दिग्विजयी शिवाजी घडविताना...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
जिजाऊसाहेबांनी शिवबाला घडविताना केलेली व्यवस्था आपण मागील लेखात पाहिली. राजांना विविध शस्त्रं आणि शास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धार मिळत होती. आपल्या मुलामध्ये कोणत्या गुणांचा समुच्चय असावा, याची जिजाऊसाहेबांना पूर्ण कल्पना असावी, म्हणूनच त्यांचे प्रशिक्षण त्या पद्धतीने सुरू होते. शहाजीराजांनी स्वत:कडे जी अत्यंत विश्वासू आणि प्रचंड कर्तबगार मंडळी ठेवली होती, त्यातील एक नाव दादाजी (मूळ कागदपत्रांतील नाव ‘दादोजी’ नसून ‘दादाजी’ असे आहे) कोंडदेव. शहाजीराजांनी त्यांना कारभारी नेमले होते. त्यांनीच पुढे जिजामाता अन्‌ शिवाजी राजांच्या सोबत पुण्याचा कायापालट केला. सोन्याचा नांगर फिरवून शेतीला प्रोत्साहन देणे, जंगली श्वापदांपासून संरक्षणात्मक उपाययोजना करणे, गुंडप्रवृत्तीला पायाबंद घालणे आदी कामे त्यांनी चोख बजाविली. याशिवाय पुढील काळात शहाजींनी शामराजपंत रांझेकर, माणकोजी दहातोंडे, हणमंते, सोनोपंत, रघुनाथ बल्लाळ अशी मातबर मंडळी राजांसोबत दिली. या सर्व अनुभवी अधिकार्‍यांच्या साथीने राजांची दृष्टी अजून सूक्ष्म आणि व्यापक झाली. अर्थातच न्यायनिवाडे, योजना करताना सूक्ष्म आणि ध्येयधोरण ठरविताना व्यापक. ज्यांना दिग्विजयी मुले घडवायची असतात त्यांना तशी योजना करावी लागते. मुलांच्या सर्वंकष विकासावर भर द्यावा लागतो.

 
 
आज याच विकासाच्या नावावर आम्ही आमच्या पाल्यांना कसे वागवतो, याचा सूक्ष्म विचार करण्याची वेळ आलेली आहे. अनेक पालकांना तर हा गैरसमजच आहे की, नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळाले तरच आमचा मुलगा हुशार. ‘‘नव्वद टक्केच का मिळाले त्यापेक्षा जास्त का नाही घेतले?’’ असे म्हणून मुलांना मारणारे बाप मी अनेकदा बघितले आहेत. या ‘बापांना’ स्वत:ला दहावी अन्‌ बारावी या दोन्ही परीक्षा मिळून कधी नव्वद टक्के मिळालेले नसतात. पण, यांच्या स्वत:च्या मुलांकडून अपेक्षा बघा. या पालकांना कोण सांगेल की, नोकरी िंकवा उद्योग करताना त्या व्यक्तीला दहावीत 83% होते की 89% याने काहीही फरक नसतो.
 
मी स्वत: आजवर हजारावर इंटरव्यूज घेतले आहेत. आमच्यासाठी साठ टक्के अन्‌ नव्व्याण्णव टक्के असलेले विद्यार्थी जवळजवळ सारखेच असतात. संशोधनासारख्या काही निवडक क्षेत्रांना वगळल्यास हा नियम सर्वत्र लागू पडतो. तरी टक्केवारीची ही जीवघेणी स्पर्धा का? आई-वडील या टक्केवारीचे प्रचंड ओझे आठव्या वर्गापासून देऊन ठेवतात व हा अलिखित कायदा असतो की, एवढे टक्के मिळाले तरच तुझे घरात स्वागत होईल, नाहीतर याद राख! पालकच असे मुलांच्या जिवाशी खेळत राहतील तर शिवाजी कसे तयार होतील?
 
एक-दोन गुण इकडे-तिकडे झाले की लगेच ट्युशन क्लासेसची फौज उभी असतेच. शिकवणी वर्ग हे मला न उलगडलेलं कोडं आहे. काही शाळांमधील/कॉलेजमधील काही शिक्षक आपली जबाबदारी विसरतात. गलेलठ्ठ पगार मिळत असून काही जण विद्यार्थ्यांप्रती आपले कर्तव्य विसरतात, नीट शिकवत नाहीत, वर्गावर जात नाहीत, शाळेबाहेरच्या चहाच्या दुकानात दोन-दोन तास ऊब शेकतात. नाइलाजाने त्यांच्या विषयासाठी विद्यार्थ्यांना बाहेर शिकवण्यांकडे जावे लागते. हे मी समजू शकतो. पण, आज ट्युशनला जाणे हे एक ‘फॅड’ झाले आहे, कारण पालक त्यामागे ‘मॅड’ झालेले आहेत. दहा वर्षे शिकविण्याचा अनुभव असलेला शिक्षक या नात्याने सांगतो. एका-एका शिकवणीमध्ये कोंबलेले दीडशे-दोनशे विद्यार्थी, माईकवरून बोलणारा तथाकथित शिक्षक. सगळ्या मुलांचे ज्याला नावही माहीत नाही तो त्यांचे गुणावगुण काय जाणणार? त्यातल्या त्यात शिकविण्याच्या नावावर सगळं रेडिमेड आणि एकतर्फी (वन-साईडेड). म्हणजे भात मीच वाढतो, त्यावर वरण, तूप मीच घालतो, मीच कालवून देतो, मीच भरवतो आणि हो तू चावायचे कष्टही घेऊ नकोस, मीच तुझा जबडा धरून तुला चावायला मदत करतो- या पद्धतीला म्हणतात शिकवणी वर्ग! काही प्रामाणिक शिक्षक उत्तम शिकविण्या चालवितात, पण त्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. बाकी तर सगळी दुकानेच आहेत. या दुकानांमधून शिकून आलेले विद्यार्थी 80-85-90 टक्के घेऊन पास झाले तर काय नवल? यापेक्षा कुठलीही शिकवणी न लावता, स्वत:चा अभ्यास स्वत: करून, संकल्पना (कॉन्सेप्ट) समजावून 60-65 टक्के घेणारी मुले आम्हांस योग्य वाटतात. इंटरव्ह्यूमध्ये अशाच मुलांची निवड होते. तरीही ही वस्तुस्थिती किती पालक जाणून घेतील, याची शंका वाटते? पण, माझी भाषणे ऐकून, सल्लामसलत करून जाणीवपूर्वक स्वत:च्या मुलांची शिकवणी बंद करून मुलांना मेहनतीची सवय लावलेल्या पालकांची कैक उदाहरणे देता येतील. कारण शिकणे, त्यासाठी शिकून घेण्याची वृत्ती तयार करणे (लर्निंग) अन्‌ शिकलेल्या गोष्टीचा सराव करणे (प्रॅक्टिस) हेच तंत्र असते. शिवाजी राजे शिकतही होते अन्‌ त्याचा प्रचंड सरावही करत होते. जगज्जेेता बनण्यासाठी लागणारे सारे गुण त्यांच्यात बाणवले जात होते.
 
मुलांशी संवाद साधताना सकारात्मक वाक्यांचा सातत्याने उपयोग करणे अत्यावश्यक असते. ‘हे करू नको’, ‘ते करू नको’, अशा नकारात्मक सूचना पालक सातत्याने करतात. गंमत पाहा, मुले दोन-अडीच वर्षांची असताना पहिल्यांदा पेन अथवा पेन्सिल उचलतात अन्‌ आपण लगेच सूचना देतो की, िंभतीवर लिहू नकोस. त्या बालकाला काय माहिती की हा पेन कशावर चालतो, पण आपण जोडीच अशी लावतो की मुले िंभतीकडेच जातात. तीन वर्षांखालील मुले जिथे असतात तिथे तीन फुटाखालील िंभती रंगल्याचे हमखास दिसते. बॉल-काच, कार्टून-जेवण, वाढदिवस-मेणबत्त्या विझविणे, डिग्री-विदेशात नोकरी... अशा अनेक जोड्या आपणच कळत नकळत लावीत असतो.
 
मुलांवरचा आपला विश्वास आणि आपल्यावरचा मुलांचा विश्वास कधीही तुटता कामा नये. यातून मुले खंबीर होत जातात. आईवरचा विश्वास तर कधीही तुटता कामा नये. आई बालपणापासून सांगत असते की, ‘‘तू माझा राजा आहेस’’, ‘‘तूच सगळ्यांत सुंदर आहेस’’, ‘‘तुझ्यासारखा दुसरा कुणीही नाही.’’ मुलांचा आईच्या शब्दावर विश्वास बसतो. मोठं झाल्यावर तीच आई जेव्हा म्हणते, ‘‘तू मूर्ख आहेस’’, ‘‘साधी गणितं तुला येत नाही’’, ‘‘हे तू कधीही करू शकणार नाहीस’’, तेव्हा त्या मुलाच्या आत्मविश्वासाचे काय होत असेल?
सगळ्या शाळांमध्ये आज शिकविले जाते की, सिग्नल पाळा, सिग्नल तोडू नका. मुलांच्या मनामनात ते कोरले जाते. पण, शाळेत सोडताना आईच सिग्नल तोडते. नकळत आईवरचा विश्वास हादरतो. दारू वाईट असते, तिला हात लावू नये, धूम्रपान सेहत के लिए हानिकारक है, अशी वाक्ये मुलांना पाठ असतात. पण, आमच्या वयाचे अनेक पालक मुलांसमोर दारू पितात. आई-वडिलांवरचा विश्वास हलायला लागतो. कळत नकळत मुले पुढे म्हणतात, ‘‘आई, तू शांत राहा, तुला काही कळत नाही.’’ हे दुष्परिणाम आम्ही ओढवून घेतलेले आहे.
इच्छा असेल तर दशदिशा गाजविणारे शिवाजी आजही जन्माला येऊ शकतात. पण, त्याआधी घरोघरी जिजामातांना जन्म घ्यावा लागेल, मग पाहा दिग्विजयी शिवाजी जन्माला येतात की नाही!
-डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
...............