस्वतीचीच पर्शियन आवृत्ती असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. पर्शियन भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ करतात. त्यामुळे सरस्वतीचा उच्चार हरहवती असा होतो. हरहवतीप्रमाणेच अनाहितादेखील उत्तमधान्य पिकवणारी आणि समृद्धी देणारी म्हटलं आहे.
आधुनिक उपकरणांच्या मदतीनं या नदीचा शोध घेण्याचा उपक्रम भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे राबवण्यात आला. संशोधनाच्या अहवालात शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, ‘सरस्वतीच्या प्राचीन प्रवाहरेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे.’ या नदीच्या आजूबाजूच्या एकूण 14 विहिरींमधल्या पाण्याच्या कार्बन डेिंटग पद्धतीनं केलेल्या कालनिर्णयानुसार, हे पाणी आठ हजार ते 14 हजार वर्षं जुनं असावं. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रानं पोखरण-2 (1998) नंतर या अणुस्फोटाचा तिथल्या भूगर्भातल्या पाण्यावर काय परिणाम झाला, हे शोधण्यासाठी चाचणी झाली त्या जागेला केंद्र मानून 200 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील 1000 ठिकाणच्या भूगर्भातल्या पाण्याचे नमुने चाचणीसाठी घेतले. त्यांचे निष्कर्ष आहेत की, ‘अणुचाचणीचा काहीही परिणाम झाला नाही, हे सगळे नमुने उत्कृष्ट पेयजल असून हे शेतीकरताही वापरता येऊ शकतं. या पाण्याचे गुणधर्म हिमालयातील हिमनद्यांच्या पाण्याशी तंतोतंत जुळणारे आहेत आणि हे नमुने किमान 9 हजार ते 15 हजार वर्षं जुन्या पाण्याचे आहेत.’
माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी बुद्धीनं मंद असलेला कालिदास नदीत जीव देण्यासाठी गेला असताना त्याला सरस्वतीनं दर्शन दिलं आणि नदीच्या पाण्यात स्नान करण्यास सांगितलं. स्नानानंतर त्याची अद्वितीय प्रतिभा जागृत झाली आणि त्याचं जीवन काव्यप्रकाशानं उजळून निघालं. हीच ती वसंतपंचमी आणि आजचाच तो दिवस. नदीतमा भास्वती सरस्वती गुप्त असली, तरी तिचा किनारा हे आपल्यासाठी अभिमानस्थळच आहे.
सरस्वती नदीचं पात्र
-Dr rama golwarkar